शिक्षण मंत्रालय
युवा संगमच्या सहाव्या टप्प्याची यशस्वी सांगता
प्रविष्टि तिथि:
30 JUN 2026 8:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2026
मध्य प्रदेश ते झारखंड या अंतिम दौऱ्याच्या समाप्तीसह, 19 जून 2026 रोजी 'युवा संगम' कार्यक्रमाच्या सहाव्या टप्प्याIची यशस्वी सांगता झाली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे आयोजित 'युवा संगम' हा 'एक भारत श्रेष्ठ भारत' (ईबीएसबी) उपक्रमांतर्गत राबवला जाणारा एक प्रमुख आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. देशातील तरुणाईमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि अनुभवात्मक शिक्षणाला चालना देणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

'युवा संगम' तरुणाईला देशातील समृद्ध सांस्कृतिक, भाषिक, शैक्षणिक आणि सामाजिक विविधतेचा जवळून अनुभव घेण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतो. सहाव्या टप्प्या मधील पहिला दौरा 8 मे 2026 रोजी राजस्थान ते कर्नाटक दरम्यान सुरू झाला होता. यामध्ये 22 जोड्या लावलेल्या राज्यांमधील 1,26,000 हून अधिक नोंदणीकृत विद्यार्थ्यांमधून सुमारे 1100 प्रतिनिधींची निवड करण्यात आली होती. विविध राज्यांना भेट देणाऱ्या या प्रतिनिधी मंडळांनी संबंधित यजमान राज्यांच्या राज्यपाल महोदयांची भेट घेतली, तर केंद्रशासित प्रदेशांना भेट देणाऱ्या प्रतिनिधींनी नायब राज्यपालांशी संवाद साधला. याद्वारे त्यांना सुप्रशासन, घटनात्मक मूल्ये, नेतृत्व आणि सर्वसमावेशक विकास याविषयी मौल्यवान माहिती मिळाली.

या प्रतिनिधी मंडळांचे आदरातिथ्य देशातील आघाडीच्या उच्च शिक्षण संस्थांनी केले होते. या दरम्यान त्यांनी शैक्षणिक देवाणघेवाण, सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक वारसा स्थळांना भेटी, नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण आणि सामाजिक सहभागाच्या उपक्रमांमध्ये भाग घेतला. या सहभागी तरुणांना ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परंपरा, विकास मॉडेल आणि सर्वोत्तम पद्धती जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली.
संपूर्ण कार्यक्रमादरम्यान, सहभागी तरुणांनी वरिष्ठ शासकीय अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, नवोन्मेषक, उद्योजक, कलाकार आणि स्थानिक समुदायांशीही संवाद साधला. विद्यापीठे, संशोधन संस्था, ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे, औद्योगिक प्रतिष्ठाने, संग्रहालये आणि सांस्कृतिक स्थळांच्या भेटींमुळे भारताची विविधता आणि सामायिक वारसा याबद्दलची त्यांची समज अधिक समृद्ध झाली. या प्रतिनिधींनी सांस्कृतिक सादरीकरण, प्रदर्शने आणि संवादात्मक सत्रांच्या माध्यमातून आपापल्या प्रादेशिक परंपरांचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवले, ज्यामुळे परस्परांबद्दल आदर आणि आयुष्यभराची मैत्री निर्माण झाली.

6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या, युवा संगमच्या सहाव्या टप्प्याने सहभागींना भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाणारे ऋणानुबंध निर्माण करत भारताचे वैविध्यपूर्ण भूप्रदेश, भाषा, खाद्यसंस्कृती, परंपरा आणि विकासात्मक कामगिरी अनुभवण्याची सुवर्णसंधी दिली. या समापनाने खऱ्या अर्थाने 'एक भारत श्रेष्ठ भारत' हा दृष्टिकोन सार्थ ठरवला असून, जनसामान्यांमधील परस्पर संबंधांना चालना दिली आणि विविधतेत एकता या भावनेला अधिक बळकट केले.

* * *
निलिमा चितळे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2279570)
आगंतुक पटल : 13