मिफ्फ 2026 मध्ये ऑस्कर विजेत्या लघुपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता
मुंबई, 20 जून 2026
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 (मिफ्फ) आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या महोत्सवाने लघुपट, माहितीपट आणि ॲनिमेशनच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या कथात्मक मांडणीचा गौरव करण्याची आपली परंपरा यंदाही कायम राखली आहे.
ऑस्कर विनर्स (Oscar Winners) हा यंदाच्या महोत्सवातील विशेष विभाग सर्वाधिक पसंतीचा ठरला आहे. या विभागांतर्गत बहुप्रतिक्षित ऑस्कर पुरस्कार विजेत्या लघुपटांची मालिका दाखवली जात आहे. या विशेष विभागांतर्गत समकालीन जागतिक सिनेमातील काही सर्वोत्तम कलाकृती आणि उत्कृष्ट सर्जनशीलता, नवोन्मेष तसेच भावनाप्रधान कथात्मक मांडणी या लघुपटांतून भारतीय प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. या निमित्ताने मुंबईतील चित्रपट प्रेमींना आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या चार उत्कृष्ट कलाकृती पाहण्याची दुर्मिळ संधी लाभली.
मिफ्फ 2026 मध्ये दाखवले जात असलेले अधिकृत ऑस्कर विजेते लघुपट:
आय एम नॉट अ रोबोट (I Am Not a Robot - बेल्जियम, नेदरलँड्स)

व्हिक्टोरिया वार्मरडॅम यांनी दिग्दर्शित केलेल्या या डार्क साय-फाय कॉमेडी लघुपटाने 2025 चा सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन लघुपटाचा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. या लघुपटातून आपल्याला लारा नावाच्या एका संगीतकाराची कथा पाहायला मिळते. लारा ही ऑनलाईन कॅप्चा चाचण्यांमध्ये वारंवार अपयशी ठरते. यानंतर एक त्रासदायक प्रश्नाने ती त्रस्त होते की, ती खरोखरच एखादा रोबोट आहे का ?
इन द शॅडो ऑफ सायप्रेस (In the Shadow of Cypress - इराण)

शिरीन सोहानी आणि हुसेन मोलायेमी यांनी संयुक्तपणे या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. जबरदस्त प्रभाव सोडणाऱ्या या लघुटाने 2025 च्या सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपटाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले. समुद्राच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या या चित्रपटात पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) अर्थात धक्कादायक परिस्थितीनंतर उद्भवणाऱ्या मानसिक समस्येशी झगडत असलेल्या नौदलाच्या एका निवृत्त कॅप्टनची आणि त्यांच्या मुली मधील ताणलेल्या नाते संबंधांचा वेध घेतला आहे.
द गर्ल हू क्राइड पर्ल्स (कॅनडा)

प्रसिद्ध अॅनिमेशन दिग्दर्शक जोडी ख्रिस लॅव्हिस आणि मॅसिएक श्चेर्बोव्स्की दिग्दर्शित या चित्रपटाला 98 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात 2026 चा सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या मॉन्ट्रियलमध्ये घडणाऱ्या या कथेत एका गरीब मुलाची आणि अश्रू मोत्यांमध्ये रूपांतरित होणाऱ्या मुलीची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. या प्रेमकथेत मुलासमोर लोभ आणि खरे प्रेम यांपैकी एकाची निवड करण्याचे आव्हान उभे राहते.
टू पीपल एक्स्चेंजिंग सलाईव्हा (फ्रान्स, अमेरिका)

नताली मुस्तेआता आणि फ्रेंच व भारतीय वंशाचे ब्रुकलिनस्थित कलाकार अलेक्झांद्र सिंग यांनी सह-दिग्दर्शित केलेल्या या कल्पनारम्य चित्रपटाला 2026 चा सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन लघुपटाचा अकादमी पुरस्कार मिळाला. ज्या विचित्र समाजात थप्पड हे चलन मानले जाते आणि चुंबनाला मृत्यूदंडाची शिक्षा आहे, अशा पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा आणि विचारप्रवर्तक सिनेमॅटिक अनुभव देतो.
या चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे विद्यार्थी, नवोदित चित्रपट निर्माते आणि चित्रपटप्रेमींना मुंबईबाहेर न जाता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लघुपटांचा अनुभव घेण्याची मौल्यवान संधी मिळाली.
प्रदर्शनानंतर प्रेक्षकांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात चित्रपटांचे स्वागत केले आणि वैविध्यपूर्ण कथनशैली, कलात्मक उत्कृष्टता तसेच भावनिक खोलीबद्दल कौतुक व्यक्त केले.
मिफ्फ 2026 समारोपाकडे वाटचाल करत असताना, ऑस्कर विजेते विभाग हा महोत्सवातील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेचा भाग ठरत असून, जागतिक सिनेमासाठी मुंबईचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून स्थान पुन्हा अधोरेखित करत आहे.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/तुषार पवार/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2275737
| Visitor Counter:
15