नौवहन मंत्रालय
मुंबई बंदर प्राधिकरणाच्या 154 स्थापना दिनाच्या कार्यक्रमात, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या प्राधिकारणाचा वारसा आणि भविष्यातील योजनांची केली प्रशंसा
मुंबई बंदर प्राधिकरणाकडून, एकूण 5,028.17 कोटी रुपयांच्या तीन टप्प्यातील 63 प्रकल्पांचे सादरीकरण
भारताच्या सागरी प्रवासात मुंबई बंदर प्राधिकरणाचे विशेष स्थान असून, ही संस्था, गुंतवणूक, पर्यटन, लॉजिस्टिक्स आणि ऊर्जा सुरक्षा अशा क्षेत्रात नव्या संधी निर्माण करत आहे : जहाजबांधणी मंत्री
विकसित भारत 2047 च्या उभारणीत, मुंबई बंदर प्राधिकरणासारख्या संस्थांकडे महत्वाची जबाबदारी : जहाजबांधणी राज्यमंत्री
प्रविष्टि तिथि:
25 JUN 2026 6:28PM by PIB Mumbai
मुंबई, 25 जून 2026
केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीतील, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचा 154 वा स्थापना दिन आज केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री, शंतनू ठाकूर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
‘टुगेदर वुई कॅन’ म्हणजेच एकत्रितपणे आपण यशस्वी होऊ, या संकल्पनेवर हा स्थापना दिन साजरा करण्यात आला. यात, मुंबई बंदर प्राधिकरणाचे कार्यान्वयन आणि विकासात, अधिकारी, कर्मचारी, कामगार, बंदर वापरकर्ते, जहाज मार्ग, व्यापार भागीदार, सेवा प्रदाते आणि इतर सर्व भागधारकांच्या योगदानाची दखल घेत, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी आपल्या बीजभाषणात, केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी, या संस्थेची, 154 वर्षे यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. मुंबई बंदर प्राधिकरणाच्या प्रदीर्घ कार्याचे स्मरण करत, मुंबई शहराच्या केवळ एक बेटापासून ते भारताच्या वित्तीय आणि व्यवसायिक राजधानीपर्यंतच्या, प्रवासात, मुंबई बंदर प्राधिकरणाचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. या संस्थेच्या संपूर्ण परिवाराला शुभेच्छा देत, संस्थेच्या प्रत्येक यशामागे, अधिकारी, कर्मचारी, कामगार, बंदर वापरकर्ते आणि इतर भागधारकांचे सामूहिक योगदान असल्याचे, ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंदर-केंद्रीत विकास दूरदृष्टीचा उल्लेख करत सोनोवाल म्हणाले की, भारताच्या सागरी प्रवासात मुंबई बंदर प्राधिकरणाला विशेष स्थान आहे. हे बंदर गुंतवणूक, पर्यटन, लॉजिस्टिक्स आणि ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी मुंबई बंदर प्राधिकरणामार्फत राबवल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल, फेरी जेट्टी प्रकल्प, जवाहर द्वीप पुनर्भरण प्रकल्प तसेच ऊर्जा पायाभूत सुविधा प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांचाही उल्लेख केला.
मुंबई बंदर प्राधिकरणाने दीडशे वर्षांहून अधिक काळ व्यापार, उद्योग आणि सागरी समुदायाची सेवा केली आहे, असे राज्यमंत्री शंतनू ठाकूर यावेळी म्हणाले. बंदराची सातत्यपूर्ण वाढ आणि कार्यक्षमतेत अधिकारी, कर्मचारी, कामगार तसेच विविध भागधारकांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचीही त्यांनी दखल घेतली.
भारताच्या विकासात आधुनिक बंदरांचे वाढते महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले की, विकसित भारत 2047 च्या उभारणीत, मुंबई बंदर प्राधिकरणासारख्या संस्थांवर महत्त्वाची जबाबदारी आहे.
या बंदराला एक संपन्न वारसा लाभला असला तरी, क्रूझ पर्यटन, किनारपट्टी विकास, पर्यावरणपूरक कार्यपद्धती आणि बंदर मालमत्तेचा कार्यक्षम वापर यांसारख्या उपक्रमांद्वारे ते भविष्याचाही स्वीकार करत आहे, असे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव विजय कुमार यांनी नमूद केले. त्यांनी बंदराच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक 70 दशलक्ष टन मालवाहतुकीचा ठळक उल्लेख करत वाढ, कार्यक्षमता आणि सेवेतली उत्कृष्टता वाढवण्यासाठी भागधारकांच्या सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला.
आपल्या भाषणात मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू यांनी मान्यवर आणि उपस्थितांचे स्वागत केले. स्थापना दिवस हे संस्थेने राष्ट्राला दिलेल्या प्रदीर्घ सेवेचे स्मरण करण्याची आणि मुंबई बंदर प्राधिकरणाशी संबंधित सर्वांच्या योगदानाची दखल घेण्याचे निमित्त आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमादरम्यान स्थापना दिनाचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला, त्यामध्ये मुंबई बंदर प्राधिकरणाचा प्रवास आणि भारताच्या सागरी क्षेत्रातले त्याचे योगदान सादर करण्यात आले. या कार्यक्रमात 'इंदिरा डॉक ओ अँड एम करार' आणि 'विकसित भारत मुंबई मरिना करारा'ची देवाणघेवाणही झाली. हे करार मुंबई बंदर प्राधिकरणाचे बंदर कामकाज मजबूत करणे, किनारपट्टीचा विकास आणि बंदर मालमत्तेचा इष्टतम वापर करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहेत.
स्थापना दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, मुंबई बंदर प्राधिकरणाने तीन टप्प्यांत एकूण 5,028.17 कोटी रुपयांचे 63 प्रकल्प सादर केले. यामध्ये 132.29 कोटी रुपयांच्या 7 प्रकल्पांचे उद्घाटन, 1,354.59 कोटी रुपयांच्या 34 प्रकल्पांची पायाभरणी आणि 3,541.29 कोटी रुपयांच्या 22 प्रकल्पांच्या घोषणांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव विजय कुमार; मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू; मुंबई बंदर प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आदेश तितरमारे; जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष गौरव दयाल; आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे, मुंबई सीमाशुल्क झोन-I चे प्रधान मुख्य आयुक्त मयंक कुमार उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान मुंबई पोर्ट स्पोर्ट्स क्लबच्या 100 वर्षांच्या वाटचालीवर आधारित एक व्हिडिओही दाखवण्यात आला. क्रीडा क्षेत्रातले यशस्वी खेळाडू, भागधारक आणि कर्मचारी यांना त्यांच्या सेवेबद्दल, योगदानाबद्दल आणि कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या स्थापना दिनाच्या कार्यक्रमामुळे मुंबई बंदर परिवार, बंदर वापरकर्ते, व्यापारी भागीदार आणि भागधारक एका समान व्यासपीठावर एकत्र आले. यातून बंदराचे दैनंदिन कामकाज आणि विकासामध्ये योगदान देणारे कर्मचारी, चमू, यशस्वी खेळाडू आणि भागधारकांच्या प्रयत्नांचीही दखल घेण्यात आली.
मुंबई बंदर प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आदेश तितरमारे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांनी केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव, मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, भागधारक, पुरस्कार विजेते आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व चमूंचे आभार मानले.
सुषमा काणे/राधिका अघोर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2277921)
आगंतुक पटल : 20