कॅमेरा नाही, तर उत्सुकता हेच चित्रपट निर्मात्याचे सर्वात मोठे साधन: 'मिफ्फ 2026' च्या मार्गदर्शन सत्रात संजीव सिवन यांचे प्रतिपादन
मुंबई, 19 जून 2026
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते आणि माहितीपट निर्माते संजीव सिवन यांनी नवोदित कथासादरकर्त्यांना, तंत्रज्ञानापेक्षा उत्सुकतेला वरचे स्थान देण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवार, 19 जून 2026 रोजी 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (मिफ्फ) एका मार्गदर्शन सत्रात (मास्टरक्लास) ते बोलत होते. या मास्टरक्लासचा विषय "द सिनेमा ऑफ सोशल अॅडव्होकसी: टर्निंग इश्यूज इनटू नॅरेटिव्ह्ज अँड ब्रिंगिंग देम टू द फ्रंटलाईन्स" (सामाजिक परिवर्तनाचा सिनेमा : प्रश्नांना कथारूप देत जनतेसमोर प्रभावीपणे मांडणी) असा होता.

महोत्सवाच्या सुरू असलेल्या मास्टरक्लास मालिकेचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत सिवन यांनी 75 हून अधिक माहितीपट, 30 हून अधिक लघुपट आणि अनेक फिचर फिल्मच्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीतील अनुभवांच्या आधारे त्यांनी, वास्तववादी समस्यांचे एका प्रभावी चित्रपटीय (सिनेमॅटिक) कथानकात कसे रूपांतर केले जाऊ शकते, याबाबतचे पडद्यामागचे पैलू उपस्थितांसमोर मांडले.
"माझ्या मते तुमच्याकडे असणारे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे उत्सुकता आहे, कॅमेरा नाही," असे सिवन म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, एखादी प्रभावी कथा ही महागड्या उपकरणांमधून नाही, तर सूक्ष्म निरीक्षण, सखोल संशोधन आणि लोकांशी असलेल्या खऱ्या संवादातून आकाराला येत असते.
आपल्या चित्रपट निर्मितीच्या प्रवासातील अनेक किस्से सांगताना सिवन यांनी त्यांच्या काही गाजलेल्या कलाकृतींच्या निर्मितीचा प्रवास उलगडला. अमेरिकेत 'ओइजा बोर्ड' सोबत झालेल्या एका अपघाती भेटीने त्यांची उत्सुकता कशी जागी केली, हे त्यांनी आवर्जून सांगितले. या उत्सुकतेतूनच आधी एक 15 मिनिटांचा माहितीपट तयार झाला आणि पुढे त्याचे रूपांतर मल्याळम सुपरस्टार मम्मुटी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'अपरीचितन' या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात झाले. "तो चित्रपट आधी एक माहितीपट होता, पण नंतर तो एक फीचर फिल्म बनला," असे सांगत त्यांनी एकच कल्पना वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये कशी विकसित होऊ शकते, हे स्पष्ट केले.
S7Y2.jpeg)
या सत्रादरम्यान सिवन यांनी नवोदित चित्रपट निर्मात्यांना आठवण करून दिली की, माहितीपट हे शेवटी केवळ विषयांवर नसून माणसांवर आधारित असतात. "जर तुम्ही कोळ्यांवर (मच्छीमारांवर) माहितीपट बनवत असाल, तर ती कथा मासेमारीबद्दल नसते, ती त्यांच्या अस्तित्वाबद्दल असते. जर तुम्ही एखाद्या गावावर चित्रपट बनवत असाल, तर तो तिथल्या भूगोलाबद्दल नसून तिथल्या ओळखीबद्दल असतो," असे ते म्हणाले.
माहितीपटातील विषयांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्याच्या गरजेवर त्यांनी विशेष भर दिला. "लोकांनी आपल्या भावना किंवा विचार मनमोकळेपणे व्यक्त करण्यापूर्वी त्यांना आपल्यासोबत सहज आणि विश्वासार्ह वाटणे आवश्यक असते. यासाठी काही दिवस, महिने किंवा कधीकधी वर्षेही लागू शकतात," असे त्यांनी नमूद केले.
वास्तववादी चित्रपटांच्या निर्मितीमधील नैतिक जबाबदाऱ्यांबाबत बोलताना सिवन यांनी सनसनाटी निर्माण करण्याविरुद्ध सावध केले. “जेव्हा तुम्ही माहितीपट तयार करत असता, तेव्हा तुमच्यावर एक जबाबदारी असते. तो माहितीपट नाट्यमय करण्यासाठी तुम्ही त्यात चुकीच्या गोष्टी दाखवू अथवा सांगू शकत नाही,” ते म्हणाले.
मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसाय यामधून सुटका झाल्यानंतर स्वतःच्या आयुष्याची पुन्हा उभारणी करणाऱ्या महिलांच्या जीवनाचा शोध घेणारा ‘लिटील वुमन’ हा चित्रपट, संगीतकार शंकर महादेवन यांच्या चरित्रावर आधारित माहितीपट ‘डिकोडिंग शंकर’ तसेच भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या प्रकल्पांवर आधारित माहितीपट अशा कलाकृतींची देखील ज्येष्ठ निर्माते सिवन यांनी चर्चा केली. ‘आफ्टर लाईफ’ या त्यांच्या माहितीपटावरुन त्यांना त्यांचा ‘वेनालोदंगाथे’ (एंडलेस समर) हा पारितोषिक विजेता मल्याळम चित्रपट तयार करण्याची प्रेरणा कशी मिळाली हे देखील त्यांनी सांगितले. त्यातून माहितीपटाच्या वेळी केलेली निरीक्षणे, काल्पनिक चित्रपटाच्या निर्मितीचा पाया कसा बनतात याचे उदाहरण त्यांनी सादर केले.

डिजिटल मंच आणि ओटीटी सेवांनी देऊ केलेल्या संधींचा स्वीकार करण्यासाठी तरुण चित्रपटनिर्मात्यांना प्रोत्साहित करताना सिवन म्हणाले की आज चित्रपटनिर्मिती प्रक्रिया पूर्वीपेक्षा सुलभ झाली आहे. “तुम्हाला आता मोठ्या कर्मचारीवर्गाची गरज भासत नाही. तुमच्याकडे उत्तम असा लाइव्ह साऊंड असायला हवा. त्यापलीकडे तुम्हाला चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी तीनपेक्षा जास्त माणसे लागत नाहीत,” ते म्हणाले.
सत्र समाप्त करताना, सिवन यांनी त्यांचा रोख पुन्हा त्यांच्या कारकिर्दीला मार्गदर्शन करणाऱ्या संकल्पनेकडे वळवला. “तुमच्या आजूबाजूला, किंवा तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कथा दडलेली असते. तुम्ही तुमची कथा तयार करा आणि दृश्यमानता वाढवण्यासाठी आणि वितरणविषयक संधी सुरक्षित करण्यासाठी धोरणात्मकरित्या तुमचा चित्रपट प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सादर करा,” ते म्हणाले.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/आशुतोष सावे/संजना चिटणीस/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2275464
| Visitor Counter:
9