आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली सरकारसोबत 'क्षयरोगमुक्त भारत अभियाना'ची आढावा बैठक

प्रविष्टि तिथि: 01 JUL 2026 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2026

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीटी) दिल्ली सरकारसोबत 'टीबी (क्षयरोग) मुक्त भारत अभियान' आणि 100 दिवसांच्या मोहिमेची आढावा बैठक झाली.

'टीबी मुक्त भारत अभियाना'अंतर्गत महत्त्वपूर्ण प्रयत्न केले गेले असले, तरी प्रयत्न आणि फलनिष्पत्ती यातील उर्वरित तफावत केवळ 'जन भागीदारी' द्वारेच दूर केली जाऊ शकते, असे नड्डा म्हणाले. केवळ आरोग्य यंत्रणा स्वतंत्रपणे काम करून क्षयरोग निर्मूलन करू शकत नाही. यासाठी समुदाय, लोकप्रतिनिधी आणि नागरी संस्थांच्या सक्रिय सहभागासह या मोहिमेचे एका जनआंदोलनात रूपांतर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आरोग्य अधिकाऱ्यांनी खासदार, आमदार आणि नगरसेवकांना त्यांच्या संबंधित मतदारसंघातील टीबीचे प्रमाण, येणाऱ्या अडचणी, राबवण्यात येणाऱ्या उपायोजना आणि रुग्णांना शोधणे, औषधोपचार पूर्ण करणे व लोकांचा पाठिंबा मिळवणे याबद्दल नियमितपणे माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.  लोकप्रतिनिधी हे सरकार आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा आहेत, त्यांच्या सक्रिय सहभागाने या मोहिमेची तळागाळातील अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला.

'प्रगती' (PRAGATI) बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेचा नड्डा यांनी पुनरुच्चार केला. या मोहिमेची अंमलबजावणी करताना स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी परस्परांचे सहकार्य घ्यायला हवे असे त्यांनी सांगितले. या मोहिमेच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जावी, असे निर्देश त्यांनी दिले. तळागाळातील लोकसहभाग आणि जनजागृती वाढवण्यासाठी त्यांनी 'माय भारत' स्वयंसेवकांचा अधिकाधिक सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. टीबीचे रुग्ण शोधण्यात तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले की, रोगाचे लवकर निदान व्हावे आणि रुग्ण शोधण्याच्या प्रक्रियेत सुधारणा व्हावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या जास्तीत जास्त 'हँडहेल्ड एक्स-रे' मशिन्स उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय मंत्रालय, राज्य शासन, जिल्हा प्रशासन, आरोग्य संस्था आणि आघाडीवर काम करणारे आरोग्य कर्मचारी यांच्यात घनिष्ठ समन्वय असण्याची गरज नड्डा यांनी नमूद केली. लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचण्यासाठी आणि त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी या मोहिमेशी संबंधित सर्व संवाद सोप्या, सहज समजेल अशा भाषेत सादर केला जावा, यावर त्यांनी भर दिला.

या मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी, अंमलबजावणीतील आव्हाने सोडवण्यासाठी आणि सर्वोत्तम पद्धतींची वेळेत देवाणघेवाण करण्यासाठी रुग्णालये, राज्य आरोग्य अधिकारी आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांचा समावेश असलेल्या नियमित संयुक्त आढावा बैठका आयोजित केल्या जाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

 

* * *

शैलेश पाटील/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2280149) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil