संरक्षण मंत्रालय
आयसीजीएस अक्षय भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल
प्रविष्टि तिथि:
27 JUN 2026 8:23PM by PIB Mumbai
भारतीय तटरक्षक दलाने 27 जून 2026 रोजी गोव्यातील गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे आयसीजीएस अक्षय या नवीन पिढीच्या वेगवान गस्ती जहाजाला (एफपीव्ही) सेवेत दाखल करून आपल्या दलाच्या आधुनिकीकरणातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
'अक्षय' अर्थात अविनाशी असे नाव असलेली ही वेगवान गस्ती नौका देशाच्या सागरी हितांचे रक्षण करण्याप्रति असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या चिरस्थायी भावनेचे, लवचिकतेचे आणि अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. ही नौका भारताच्या विशाल सागरी क्षेत्राचे संरक्षण करताना सुरक्षित, संरक्षित आणि स्वच्छ समुद्र सुनिश्चित करण्याचा दलाचा निर्धार अधिक दृढ करते.
हे जहाज सागरी कायद्याची अंमलबजावणी, किनारी सुरक्षा, शोध आणि बचाव, सागरी पर्यावरण संरक्षण आणि संकटात सापडलेल्या खलाशांना मदत असे तटरक्षक दलाचे विविध प्रकारचे परिचालन करण्यासाठी सुसज्ज आहे, ज्यामुळे भारतीय तटरक्षक दलाची कार्यक्षमता वाढेल.
अर्थ मंत्रालयातील व्यय विभागाच्या अतिरिक्त सचिव (कार्मिक) परमा सेन यांच्या हस्ते पोलीस महानिरीक्षक भीष्म शर्मा, पीटीएम, टीएम, कमांडर, कोस्ट गार्ड रिजन (पश्चिम), पोलीस महानिरीक्षक ज्योतींद्र सिंग, टीएम, उपमहासंचालक (मानव संसाधन विकास) आणि केंद्र व राज्य सरकारांमधील इतर वरिष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत या जहाजाचे लोकार्पण करण्यात आले.
गोवा शिपयार्ड लिमिटेडने आरेखन आणि बांधणी केलेले आयसीजीएस अक्षय हे स्वदेशी जहाजबांधणीमधील आणखी एक महत्त्वपूर्ण यश असून ते आत्मनिर्भर भारताप्रति सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या जहाजाच्या समावेशामुळे भारताची देशांतर्गत जहाजबांधणी क्षमता आणि सागरी परिसंस्था अधिक मजबूत झाली आहे.
K2MI.jpeg)
***
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2278516)
आगंतुक पटल : 15