संरक्षण मंत्रालय
'विकसित भारता'च्या प्रवासात प्रादेशिक उद्योगांनी भागीदार बनले पाहिजे: व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन
“प्रादेशिक सामर्थ्याचे राष्ट्रीय क्षमतेत, स्थानिक नवोन्मेषाचे जागतिक स्पर्धेत आणि औद्योगिक विकासाचे सामरिक सामर्थ्यात रूपांतर करण्याची गरज आहे”
प्रविष्टि तिथि:
30 JUN 2026 6:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2026
“विकसित भारत हे केवळ आर्थिक विकासाचे ध्येय नाही, तर आर्थिकदृष्ट्या समृद्ध, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या सशक्त देश घडवण्याचा संकल्प आहे,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. प्रादेशिक उद्योगांनी प्रादेशिक सामर्थ्याचे राष्ट्रीय क्षमतेत, स्थानिक नवोन्मेषाचे जागतिक स्पर्धेत आणि औद्योगिक विकासाचे सामरिक सामर्थ्यात रूपांतर करून या प्रवासात भागीदार बनावे, असे आवाहन त्यांनी केले. ते आज वडोदरा येथे व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत उद्योगपती, उद्योजक, तरुण नवोन्मेषक आणि शिक्षणतज्ञांना संबोधित करत होते.

वेगाने बदलणाऱ्या भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारताची आत्मनिर्भरता, तांत्रिक क्षमता आणि सामूहिक निर्धार यावरच येत्या दशकांमध्ये जागतिक स्तरावर भारताची भूमिका अवलंबून असेल, यावर संरक्षण मंत्र्यांनी भर दिला.
संरक्षण क्षेत्राचा विकास केवळ शस्त्रे आणि तंत्रज्ञानाच्या निर्मितीपुरता मर्यादित नाही; तर तो एका विशाल आर्थिक परिसंस्थेला चालना देत असल्याचे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. संरक्षण कॉरिडॉरमुळे पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, उद्योग आणि रोजगारात नवीन संधी निर्माण होतात, तर संशोधन आणि विकास, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषावर भर दिल्याने औद्योगिक पाया मजबूत होतो, असे त्यांनी सांगितले. औद्योगिक आणि संरक्षण क्षमता अधिक बळकट करण्यासाठी या गतीचा उपयोग करून घेण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

आत्मनिर्भरता म्हणजे अलिप्तता नव्हे; तर एका राष्ट्राने स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहून जगाशी एक समान भागीदार म्हणून संवाद साधणे होय, हे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय भूमीवर ठोस परिणाम साध्य व्हावेत, स्वदेशी क्षमता मजबूत व्हाव्यात आणि जनतेला लाभ मिळावा, हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार परदेशी मूळ उपकरण उत्पादकांसोबत सहकार्य, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संयुक्त उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, राजनाथ सिंह यांनी संरक्षण आणि एरोस्पेस उद्योगांवरील एका परिसंवादात खाजगी उद्योग प्रतिनिधी आणि शिक्षणतज्ञांशी संवाद साधला. संरक्षण उत्पादन परिसंस्था बळकट करण्याच्या दिशेने केलेल्या त्यांच्या प्रयत्नांची संरक्षण मंत्र्यांनी दखल घेतली. भारताच्या विकास प्रवासात खाजगी उद्योग प्रतिनिधी आणि शिक्षणतज्ञांना आणखी मोठे योगदान देता यावे यासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2279487)
आगंतुक पटल : 7