कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयएएस ई- सिव्हिल यादी 2026 चे अनावरण केले, तंत्रज्ञान - आधारित क्षमता निर्धारणामुळे प्रशासन आणि प्रशासकीय नियोजनाला बळकटी मिळते
प्रविष्टि तिथि:
22 JUN 2026 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2026
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे आयएएस ई-सिव्हिल यादी 2026 चे अनावरण केले.
शासनातील तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व विशद करतांना ते म्हणाले की, ई-सिव्हिल लिस्ट सारखी डिजिटल व्यासपीठे प्रशासकीय नियोजन, अधिकाऱ्यांमधील क्षमतांची ओळख आणि देशभरात मानवी संसाधनांच्या प्रभावी वापरासाठी महत्त्वाची साधने ठरली आहेत. अधिकाऱ्यांची पात्रता, अनुभव, पद आणि पदावरील नियुक्ती याबाबतची माहिती सहज उपलब्ध झाल्यामुळे सरकार आणि संस्थांना योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेणे शक्य होते आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्था बळकट होते.

यातील प्रगत शोध आणि हायपरलिंकिंग यांचा संदर्भ देत ते म्हणाले की, डिजिटल स्वरूपामुळे वापरकर्त्यांना अधिकाऱ्यांची व्यावसायिक पार्श्वभूमी, विशिष्ट क्षेत्रातील नैपुण्य आणि अनुभव या आधारे त्यांची माहिती मिळवणे सहज शक्य होते; त्यामुळे योग्य प्रशासकीय नियोजन आणि धोरणांच्या अंमलबजावणीस मदत होते. कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, राज्य सरकारे आणि विविध विभाग यांच्या समन्वयाने दरवर्षी हा डेटाबेस अद्ययावत ठेवला जातो आणि त्याची निगराणी केली जाते. हा उपक्रम प्रशासकीय प्रक्रिया सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच अधिक कार्यक्षमता, सुलभता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे, असेही त्यांनी सांगितले.
डेटा- आधारित प्रशासनाचे महत्त्व अधोरेखित करताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतील मनुष्यबळ स्थितीचा आढावा घेतला आणि राज्ये व केंद्र सरकारच्या बदलत्या मनुष्यबळ गरजांचा आढावा घेतला. विविध क्षेत्रांमध्ये आणि प्रदेशांमध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा विस्तार होत असल्याने, मानव संसाधनांचे कार्यक्षम नियोजन अधिक महत्त्वाचे ठरत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. डिजिटलायझेशनमुळे केवळ सुलभता आणि कार्यक्षमताच वाढत नाही, तर सार्वजनिक संसाधनांचा योग्य वापर करण्यासही चालना मिळते.

ई-आयएएस सिव्हिल लिस्ट 2026 ही सिव्हिल लिस्टची 71 वी आवृत्ती आहे आणि पीडीएफ स्वरूपात ई-बुक म्हणून प्रकाशित होणारी ही सहावी आवृत्ती आहे.
या पुस्तकात आयएएस अधिकाऱ्यांबाबतच्या सर्वसमावेशक माहितीचा समावेश आहे. त्यामध्ये त्यांची बॅच, केडर, सध्याची नियुक्ती, वेतन स्तर, शैक्षणिक पात्रता आणि निवृत्तीची तारीख यांचा समावेश आहे.
ई आयएएस सिव्हिल लिस्ट 2026 प्रशासकीय आणि प्रशिक्षण विभागाच्या https://dopt.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
* * *
सुषमा काणे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2276786)
आगंतुक पटल : 11