पर्यटन मंत्रालय
भारतीय पर्यटनाच्या डिजिटल प्रसाराला गती देण्यासाठी पर्यटन मंत्रालय आणि गुगल इंडिया यांच्यात सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
30 JUN 2026 7:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2026
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने आज गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून भारतातील पर्यटन स्थळांच्या डिजिटल प्रसाराला बळकटी देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे या सामंजस्य कराराची देवाणघेवाण करण्यात आली.

हा सामंजस्य करार, पर्यटन मंत्रालय आणि गुगल इंडिया यांच्यात डिजिटल पर्यटन प्रसार, ज्ञान देवाणघेवाण, क्षमता बांधणी (कौशल्य विकास) आणि पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमधील सहकार्यासाठी एक चौकट निश्चित करतो. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत भारतातील पर्यटन स्थळे, तेथील वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ही भागीदारी गुगलच्या डिजिटल कौशल्याचा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणार आहे. हे सहकार्य पूर्णपणे बिगर -व्यावसायिक, बंधनकारक नसलेले आणि एकाच पक्षापुरते मर्यादित नसलेले असून, या कराराअंतर्गत दोन्ही पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार होणार नाही.
या प्रसंगी बोलताना गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, "डिजिटल तंत्रज्ञानामध्ये भारतातील सांस्कृतिक स्थळांचे वैभव, समृद्धी आणि भव्यता जगभरातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची, नाविन्यपूर्ण आणि आकर्षक अनुभव निर्माण करण्याची विलक्षण क्षमता आहे. अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून, पर्यटक भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा ज्या पद्धतीने शोधतात, अनुभवतात आणि त्याच्याशी जोडले जातात, त्या संपूर्ण प्रक्रियेत आपण सकारात्मक बदल घडवून आणू शकतो."

मंत्री महोदय पुढे म्हणाले की, हे सहकार्य 'इन्क्रेडिबल इंडिया' अर्थात 'अतुल्य भारत' उपक्रमांतर्गत पर्यटनाच्या प्रसारासाठी नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाधारित दृष्टिकोन स्वीकारण्याच्या मंत्रालयाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या भागीदारीमुळे जागतिक स्तरावर भारताच्या पर्यटनाला अधिक बळकटी मिळेल, डिजिटल पोहोच सुधारेल आणि भारताची ओळख एक आधुनिक, सुलभ आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक पर्यटन स्थळ म्हणून निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सहकार्याचा एक भाग म्हणून, पुराव्यांवर आधारित पर्यटन प्रसार धोरणांना बळकटी देण्यासाठी जागतिक प्रवासाचे कल, पर्यटकांच्या वर्तनातील बदल आणि डिजिटल माध्यमांवरील त्यांच्या सहभागासंदर्भातील गुगलकडून उपलब्ध होणाऱ्या माहितीचा आणि विश्लेषणाचा प्रभावीपणे उपयोग करण्यात येणार आहे. या भागीदारीअंतर्गत मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसाठी डिजिटल विपणन साधने, मोहिमांचे परिणामकारक नियोजन आणि अनुकूलन, आशयनिर्मिती तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेसह उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात प्रशिक्षण आणि क्षमता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. यामुळे अधिक अचूक, प्रभावी आणि परिणामांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करता येईल अशा पद्धतीने पर्यटकांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.
* * *
निलिमा चितळे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2279539)
आगंतुक पटल : 16