संरक्षण मंत्रालय
संरक्षण राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे संरक्षण माहिती तंत्रज्ञान सल्लागार समितीची 15 वी बैठक
प्रविष्टि तिथि:
23 JUN 2026 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2026
'एकात्मिक संरक्षण कार्यबल मुख्यालय' अर्थात 'हेडक्वार्टर इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ'द्वारे 23 जून 2026 रोजी नवी दिल्लीत संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या अध्यक्षतेखाली 'संरक्षण संबंधित माहिती तंत्रज्ञान सल्लागार समिती'ची 15वी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील 'आत्मनिर्भरता' आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान-साधनांचा कालबद्ध पद्धतीने अवलंब या मुद्द्यांवर प्रामुख्याने भर देण्यात आला.

युद्धतंत्राचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन संरक्षण दलांमध्ये 'डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजीज' (क्रांतिकारी तंत्रज्ञान) वापरण्यासंदर्भातील महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांवर तज्ज्ञांनी या बैठकीत सविस्तर चर्चा केली. प्रगत चिप निर्मितीचे स्वदेशीकरण ते स्वतंत्र संचालन प्रणाली आणि डेटाबेस विकसित करण्यासोबतच आणि संरक्षणाच्या गरजांनुसार मोक्याच्या ठिकाणी डेटा सेंटर्सची उभारणी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा सदस्यांनी ऊहापोह केला. सरकारच्या 'विकसित भारत'च्या ध्येयानुसार, केवळ संरक्षण दलांसाठीच नव्हे तर देशाच्या तांत्रिक विकास प्रक्रियेच्या दृष्टीने दीर्घकाळ लाभदायक असलेल्या प्रकल्पांनाही समितीने मंजुरी दिली.
या बैठकीला एकात्मिक संरक्षण कार्यबल मुख्यालय, लष्कर, नौदल, हवाई दल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्यासह इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकारी, तसेच अभ्यासक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

* * *
सोनाली काकडे/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2277122)
आगंतुक पटल : 10