MIFF banner

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे चित्रपट निर्मितीचे तंत्र अधिक सुलभ आणि किफायशीर पातळीवर येईल - आनंद पांडे यांनी मिफ्फ महोत्सवात व्यक्त केले मत


मानवी सर्जनशीलता कायमच सिनेमाच्या केंद्रस्थानी राहील - 19 व्या मिफ्फ मधील कार्यशाळेत आनंद पांडे यांचे प्रतिपादन

मुंबई, 20 जून 2026

 

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 (मिफ्फ) मध्ये एक्सप्लोरिंग सिनेमा इन अ कॉम्पॅक्ट फ्युचर (Exploring Cinema in a Compact Future) या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत आनंद पांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे चित्रपट निर्मितीच्या पद्धती बदलू लागल्या असल्या, तरी यामुळे चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांची जागा पूर्णपणे घेतली जाईल अशी शक्यता वाटत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

आनंद पांडे हे ॲनिमेशन निर्माते आहेत, ते सर्जनशील तंत्रज्ञ आहेत, तसेच ते स्क्रीनयुग क्रिएशन्स तसेच मर्जएक्सआरचे संस्थापक देखील आहेत. भारताच्या ॲनिमेशन उद्योगाच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, लिटिल कृष्णा, शक्तीमान आणि कृष्णा और कंस यांसारख्या प्रसिद्ध कलाकृतींसाठी त्यांनी योगदानही दिले आहे.

चित्रफिती तयार करण्यासाठीची कृत्रिम बुद्धिमत्ताधारित साधने आता अधिक प्रगत झाली आहे, ती सहजपणे उपलब्धही आहेत ही बाब त्यांनी यावेळी नमूद केली. कृत्रिम बुद्धिमत्ताधारित काही प्रगत मॉडेल्स भारतात थेट उपलब्ध नसली, तरी चित्रपट निर्माते एपीआय आणि ओपन-सोर्स व्यासपीठांचा वापर करून अतिशय कमी खर्चात या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतात अशी माहितीही त्यांनी दिली.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सहाय्यक दिग्दर्शक, लाईन प्रोड्युसर आणि निर्मिती व्यवस्थापक यांसारख्या नोकऱ्या धोक्यात येणार का, याबाबतही त्यांना उपस्थितांनी विचारले. यावर  कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पारंपरिक चित्रपट निर्मिती ही दोन्ही तंत्रे समांतरपणे आणि एकत्र काम करत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी फिल्म कॅमेऱ्यांकडून डिजिटल तंत्रज्ञानाच्या दिशेने घडून आलेल्या परिवर्तनाचा संदर्भही त्यांनी मांडला. तंत्रज्ञानासंबंधी प्रत्येक बदलामुळे कामाची पद्धत बदलत असली तरी सोबतच नवीन संधीही निर्माण होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

चित्रपट क्षेत्रात मानवी सर्जनशीलता नेहमीच महत्त्वाची राहणार असल्याचे त्यांनी ठळकपणे नमूद केले. प्रेक्षक हे प्रामुख्याने मानवी भावनांशी संबंधित कथा आणि सादरीकरणाशी जोडले जातात, आणि या गोष्टीची जागा तंत्रज्ञान कधीच घेऊ शकत नाही असे वैयक्तिक मत त्यांनी व्यक्त केले. त्याच वेळी, चित्रपटकर्मींचा  वेळ आणि पैशाची बचत करण्याच्यादृष्टीने, तसेच निर्मिती दरम्यानच्या चुका सुधारण्याच्यादृष्टीने आणि निर्मिती पश्चात प्रक्रियेतील कामात सुलभता आणण्याच्यादृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

लेखक, दिग्दर्शक आणि स्वतंत्र चित्रपटकर्मींना आपल्या कल्पना विकसित करण्यासाठी, दृश्यांबद्दलची अचूक कल्पना मांडण्यासाठी आणि आपला सर्जनशील दृष्टिकोन प्रभावीपणे सादर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता कशा प्रकारे मदत करू शकते, यावरही कार्यशाळेत चर्चा झाली.

या सत्रात उपस्थित सहभागींनी या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ताधारीत साधने, एपीआय ॲक्सेस आणि या क्षेत्रातील कारकिर्दीच्या भविष्यातील संधींबद्दल जाणून घेतले. कथात्मक मांडणी क्षेत्रातील कलाकारांचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानमुळे कशारितीने सक्षमीकरण घडून येईल, तसेच या तंत्रज्ञानामुळे चित्रपट निर्मितीच्या संधींचा कशा रितीने विस्तार होऊ शकेल यासंबंधीच्या सकारात्मक सहमतीने या सत्राचा समारोप झाला.

या कार्यशाळेसोबतच 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित कार्यशाळांच्या मालिकेचीही सांगता झाली.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2275844   |   Visitor Counter: 15

इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Urdu , हिन्दी , Bengali