रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय महामार्ग (ओ) योजनेंतर्गत मिश्र वार्षिकी तत्वावर (एचएएम) 6969.67 कोटी रुपये खर्चासह, एकूण 8.1 किमी प्रकल्प लांबीच्या आणि द्वारका द्रुतगती महामार्गाला (एनएच 248 बीबी)दिल्लीस्थित वसंत कुंज परिसरातील नेल्सन मंडेला मार्गाशी जोडण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग – 148 एई वर उभारण्यात येणाऱ्या 6 पदरी रस्ता बोगद्याच्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 01 JUL 2026 10:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक संसदीय समितीने आज राष्ट्रीय महामार्ग (ओ) योजनेंतर्गत मिश्र वार्षिकी तत्वावर (एचएएम) 6969.67 कोटी रुपये खर्चासह, एकूण 8.1 किमी प्रकल्प लांबीच्या आणि द्वारका द्रुतगती महामार्गाला (एनएच 248 बीबी)दिल्लीस्थित वसंत कुंज परिसरातील नेल्सन मंडेला मार्गाशी जोडण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग – 148 एई वर उभारण्यात येणाऱ्या 6 पदरी रस्ता बोगद्याच्या बांधकामाला मंजुरी दिली.

या प्रकल्पामुळे दिल्लीच्या पश्चिम आणि दक्षिण भागादरम्यान अधिक वेगवान जोडणी सुविधा उपलब्ध होणार असून त्यामुळे शहरी विस्तारित मार्ग (युईआर)2/ द्वारका द्रुतगती महामार्ग दक्षिण दिल्लीतील वसंत कुंज भागाशी जोडला जाईल. गुरगाव, द्वारका, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पश्चिम दिल्ली या भागांतील वाहतुकीला दक्षिण दिल्लीकडे वळवण्यासाठी उपयुक्त ठरेल. ट्वीन-ट्यूब पद्धतीच्या या भुयारी बोगद्यांमुळे सदर्न रिज वनक्षेत्राचे जतन होऊन (बोगद्याचा 1.98 किमीचा टप्पा या रिजखालून जातो) जमिनीवरील अडथळे कमी होतील. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)एम्स आणि महिपालपूर यांच्या दरम्यान उन्नत मार्गिका उभारण्याचा देखील प्रस्ताव दिला आहे. ही लिंक बोगद्याला बारापुल्ला उन्नत रस्त्याशी जोडेल आणि त्यायोगे पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली या भागाला पूर्व दिल्ली, गाझियाबाद तसेच नोईडा या भागांशी जोडेल.

रंगपुरी (दक्षिण दिल्ली) रिजमधून जाणारा हा प्रस्तावित बोगदा ट्वीन-ट्यूब प्रकारानुसार संरचित असून [बोगदा खणणाऱ्या यंत्राच्या (टीबीएम) मदतीने बांधण्यात येणारा] तो शिवमूर्ती इंटरचेंज येथून सुरु होईल आणि नेल्सन मंडेला मार्ग आणि महिपालपूर छत्तरपूर मार्ग यांच्या छेदनबिंदूपाशी येऊन संपेल.

या छेदनबिंदूपाशी होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नेल्सन मंडेला मार्गालगत एक उन्नत मार्ग (1.8 किमीचा) बांधण्याचा देखील प्रस्ताव आहे. छत्तरपूरहून महिपालपूरच्या दिशेने जाणारा एक अतिरिक्त उड्डाणपूल देखील प्रस्तावित आहे. छत्तरपूरकडे जाणाऱ्या वाहतुकीला उजवीकडे वळण घेता यावे यासाठी उन्नत यु टर्न देखील बांधण्याचा प्रस्ताव आहे.

या बोगद्यातील मुख्य मार्गिकेची लांबी 6.3 किमी आहे.प्रस्तावित उड्डाणपूल आणि महिपालपूर छत्तरपूर मार्गालगतचा युटर्न लक्षात घेतला तर या प्रकल्पाची एकूण लांबी 8.100 किमी होते आणि त्यामध्ये 3.140 किमी चा बोगदा, 0.980 किमीचा बोगदा सुरु होण्यापूर्वीचा चढ, आरई भिंतीसह 0.554 किमीचा पोहोच रस्ता, 2.556 किमीचा उन्नत भाग आणि 0.870 किमीचा समतल रस्ता यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या प्रत्येक पदरी-किलोमीटरच्या विकासातून सरसरी 264 मनुष्य दिवस/ प्रत्यक्ष रोजगार दिवस आणि सरासरी 55 मनुष्य दिवस/ अप्रत्यक्ष रोजगार दिवस निर्माण होतात. त्यामुळे, हा प्रकल्प सुमारे 7.54 लाख मनुष्य दिवसांचा प्रत्यक्ष रोजगार आणि 9.80 लाख मनुष्य दिवसांचा अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करेल. प्रस्तावित उच्च-गती मार्गिकेच्या लगतच्या परिसरात आर्थिक कार्यांमध्ये वाढ झाल्यामुळे हा प्रकल्प अतिरिक्त रोजगार संधी देखील निर्माण करेल.

शिवमूर्ती इंटरचेंज/द्वारका द्रुतगती महामार्ग आणि नेल्सन मंडेला मार्ग/वसंत कुंज यांच्या दरम्यान प्रस्तावित बोगद्यासाठीचा प्रकल्प संरेखन नकाशा

 

* * *

शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2280162) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Tamil , Malayalam