ऊर्जा मंत्रालय
भारताच्या अध्यक्षतेखाली गुरुग्राम येथे ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांच्या 11 व्या बैठकीचे आयोजन
ब्रिक्स देशांचा सामूहिक दृष्टिकोन आणि सहमती प्रतिबिंबित करणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांच्या 11 व्या संयुक्त जाहीरनाम्याच्या मंजुरीने बैठकीचा समारोप
भारताच्या अध्यक्षतेखालील एक महत्त्वाची फल निष्पत्ती म्हणजे 'स्मार्ट ग्रिड्स आणि ऊर्जा साठवणीसाठी ब्रिक्स डिजिटल सेंटर ऑफ एक्सलन्स'चा प्रारंभ
प्रविष्टि तिथि:
25 JUN 2026 7:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2026
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली 2026 मध्ये "लवचिकता, नावीन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी" या व्यापक संकल्पनेअंतर्गत ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांची 11 वी बैठक 25 जून 2026 रोजी हरियाणातल्या गुरुग्राम इथे यशस्वीपणे संपन्न झाली.
या बैठकीत महत्त्वाच्या जागतिक ऊर्जा आव्हानांवर आणि संधींवर चर्चा करण्यासाठी आणि ऊर्जा क्षेत्रात व्यावहारिक सहकार्य वाढवण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांचे ऊर्जा मंत्री, उपमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, जागतिक जैवइंधन आघाडी आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींनीही या चर्चेत भाग घेतला.
एनर्जी ट्रॅकच्या “सर्वेषां ऊर्जम् (सर्वांसाठी ऊर्जा)” या संकल्पनेने प्रेरित होऊन ही चर्चा तीन प्राधान्य क्षेत्रांवर केंद्रित होती:
प्राधान्य क्षेत्र 1: ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता - लवचिक ऊर्जा प्रणाली, वैविध्यपूर्ण ऊर्जा स्रोत, महत्त्वपूर्ण खनिजे, पुरवठा साखळीची लवचिकता, ग्रिडचे आधुनिकीकरण, ऊर्जा साठवण आणि सुरक्षित, परवडणारा ऊर्जा पुरवठा यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
प्राधान्य क्षेत्र 2: ऊर्जेची उपलब्धता आणि समानता - परवडणारी, विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जेची सार्वत्रिक उपलब्धता, स्वच्छ स्वयंपाकाचे पर्याय, परवडणारे अर्थसाहाय्य, क्षमता बांधणी आणि उदयोन्मुख बाजारपेठा तसेच विकसनशील अर्थव्यवस्थांना पाठबळ यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
प्राधान्य क्षेत्र 3: तंत्रज्ञान आणि नावीन्य - स्मार्ट ग्रिड्स, ऊर्जा साठवण, हायड्रोजन मूल्य साखळी, ऊर्जा प्रणालींचे डिजिटायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा कार्यक्षमता, जैवइंधन, कार्बन कॅप्चर तंत्रज्ञान आणि ब्रिक्स देशांमध्ये संशोधन आणि नावीन्यपूर्ण सहकार्य मजबूत करणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांनी राष्ट्रीय परिस्थिती, विकासाचे प्राधान्यक्रम आणि ऊर्जेचे वहनमार्ग यांचा आदर करण्याच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला.
ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता, नावीन्य, लवचिक पायाभूत सुविधा आणि क्षमता बांधणी या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्याबाबत ब्रिक्स देशांचा सामूहिक दृष्टिकोन आणि सहमती प्रतिबिंबित करणाऱ्या 11 व्या ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांच्या संयुक्त जाहीरनाम्याच्या मंजुरीने बैठकीचा समारोप झाला.
भारताचे ऊर्जा परिवर्तन आणि जागतिक नेतृत्व
या मंत्रीस्तरीय बैठकीला संबोधित करताना केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी अधोरेखित केले की, आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती आणि मानवी विकासासाठी ऊर्जा मूलभूत आहे. विकसनशील देशांना जनतेच्या रास्त आकांक्षा पूर्ण करताना शाश्वत विकासाचा पाठपुरावा करण्यासाठी पुरेसा वेळ, संसाधने आणि धोरणात्मक स्वातंत्र्य आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी “सर्वेषां ऊर्जम्” - सर्वांसाठी ऊर्जा या तत्त्वाने प्रेरित होऊन लवचिक, भविष्यासाठी सज्ज आणि लोककेंद्रित ऊर्जा प्रणाली उभारण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर भर दिला.
गेल्या दशकातल्या भारताच्या ऊर्जा परिवर्तनावर प्रकाश टाकताना मंत्र्यांनी नमूद केले की, भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा वीज उत्पादक आणि ग्राहक देश म्हणून उदयाला आला आहे, भारताची स्थापित वीज क्षमता जवळपास 540 गिगावॉट पर्यंत पोहोचली आहे आणि स्थापित क्षमतेमध्ये बिगरजीवाश्म स्रोतांचा वाटा निम्म्याहून अधिक आहे.भारतात स्वच्छ ऊर्जेचा विस्तार अत्यंत वेगाने होत असल्याचे अधोरेखित करत, देशात सौर ऊर्जा क्षमता, 2014 मध्ये 3 गिगावॉट होती, ती आता, 154 गिगा वॉट पर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, छतावर सौर ऊर्जा वापराला गती देण्यासाठी तसेच ऊर्जा संक्रमणात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी, पीएम सूर्य घर :मुफ्त बिजली योजना यांसारख्या पथदर्शी उपक्रमांची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली.


वर्ष 2032 पर्यंत, देशात, 400 GWh ऊर्जा साठवणूक क्षमता साध्य करण्याची भारताची महत्वाकांक्षा असल्याचे तसेच, 2047 पर्यंत 100 गिगावॉट अणुऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय, भारताने, 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य, निर्धारित वेळेआधीच, पूर्ण केले असून, जागतिक जैवइंधन आघाडी आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी अशा उपक्रमांचे भारत नेतृत्व करत असल्याचे, त्यांनी सांगितले.
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली साध्य झालेली फलनिष्पत्ती
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखालील एक महत्त्वपूर्ण यश म्हणजे ब्रिक्स ऊर्जा संशोधन सहकार्य मंचाखाली -ऊर्जा साठवणूक आणि स्मार्ट ग्रिड्ससाठीचे डिजिटल उत्कृष्टता केंद्र स्थापन होणे. (https://brics-dcoe.global/). हे केंद्र ब्रिक्स देशांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण, क्षमता विकास, धोरणात्मक व नियामक सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान तसेच विविध प्रायोगिक उपक्रमांच्या विकासासाठी सहकार्य मंच म्हणून कार्य करेल.
आणखी एक मैलाचा टप्पा पार करत, स्मार्ट ग्रिड्स आणि ऊर्जा साठवणूक विषयक ब्रिक्स मार्गदर्शक तत्वे, स्वीकारण्यात आली आहेत. विश्वासार्ह आणि परवडणारी ऊर्जा सर्वांना उपलब्ध व्हावी, यासाठी, आधुनिक, लवचिक आणि डिजिटल सुविधा असलेल्या ऊर्जा प्रणालीचे महत्व या मार्गदर्शक तत्वामध्ये लक्षात घेण्यात आले आहे. त्याचवेळी, अक्षय ऊर्जा आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञान त्यात जोडण्याचाही विचार करण्यात आला आहे.
यावेळी मंत्र्यांनी हायड्रोजन मूल्यसाखळीविषयक ब्रिक्स संयुक्त अहवाल अंतिम स्वरूपात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले. हा अहवाल हायड्रोजन तंत्रज्ञान, मानके , औद्योगिक उपयोग आणि भविष्यातील मूल्यसाखळ्या यांवरील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एक भक्कम पाया उपलब्ध करून देईल.
भारताच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ ऊर्जा अधिकाऱ्यांच्या स्तरावर झालेल्या अनेक फेऱ्यांतील सल्लामसलतींच्या बळावर अकराव्या ब्रिक्स ऊर्जा मंत्री परिषद बैठकीचे यशस्वी निष्कर्ष साध्य होऊ शकले.
संयुक्त निवेदनातून ऊर्जा सुरक्षा, समता आणि नवोन्मेषविषयक सामूहिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार
संयुक्त निवेदनात ऊर्जा सुरक्षा ही ब्रिक्स सहकार्याचा एक मूलभूत आधारस्तंभ असल्याचे पुन्हा अधोरेखित करण्यात आले. तसेच, विविधांगी, लवचिक आणि पारदर्शक ऊर्जा व्यवस्था तसेच पुरवठा साखळ्या विकसित करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
यावेळी ब्रिक्स देशांच्या ऊर्जा मंत्र्यांनी, समतोल आणि विविधांगी ऊर्जा मिश्रणे, स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम ऊर्जा तंत्रज्ञानाला प्रोत्साहन आणि जीवाश्म इंधन, अक्षय ऊर्जा, जैव इंधन, हायड्रोजन, ऊर्जा साठवणूक, महत्वाची खनिजे, कार्बन कॅप्चर तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन आणि ऊर्जा कार्यक्षमता अशा क्षेत्रात सहकार्य वाढवत, त्याचवेळी परवडणारा वित्तपुरवठा करण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
भविष्यातील ऊर्जा व्यवस्थांच्या घडणीत संशोधन आणि युवा सहभागाची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन, मंत्र्यांनी भारताच्या अध्यक्षतेदरम्यान ब्रिक्स युवा ऊर्जा शिखर परिषद आयोजित करण्याला पाठिंबा दर्शविला. तसेच, ब्रिक्स ऊर्जा संशोधन सहकार्य मंचाच्या माध्यमातून संशोधन, नवोन्मेष, ज्ञानविनिमय आणि क्षमता विकास यांमधील सहकार्य अधिक व्यापक करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
निलीमा चितळे/राधिका अघोर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2277945)
आगंतुक पटल : 11