निती आयोग
युवकांचे नेतृत्व लाभलेल्या सहा शाश्वत विकासासंबंधी स्टार्टअप्सने जिंकले 'युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज 2026'
चक्रीय अर्थव्यवस्था, शाश्वत वस्त्रोद्योग आणि अन्न प्रणाली या क्षेत्रांतील अग्रगण्य नवोन्मेषकांना टी-हब, हैदराबाद येथे सन्मानित करण्यात आले; 28 राज्यांमधील 350 हून अधिक अर्जदारांमधून त्यांची निवड करण्यात आली
प्रविष्टि तिथि:
24 JUN 2026 2:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2026
चक्रीय अर्थव्यवस्था नवोपक्रम, शाश्वत वस्त्रोद्योग आणि फॅशन, तसेच शाश्वत अन्न प्रणाली आणि जलसंधारण यांद्वारे शाश्वत विकासाला चालना देणारे नाविन्यपूर्ण उपाय विकसित केल्याबद्दल, भारतभरातील युवा-नेतृत्व लाभलेल्या सहा स्टार्टअप्सना 'युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज 2026 च्या आठव्या वर्षीचे विजेते म्हणून गौरविण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) इंडिया आणि सिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली, अटल इनोव्हेशन मिशन (AIM) यांच्या सहकार्याने टी-हब फाउंडेशनद्वारे राबविण्यात आलेला 'युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज' हा उपक्रम, शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या (SDGs) दिशेने प्रगतीला गती देणाऱ्या युवा-नेतृत्व लाभलेल्या नवकल्पनांना सक्षम करण्यासाठी भारतातील एक प्रमुख व्यासपीठ म्हणून उदयास आला आहे.
यावर्षी, 28 राज्यांमधील युवा-नेतृत्व लाभलेल्या स्टार्टअप्सकडून या स्पर्धेसाठी 350 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. एका कठोर निवड प्रक्रियेनंतर, 50 उच्च-क्षमताप्राप्त स्टार्टअप्सना 'नॅशनल स्प्रिंगबोर्ड प्रोग्राम'मध्ये समाविष्ट करण्यात आले. हा एक तीन महिन्यांचा क्षमता-बांधणीचा आभासी उपक्रम होता आणि त्याला 16 विशेष उद्योग मार्गदर्शक आणि त्या क्षेत्रांतील तज्ञांच्या निवडक गटाचा पाठिंबा मिळाला होता.
सहभागी स्टार्टअप्सनी तीन विशिष्ट विषय क्षेत्रांमध्ये काम केले:
• शाश्वत वस्त्रोद्योग आणि फॅशन
• चक्रीय अर्थव्यवस्थेतील नवोपक्रम
• शाश्वत अन्नप्रणाली आणि जलसंधारण
4 जून 2026 रोजी आयोजित राष्ट्रीय नवोन्मेष संवादादरम्यान सर्व सहभागी 50 स्टार्टअप्सनी प्रतिष्ठित परिक्षक विषयतज्ञांसमोर आपले सादरीकरण केले. मूल्यांकनानंतर, अव्वल दर्जाचे 20 स्टार्टअप्स 15 ते 19 जून 2026 दरम्यान टी-हब, हैदराबाद येथे आयोजित प्रादेशिक इमर्शन बूटकॅम्पसाठी पात्र ठरले.
पाच दिवसांच्या या सखोल कार्यक्रमात, व्यवसाय प्रारूपे मजबूत करण्यासाठी आणि विस्तारपूर्वक प्रभावित करण्यासाठी तयार केलेले प्रशिक्षण वर्ग, मार्गदर्शन सत्रे, स्थळभेटी आणि समवयस्कांसह शिक्षणाच्या संधींच्या माध्यमातून परिसंस्थेतील नेते, शाश्वत विकास तज्ञ, गुंतवणूकदार, सरकारी हितसंबंधित आणि उद्योजक यांना एकत्र आणण्यात आले. 18 जून 2026 रोजी झालेल्या परिक्षकांच्या अंतिम मूल्यांकनानंतर, विस्तारक्षम आणि उच्च-परिणामकारक उपायांसाठी त्यांतील सहा स्टार्टअप्सची निवड करण्यात आली. त्यातील तीन विजेत्या स्टार्टअप्सना प्रत्येकी 3,50,000 रुपयांचे बीज निधी (सीड ग्रँट) सहाय्य, तसेच क्षमता-बांधणीच्या संधी आणि इकोसिस्टममध्ये प्रवेश देण्यात आला. तीन उपविजेत्यांना त्यांच्या आश्वासक योगदानाची आणि विस्ताराच्या क्षमतेची दखल घेऊन प्रत्येकी 2,20,000 रुपये प्रदान करण्यात आले.
विजेते: नवप्रयोग लॅब्स एलएलपी (ग्रासिप),अनबबल आणि इकोरेनोवा सोल्युशन्स प्रा.लि.
उपविजेते: इको कुशन (Eco Cushion), वासुदेव इनोव्हेशन्स (Vasudeva Innovations) आणि वुमनास्टिक-सीओ (WomenasticCO).
हे पुरस्कार UNDP, AIM, T-Hub, सरकारी संस्था, गुंतवणूकदार आणि नाविन्यपूर्ण परिसंस्थेतील प्रमुख वरीष्ठ प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
"भारताची हरित अर्थव्यवस्था घडवण्यासाठी: युवा, भांडवल आणि नवोन्मेषाचे पुढील दशक' या विषयावर विशेष भाषण करताना, तेलंगणा सरकारमधील तेलंगणा इनोव्हेशन सेलचे (TGIC) मुख्य कार्यकारी अधिकारी, मेराज फहीम म्हणाले, "युथ को:लॅबसारखे उपक्रम आपल्या समोरील काही अत्यंत महत्त्वाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवोन्मेष, सहकार्य आणि युवा नेतृत्वाची शक्ती अधिक दृढ करतात. या प्रवासाचा एक भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही अशा परिसंस्थांचे संगोपन करण्यास कटिबद्ध आहोत, जे आपल्या तरुण परिवर्तनकर्त्यांना त्यांच्या संकल्पनांचे अर्थपूर्ण प्रभावात रूपांतर करण्यास सक्षम करतील."
"भारतात स्टार्टअपची समस्या नाही. भारतात वितरण ही समस्या आहे. भांडवलाचे वितरण - बंगळूर आणि दिल्लीमध्ये अधिक प्रमाणात एकवटले आहे. मार्गदर्शनाचे वितरण - तृतीय श्रेणी शहरांत आणि ईशान्य भारतात खूपच कमी आहे. संधींचे वितरण - महिला, दिव्यांग व्यक्ती आणि सामाजिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीच्या संस्थापकांसाठी खूपच मर्यादित आहे.
"वितरणाची ही समस्या सोडवण्यासाठी 'युथ को: लॅब' सारख्या कार्यक्रमांची मदत होते;आणि आज आम्ही सादर करत असलेले पुरावे असे सूचित करतात, की त्यांनी तसे करण्यास सुरुवात केली आहे," असे नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे कार्यक्रम संचालक प्रतीक देशमुख म्हणाले.
भारताच्या सर्वात मोठ्या साधनसंपत्तींपैकी एक म्हणजे येथील युवाशक्ती. देशाची जवळपास 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांखालील असल्याने, तरुण नवोन्मेषकांना त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण किती प्रभावीपणे पाठिंबा देतो, यावरच देशाची विकास आणि हवामानविषयक उद्दिष्ट्ये साध्य करण्याची क्षमता अवलंबून असेल. कचरा आणि पाण्याची टंचाई यांपासून ते अशाश्वत उत्पादन प्रणालींपर्यंत, आपल्या काळातील काही अत्यंत गंभीर आव्हानांवर उपाय घेऊन 350 हून अधिक स्टार्टअप्स पुढे आले. निवडलेल्या उपक्रमांपैकी 40 टक्क्यांहून अधिक उपक्रम महिलांच्या नेतृत्वाखालील आहेत, जे भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेला चालना देणाऱ्या प्रतिभेची विविधता दर्शवते.
आमच्या भागीदारांच्या पाठिंब्याने, एक चांगले भविष्य सक्रियपणे घडवणाऱ्या पिढीमध्ये गुंतवणूक करताना आम्हाला अभिमान वाटतो,” असे यूएनडीपी इंडियाच्या निवासी प्रतिनिधी डॉ. अँजेला लुसिगी यावेळी म्हणाल्या.
समापन सोहळ्यात "पायाभूत सुविधा म्हणून समावेशन: सर्वांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नवोन्मेष परिसंस्थांची उभारणी" या विषयावर एक पॅनल चर्चा देखील आयोजित करण्यात आले होते, टी-हबच्या जीसीसी स्टार्टअप विभागाचे प्रमुख पंकज वैश यांनी त्याचे संचलन केले. पॅनेलमध्ये श्राव्या कनिथी (वरिष्ठ व्यावसायिक - शिक्षण आणि सर्वसमावेशकता), मानबेंद्र सन्याल (मुख्य कार्यकारी अधिकारी, युथ एड फाउंडेशन) आणि वैजयंती वसंत मोगली (विकास क्षेत्रातील व्यावसायिक आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या 'न्यायमूर्ती आशा मेनन सल्लागार समिती'च्या सदस्या) यांचा समावेश होता.
"बेटिंग ऑन यूथ: व्हॉट इन्व्हेस्टर्स अँड इन्स्टिट्यूशन्स लूक इन द नेक्स्ट जनरेशन ऑफ इम्पॅक्ट फाउंडर्स" या दुसऱ्या पॅनेल चर्चेचे संचालन एआयएमचे इनोव्हेशन लीड वितस्ता तिवारी यांनी केले. सिद्धार्थ मोहंती, संस्थापक, ब्रह्म कमळ आणि एंजल इन्व्हेस्टर, विवेक वर्मा, संस्थापक आणि सीईओ, अपसर्ज ग्लोबल, अमित कुमार, प्रमुख, शाश्वत समावेशक विकास, यूएनडीपी इंडिया, प्रतीक देशमुख, कार्यक्रम प्रमुख, एआयएम, आणि पद्मावती अन्नपूर्णा, उपाध्यक्ष, कौशल्य विकास, एएलईएपी, यांनी या चर्चेत भाग घेतला.
युथ को: लॅब
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) आणि सिटी फाउंडेशन यांनी 2017 मध्ये संयुक्तपणे सुरू केलेल्या 'युथ को-लॅब' या उपक्रमाचा उद्देश आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशांसाठी एक सामायिक कार्यसूची निश्चित करणे हा आहे. याद्वारे तरुणांचे सक्षमीकरण आणि त्यांच्यातील गुंतवणूक साधली जाईल, जेणेकरून नेतृत्व, सामाजिक नवोपक्रम आणि उद्योजकता याच्या माध्यमातून ते 'शाश्वत विकास उद्दिष्टे' (एसडीजी) च्या अंमलबजावणीला गती देऊ शकतील. यूथ को: लॅब बद्दल अधिक माहिती येथे वाचता येईल:
अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम)
'सेल्फ-एम्प्लॉयमेंट अँड टॅलेंट युटिलायझेशन' (एसईटीयू) चा समावेश असलेला 'एआयएम' हा नवोन्मेश आणि उद्योजकतेच्या संस्कृतीला चालना देणारा भारत सरकारचा एक उपक्रम आहे. जागतिक दर्जाची इनोव्हेशन हब, मोठी आव्हाने, स्टार्ट-अप व्यवसाय आणि विशेषत: तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या इतर उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून काम करणे, हे याचे उद्दिष्ट आहे.
यूएनडीपी
यूएनडीपी 170 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये काम करते, आणि दारिद्र्य निर्मूलन तसेच असमानता आणि सामाजिक बहिष्कृतता कमी करण्याच्या प्रयत्नांना समर्थन देते. भारतात, शाश्वत विकास उद्दिष्टांची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याला गती देण्यासाठी यूएनडीपी ची भारत सरकारसोबत भागीदारी आहे. ते शाश्वत आणि समावेशक विकास, हवामानविषयक कृती आणि अधिक सक्षम ऊर्जा आणि पर्यावरण प्रणालींना चालना देते. यूएनडीपी, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लवचिकता निर्माण करायला आणि आरोग्य व्यवस्था बळकट करायलाही सहाय्य करते. येथे भेट द्या: https://www.undp.org/india
सिटी फाउंडेशन
सिटी फाउंडेशन जगभरातील अल्प-उत्पन्न गटातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी काम करते. आम्ही अशा उपक्रमांमध्ये गुंतवणूक करतो, जे आर्थिक समावेशकता वाढवतात, तरुणांसाठी रोजगाराच्या संधींना चालना देतात आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध समुदाय उभारण्याच्या दृष्टिकोनाचा नव्याने विचार करतात. सिटी फाउंडेशनचा “केवळ परोपकारापेक्षा अधिक” हा दृष्टिकोन, आमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि वैचारिक नेतृत्व आणि नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी सिटी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांच्या अफाट कौशल्याचा लाभ घेतो. अधिक माहितीसाठी, भेट द्या: www.citifoundation.com
टी-हब
टी-हब हे जगातील सर्वात मोठे स्टार्टअप हब आहे, जे संस्थापकांना कार्यक्रम, भागीदारी आणि जागतिक प्रवेशाद्वारे जगातील काही महत्त्वपूर्ण इनक्युबेशन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे पाठबळ देते.
हे व्यासपीठ स्टार्टअप्स, कॉर्पोरेट कंपन्या, शैक्षणिक संस्था, सरकारी संस्था, गुंतवणूकदार आणि जागतिक बाजारपेठांना एकत्र आणते, जेणेकरून संस्थापकांना कल्पनेच्या टप्प्यापासून ते व्यवसायाच्या विस्तारापर्यंत सहाय्य करता येईल. विविध क्षेत्रांमधील समूह-आधारित उपक्रमांच्या माध्यमातून, टी-हब संस्थापकांना अग्रगण्य मार्गदर्शकांशी जोडले जायला आणि त्यांच्या व्यवसायाच्या टप्प्याला अनुरूप आणि संरचित पाठबळ मिळवण्यासाठी सक्षम करते. येथे भेट द्या: www.t-hub.co
नितीन फुल्लुके /संपदा पाटगावकर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2277403)
आगंतुक पटल : 16