कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
'ग्लोबल स्किल्स चॅलेंज ऑस्ट्रेलिया 2026' मध्ये भारतीय संघाने पटकावले 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक; 'वर्ल्डस्किल्स शांघाय'च्या तयारीला मिळाली चालना
प्रविष्टि तिथि:
29 JUN 2026 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जून 2026
ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या 'ग्लोबल स्किल्स चॅलेंज 2026' मध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत एकूण 5 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. या वर्षाच्या अखेरीस शांघाय येथे होणाऱ्या '48 व्या वर्ल्डस्किल्स स्पर्धे'च्या दृष्टीने भारताच्या प्रवासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
23 ते 29 जून 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 16 वर्ल्डस्किल्स सदस्य देशांमधील जवळपास 600 स्पर्धक, तज्ज्ञ, अनुवादक आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, चीन, अमेरिका, जपान, फ्रान्स आणि कोरिया यांसारख्या बलाढ्य देशांचा समावेश होता
भारतीय संघातील उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू:
- पवन भद्रावती सुरेश (कर्नाटक): अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग (Additive Manufacturing) मध्ये सुवर्ण पदक (रौप्य पदक: जपान)
- मौसम कुमार गिरी (बिहार): क्लाउड कम्प्युटिंग मध्ये सुवर्ण पदक (रौप्य पदक: जपान; कांस्य पदक: सिंगापूर)
- विष्णू प्रिया सुनील (दिल्ली): हेल्थ अँड सोशल केअर मध्ये सुवर्ण पदक (रौप्य पदक: ऑस्ट्रेलिया)
- हर्ष रमेश पवार (महाराष्ट्र): 3डी डिजिटल गेम आर्ट मध्ये रौप्य पदक
- मुस्कान (हरियाणा): पेंटिंग अँड डेकोरेटिंग मध्ये कांस्य पदक
या यशातून प्रगत उत्पादन, डिजिटल तंत्रज्ञान, सर्जनशील उद्योग आणि सेवा क्षेत्रातील कौशल्यांमध्ये भारताच्या कुशल तरुणांची वाढती जागतिक स्पर्धात्मकता अधोरेखित होते.
भारतीय संघाच्या या घवघवीत यशाबद्दल कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी यांनी अभिनंदन केले. ग्लोबल स्किल्स चॅलेंज 2026 मध्ये भारतीय संघाने मिळवलेली 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 5 पदके ही देशासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. हे यश आपले खेळाडू, तज्ज्ञ, मार्गदर्शक आणि उद्योग भागीदार यांच्यातील प्रतिभा, जिद्द आणि कठोर परिश्रमांची साक्ष देते. या उल्लेखनीय कामगिरीपलीकडे, या स्पर्धेने आपल्या तरुणांना जागतिक मानकांची ओळख करून दिली आहे, ज्यामुळे शांघाय येथे होणाऱ्या 'वर्ल्डस्किल्स स्पर्धे'साठी आपल्या पूर्वतयारीला अधिक बळकटी मिळाली असल्याचेही चौधरी यांनी नमूद केले.
या स्पर्धेत भारताच्या 30 सदस्यीय चमूने सहभाग घेतला होता, ज्यामध्ये 15 स्पर्धक आणि 15 तज्ज्ञांचा समावेश होता. प्रगत उत्पादन, डिजिटल तंत्रज्ञान, बांधकाम क्षेत्र, सर्जनशील उद्योग आणि सेवा क्षेत्र अशा एकूण 15 विविध कौशल्य श्रेणींमध्ये त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले.
संपूर्ण स्पर्धेदरम्यान, जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त 'कॉम्पिटिशन इन्फॉर्मेशन सिस्टीम' चा वापर करून स्पर्धकांचे मूल्यांकन करण्यात आले. वर्ल्डस्किल्स आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ज्या मूल्यमापन पद्धतीचा वापर केला तशीच प्रणाली येथेही राबविण्यात आली होती.




* * *
निलिमा चितळे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2279221)
आगंतुक पटल : 6