सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली हरिद्वारमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
'नशा मुक्त भारत सप्ताह' 2026 मध्ये 1.31 कोटींहून अधिक नागरिक झाले सहभागी
प्रविष्टि तिथि:
26 JUN 2026 3:30PM by PIB Mumbai
17 जून ते 26 जून 2026 या कालावधीत आयोजित 'नशा मुक्त भारत सप्ताह' मध्ये 1.31 कोटींहून अधिक नागरिक सहभागी झाले. या अंतर्गत जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये 'नशा मुक्ती मित्र' नोंदणी मोहीम, परिसंवाद व वेबिनार, मुले आणि तरुणांसाठी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम, पथनाट्ये (नुक्कड नाटक), लघुनाट्ये, घोषणा लेखन स्पर्धा, ई-प्रतिज्ञा, रॅली, योग सत्रे, स्वाक्षरी मोहिमा, निबंध लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि इतर अनेक लोकसहभाग उपक्रमांचा समावेश होता.

'अमली पदार्थ सेवन आणि तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिना'निमित्त या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते . 26 जून 2026 रोजी उत्तराखंडमधील हरिद्वार येथील देव संस्कृती विश्वविद्यालयात आयोजित राष्ट्रीय जनजागृती कार्यक्रमात याची सांगता झाली.

या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली 'नशामुक्त रॅली' आयोजित करण्यात आली होती. यात सुमारे 4,000 नागरिकांनी सहभाग नोंदवून अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय मोहिमेला व्यापक पाठिंबा दर्शवला. याप्रसंगी, केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थितांना 'अंमली पदार्थ विरोधी' आणि 'सन्मानाने वृद्धत्वाकडे वाटचाल करण्याची शपथ दिली. यातून अंमली पदार्थमुक्त आणि सर्वसमावेशक समाज घडवण्याप्रति सरकारची कटिबद्धता दिसून आली.
या कार्यक्रमात हजारो लोकांचा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे उत्साही सहभाग दिसून आला.यात विद्यार्थी, युवक , विविध आध्यात्मिक संस्थांचे स्वयंसेवक, उत्तराखंड सरकारचे प्रतिनिधी आणि इतर स्थानिक भागधारक यांचा समावेश होता.

'नशा मुक्त भारत अभियान' आणि 'अटल वयो अभ्युदय योजना' अंतर्गत , सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग व 'ऑल वर्ल्ड गायत्री परिवार' यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी हे या कार्यक्रमाचे एक प्रमुख वैशिष्ट्य होते.
अमली पदार्थांच्या व्यसनाबाबत जनजागृती करणे आणि त्याविरुद्ध समुदायांना संघटित करण्याच्या प्रयत्नांमध्ये 'नशा मुक्ती मित्रां'नी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखलही या कार्यक्रमात घेण्यात आली. 'नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत राज्य सरकारांनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील विजेते तसेच व्यसनमुक्त समाज घडवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान देणारे हितधारक यांनाही त्यांच्या योगदानाबद्दल गौरवण्यात आले.
'नशा मुक्त भारत सप्ताह 2026' आणि 'अमली पदार्थ सेवन आणि अवैध व्यापार विरोधी आंतरराष्ट्रीय दिन' यांच्या यशस्वी आयोजनातून , 'संपूर्ण शासन' आणि 'संपूर्ण समाज' या दृष्टिकोनातून व्यसनमुक्त समाज घडवण्याप्रति केंद्र सरकारच्या दृढनिश्चयाला बळकटी मिळाली. 'सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने ' सर्व नागरिक, संस्था, युवा संघटना, शैक्षणिक संस्था आणि समाजातील विविध हितधारकांना या राष्ट्रीय चळवळीत एकत्र काम करणे सुरू ठेवण्याचे आणि "नशा मुक्त भारत, खुशहाल भारत" हे स्वप्न साकार करण्यासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन केले.
***
निलिमा चितळे/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2278223)
आगंतुक पटल : 17