अंतराळ विभाग
डॉ.जितेंद्र सिंग यांनी ‘ब्रिक्स अंतराळ अर्थव्यवस्थेचा’ केला पुरस्कार
बंगळूरू येथे झालेल्या ‘ब्रिक्स’ अंतराळ संस्था प्रमुखांच्या बैठकीत मजबूत आणि लवचिक अर्थव्यवस्था उभारण्यासाठी सामुहिक प्रयत्नांचे केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
24 JUN 2026 10:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2026
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र भार) आणि पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज, ‘ब्रिक्स अंतराळ अर्थाव्यवस्था’ ही जागतिक विकासाची पुढील आघाडी असल्याचे प्रतिपादन केले. त्याचबरोबर, नवोन्मेष, गुंतवणूक, उद्योजकता आणि शाश्वत विकास या क्षेत्रांतील नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘ब्रिक्स’ सदस्य देशांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही केले.
बेंगळूरू येथे आयोजित ‘ब्रिक्स’ सदस्य देशांच्या अंतराळ संस्थांच्या प्रमुखांच्या (एचओएसए) बैठकीच्या, समारोपसत्राला ते संबोधित करत होते. वेगाने विस्तारणाऱ्या जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास येण्यासाठी आवश्यक असलेली व्याप्ती, वैज्ञानिक क्षमता, तांत्रिक सामर्थ्य आणि औद्योगिक क्षमता ब्रिक्स देशांकडे आहे असं डॉ. जितेंद्र सिंग यावेळी बोलताना म्हणाले.
“अलिप्त राहणाऱ्या देशांकडून अंतराळ अर्थव्यवस्थेचे भविष्य घडवले जाणार नाही, तर, भागीदारी, सामायिक नवोन्मेष आणि सामूहिक महत्त्वाकांक्षेच्या माध्यमातून ते साकार होईल. उदयोन्मुख जागतिक अंतराळ परिसंस्थेचा एक अत्यंत भक्कम आधारस्तंभ होण्याची क्षमता ‘ब्रिक्स’ सदस्य देशांमध्ये आहे,” असे डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले.
यावेळी मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते भारतीय अंतराळ उद्योगाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले. तसंच, बैठकीत सहभागी झालेल्या देशांच्या अंतराळ संस्थांच्या प्रमुखांसोबत स्मृतिचिन्हांचे आदान-प्रदान करण्यात आले. भारतात वेगाने विकसित होत असलेल्या ‘न्यूस्पेस’ क्षेत्रातील प्रतिनिधींशी यावेळी संवाद साधण्यात आला. या संवादातून, ‘ब्रिक्स’च्या प्रतिनिधी मंडळासमोर, अंतराळ क्षेत्रातील भारतीय स्टार्ट-अप्स आणि खाजगी उद्योगांच्या वाढत्या क्षमतांचे दर्शन झाले.
ब्रिक्स सदस्य देशांचे 2026 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्या अंतर्गत, इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्यावतीने या दोन दिवसीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ब्राझील, चिन, इजिप्त, इथिओपिआ, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती या देशांतील अंतराळ संस्थांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
या बैठकीत, ‘ब्रिक्स’ सदस्य देशांतील अंतराळ सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसंच अंतराळ शाश्वतता, कचरामुक्त मोहिमा, ब्रिक्स रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट कॉन्स्टेलेशन ( आरएसएससी), विद्यमान सहकार्य यंत्रणांमध्ये नवीन ब्रिक्स सदस्यांचा सहभाग वाढवणे आणि प्रस्तावित ब्रिक्स अंतराळ परिषदेतील चर्चा पुढे नेणे, या आणि अशा प्रमुख मुद्द्यांवर उहापोह करण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन, पृथ्वी निरीक्षण, क्षमता उभारणी आणि ज्ञानाची देवाण-घेवाण आदी क्षेत्रांत भविष्यातील सहकार्यावरदेखील या बैठकीत विचार-विनिमय करण्यात आला.
जागतिक अवकाश क्षेत्रातील ब्रिक्सच्या वाढत्या भूमिकेचा उल्लेख करत मंत्र्यांनी सांगितले की, हा समूह जगाच्या लोकसंख्येचा, आर्थिक उत्पादनाचा, वैज्ञानिक कौशल्याचा आणि तांत्रिक क्षमता यांच्या मोठ्या भागाचे प्रतिनिधित्व करतो. ब्रिक्स देशांमधील अधिक सखोल सहकार्यामुळे नवकल्पना, औद्योगिक भागीदारी, तंत्रज्ञान हस्तांतरण, गुंतवणूक आणि आर्थिक वाढीसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात, तसेच सामायिक विकासात्मक प्राधान्यांनाही चालना मिळू शकते.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, ब्रिक्स रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट कॉन्स्टेलेशनने सदस्य देशांमधील उपग्रह डेटा सामायिकरणाद्वारे अवकाश क्षेत्रातील सहकार्याचे महत्त्व आधीच सिद्ध केले आहे. प्रस्तावित ब्रिक्स स्पेस कौन्सिलसह संस्थात्मक यंत्रणांबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे अवकाश क्षेत्रातील भविष्यातील सहकार्याला अधिक गती आणि सातत्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शाश्वततेच्या महत्त्वावर भर देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, अवकाश क्षेत्रातील दीर्घकालीन भवितव्य हे बाह्य अवकाश सुरक्षित, संरक्षित आणि शाश्वत क्षेत्र म्हणून जपण्यावर अवलंबून आहे. वाढत्या अवकाश वाहतुकीमुळे आणि निरुपयोगी उपग्रहांच्या अवशेषांमुळे अवकाशात निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक आंतरराष्ट्रीय सहकार्य, पारदर्शकता, जबाबदार वर्तन आणि क्षमता विकास आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अवशेषमुक्त मोहिमा आणि शाश्वत अवकाश कार्यप्रणाली यासंदर्भात बैठकीत झालेल्या चर्चेचे त्यांनी स्वागत केले आणि भविष्यातील पिढ्यांसाठी अवकाश पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले.
“ब्रिक्स राष्ट्रांनी केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता सह-विकास, सह-नवकल्पना आणि सह-निर्मितीकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. आपले शास्त्रज्ञ, अभियंते, उद्योग, स्टार्टअप्स आणि युवा नवोन्मेषक यांना एकत्र आणून आपण जागतिक आव्हानांसाठी उपाय विकसित करू शकतो, नवीन आर्थिक संधी निर्माण करू शकतो आणि वैज्ञानिक प्रगती तसेच सामायिक समृद्धीसाठी अधिक मजबूत चौकट उभारू शकतो,” असे ते म्हणाले.
सामायिक आकांक्षा ठोस परिणामांमध्ये रूपांतरित करण्यासाठी आणि विकास, लवचिकता, नवकल्पना, शाश्वतता तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी अवकाश हा प्रभावी घटक म्हणून कायम राहावा यासाठी भारत सर्व ब्रिक्स भागीदारांसोबत घनिष्ठपणे काम करण्यास कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी मंत्र्यांनी केला.




सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/सविता म्हसकर/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2277611)
आगंतुक पटल : 15