वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषी-अन्न उत्पादनांच्या निर्यातीत नवोन्मेष आधारित वाढीला गती देण्यासाठी आयोजित 'अपेडा'चा (APEDA) 'भारती'(BHARATI) कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न


22 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 100 स्टार्टअप्सनी निर्यात-केंद्रित 'ॲक्सलरेशन'कार्यक्रम पूर्ण केला

प्रविष्टि तिथि: 24 JUN 2026 9:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जून 2026

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत, अपेडा (APEDA), अर्थात  कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने 'भारती' (BHARATI - Bharat's Hub for Agritech, Resilience, Advancement and Incubation for Export Innovation), या आपल्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीरीपणे पूर्ण केला. हा कार्यक्रम भारताच्या कृषी-अन्न निर्यात क्षेत्रात नवोन्मेष आधारित विकासाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आला असून, तो निर्यात-सक्षमीकरण आणि ॲक्सलरेशन (गती) साधणारा उपक्रम आहे. भागधारकांना सहकार्य करण्यापलीकडे जाऊन, 'भारती' (BHARATI) एक अशी गतिमान परिसंस्था विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, जी 2030 पर्यंत 'अपेडा' (APEDA) निर्धारित उत्पादनांमध्ये 50 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी निर्यात साध्य करण्याच्या भारताच्या उद्दिष्टाशी सुसंगत असेल.

भारताची कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांची निर्यात वाढवू शकणारी नाविन्यपूर्ण उत्पादने, तंत्रज्ञान आणि उपाययोजना विकसित करणाऱ्या उच्च क्षमता असलेल्या स्टार्टअप्सना शोधण्यासाठी, त्यांना घडवण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. उद्योजकता, नवोन्मेष, मूल्यवर्धन, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि जागतिक बाजारपेठेची तयारी, याला प्रोत्साहन देऊन देशाची कृषी-अन्न निर्यात परिसंस्था बळकट करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या पहिल्या गटात 22 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 100 स्टार्टअप्सचा समावेश होता, देशभरातून प्राप्त झालेल्या 700 हून अधिक अर्जांमधून कठोर आणि बहु-स्तरीय मूल्यमापन प्रक्रियेद्वारे त्यांची निवड करण्यात आली. या गटात कृषी-अन्न उत्पादनांशी संबंधित 68 स्टार्टअप्स, 26 निर्यातीला सहाय्य करणाऱ्या तंत्रज्ञान आणि सेवा पुरवठादार कंपन्या, तसेच सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी (एसपीएस) उपाययोजना, ट्रेसेबिलिटी, गुणवत्ता हमी आणि अनुपालन उपाययोजनांच्या क्षेत्रात काम करणारे सहा नवोन्मेषक यांचा समावेश होता.

भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेतील विविधता आणि चैतन्य प्रतिबिंबित करणाऱ्या या समूहात 17 ते 75 वर्षे वयोगटातील उद्योजक सहभागी झाले होते. त्यांचा सहभाग कृषी-अन्न निर्यात मूल्य साखळीमधील नावीन्यपूर्णता आणि तंत्रज्ञान-आधारित उपायांचा वाढता अवलंब अधोरेखित करतो.

सहभागी स्टार्टअप्सनी 120 तासांच्या संरचित, निर्यात-केंद्रित ॲक्सलरेशन कार्यक्रमात भाग घेतला, यात निर्यात सज्जता, बाजारपेठ प्रवेश, व्यवसाय विस्तार, नियामक अनुपालन, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि गुंतवणूकदारांची सज्जता याचा समावेश होता. या कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक मार्गदर्शन (मेंटॉरशिप), उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे 'मास्टरक्लासेस' आणि सरकारी संस्था, उद्योग संस्था, वित्तीय संस्था, निर्यातदार आणि गुंतवणूकदार यासारख्या विविध घटकांशी संवाद साधण्याची संधी देखील प्रदान केली. या परस्परसंवादांमुळे स्टार्टअप्सना व्यावसायिक भागीदारी शोधणे, बाजारपेठेतील दुवे बळकट करणे आणि निर्यातीसाठीची आपली सज्जता वाढवणे शक्य झाले.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संधी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, 'अपेडा'ने (APEDA) दुबईतील 'गल्फूड 2026' (Gulfood 2026) या जगातील सर्वात मोठ्या खाद्यपदार्थ आणि पेय व्यापार प्रदर्शनांपैकी एक असलेल्या प्रदर्शनात भारतातील आठ प्रमुख स्टार्टअप्सच्या सहभागाला सहाय्य केले. या कार्यक्रमामुळे जागतिक खरेदीदारांशी थेट संपर्क साधणे शक्य झाले आणि आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रातील संबंधितांशी उच्च-मूल्याचे B2B व्यवहार आणि संवाद साधणे सुलभ झाले. यावेळी स्टार्टअप्स आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी आणि आयातदार यांच्यात 100 हून अधिक B2B बैठका घेण्यात आल्या आणि संभाव्य खरेदीदारांना उत्पादनांचे नमुने दाखवण्यात आले.

देशाच्या निर्यात वृद्धीच्या धोरणात नवोन्मेष आणि उद्योजकतेचा समावेश करण्याच्या 'अपेडा'च्या (APEDA) प्रयत्नांमधील पहिल्या कार्यक्रमाची यशस्वीपणे पूर्तता, हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या उपक्रमामुळे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक स्टार्ट अप्सच्या उदयाला पाठबळ मिळेल आणि मूल्यवर्धन, बाजारपेठेतील वैविध्य आणि शाश्वत निर्यात वाढीसाठी नवीन संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.

कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत, भारतीय अन्न आणि कृषी व्यापारासाठी नवोन्मेषी निर्यात उपाय विकसित करणाऱ्या ‘भारती’ (BHARATI) उपक्रमांतर्गत समर्थित स्टार्टअप्सनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे. दोन कृषी-तंत्रज्ञान स्टार्टअप्सनी सहकार्य करत जीआय-टॅग असलेल्या जर्दाळू आंब्याच्या      सुमारे 37 मेट्रिक टन निर्यातीची दुबईला यशस्वी अंमलबजावणी केली. तसेच, आणखी एका स्टार्टअपने कर्नाटकातील शेतकरी उत्पादक संस्थांकडून (एफपीओ) मिळालेल्या भरडधान्याचा वापर करून न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे न्यूट्रास्युटिकल-आधारित आणि वनस्पतीजन्य रेडी-टू-कूक खाद्यपदार्थांची पहिली सागरी निर्यात केली.

मध्य प्रदेशातील सेंद्रिय उत्पादनांशी संबंधित एका स्टार्टअपने, ज्यामध्ये कडधान्ये, भरडधान्ये आणि पारंपरिक धान्यांचा समावेश आहे, संयुक्त अरब अमिरातीतील एका अग्रगण्य सुपरमार्केट साखळीशी निर्यातीसाठी सामंजस्य करार (एमओयू) केला. फळांसाठी बॅगिंग उपाय, आंबा बाग व्यवस्थापन सेवा आणि काढणीनंतरची साधने उपलब्ध करून देणाऱ्या एका कृषी-तंत्रज्ञान स्टार्टअपने अपेडा-नोंदणीकृत निर्यातदारासोबत सहकार्य करून चालू हंगामात सिंगापूरला सुमारे 5 मेट्रिक टन आंब्याची निर्यात केली.

महाराष्ट्रातील एका शेतकरी उत्पादक कंपनीने (एफपीसी) जीआय-टॅग असलेल्या अंजीर रस आणि जांभूळ-आधारित रसाचे सुमारे 850 किलो उत्पादन अमेरिका आणि युनायटेड किंगडमला निर्यात केले. त्यानंतर त्यांना याच बाजारपेठेतून सुमारे 1.25 मेट्रिक टनची पुन्हा ऑर्डर मिळाली. आणखी एका महत्त्वपूर्ण यशात, 12 राज्यांतील 1,600 हून अधिक शेतकऱ्यांच्या जाळ्याशी जोडलेल्या कर्नाटकस्थित स्टार्टअपने कडधान्ये, पारंपरिक धान्ये आणि इंद्रायणीसारख्या जीआय-टॅग असलेल्या स्थानिक तांदळाच्या जातींसह 40 मेट्रिक टन सेंद्रिय उत्पादनांची, तसेच 5 मेट्रिक टन मूल्यवर्धित उत्पादनांची संयुक्त अरब अमिराती आणि युरोपियन युनियन बाजारपेठेत निर्यात केली. पुढील एक ते दोन महिन्यांत अमेरिका, युरोपियन युनियन आणि संयुक्त अरब अमिराती बाजारपेठेत 40 मेट्रिक टनांहून अधिक निर्यातीचा अंदाज आहे.

याशिवाय, केरळमधील एका स्टार्टअपला ओमानकडून भरडधान्य-आधारित उत्पादनांसाठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. दुबई बाजारपेठेसाठी मखाना, तसेच जपान आणि कॅमेरून बाजारपेठांसाठी रेडी-टू-ईट आणि रेडी-टू-कूक उत्पादनांबाबत इतर अनेक स्टार्टअप्सशी चर्चा सुरू आहे. तसेच, मध्य प्रदेशातील एका स्टार्टअपने क्विक-कॉमर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे देशांतर्गत बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढवली असून भारतातील विविध राज्यांतील 100 किरकोळ विक्री केंद्रांपर्यंत विस्तार साधला आहे.

‘भारती’ उपक्रमांतर्गत स्टार्टअप्सनी मिळवलेले हे यश निर्याताभिमुख नवोन्मेषाला गती देणे आणि भारताच्या कृषी-अन्न निर्यात परिसंस्थेला बळकटी देण्यात या कार्यक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते. पहिल्या टप्प्याच्या यशाच्या पार्श्वभूमीवर, अपेडा लवकरच ‘भारती’ कार्यक्रमाची पुढील आवृत्ती सुरू करणार आहे. यामुळे कृषी-अन्न निर्यात क्षेत्रासाठी नवोन्मेषी उपाय विकसित करणाऱ्या स्टार्टअप्सना अधिक व्यापक पाठबळ मिळेल. नवकल्पना, मूल्यवर्धन आणि शाश्वत वाढीसाठी नव्या संधी निर्माण करत भारताच्या कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यातीच्या दीर्घकालीन विस्तार आणि विविधीकरणात हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा अपेडाचा विश्वास आहे.

शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/गजेंद्र देवडा /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2277590) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Kannada