मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो उपक्रमांतर्गत 9 चित्रपटांच्या खेळांमधून युवा चित्रपटकर्मीच्या सर्जनशीलतेचा गौरव
मुंबई, 19 जून 2026
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 (मिफ्फ) मध्ये क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो या विशेष उपक्रमांतर्गत निर्मिती केलेल्या उत्कृष्ट लघुपटांचा संग्रह दाखवला जात आहे. यामुळे हे व्यासपीठ देशभरातील युवा चित्रपटकर्मींची सर्जनशीलता, कल्पकता आणि त्यांच्या कथात्मक मांडणी शैलीचा गौरव करणारे व्यासपीठ ठरले आहे.
या उपक्रमांतर्गत एकूण 9 लघुपटांची निवड केली गेली आहे. या लघुपटांमधून तंत्रज्ञान, नातेसंबंध, मानसिक आरोग्य, स्वतःची ओळख आणि मानवी नातेसंबंध या आणि अशा आजच्या आधुनिक काळातील संकल्पनांचा मागोवा चित्रित केला आहे.

यांपैकी गुल्लू हा अर्शली जोस यांनी दिग्दर्शित केलेला लघुपट. गुलशन हे या लघुपटाच्या केंद्रस्थानी असलेले पात्र. गोव्यात असताना त्याचा फोन हरवतो आणि त्यानंतर सलीम नावाच्या एका वेगळ्याच स्वभावाच्या ड्रायव्हरसोबतच्या संवादातून त्याला अनपेक्षितपणे जगण्याचा दृष्टीकोन आणि सहजतेचा नवा अर्थ कळतो.
सूर्यांश देव श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेल्या हे माया या चित्रपटातील जोडपे परस्परांमधील प्रेमसंबंध सुधारण्यासाठी एका कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नात्यांविषयीच्या सल्लागाराची मदत घेतात. पण यातूनच त्यांना हृदयाशी जोडलेल्या बाबींसाठी तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा खऱ्या अर्थाने उलगडा होतो.
विष्णू पीके यांनी दिग्दर्शित केलेला खाली खोपडी या लघुपटात, एका उद्याचा दिवस कधीच उजाडू नये अशी इच्छा असलेल्या एका व्यक्तीची कथा साकारली आहे मात्र अशातच त्याचा जगण्याच्या वास्तविक मूल्यांसोबत सामना होतो. ही कथा आपल्यालाही विचार करायला भाग पाडते.
दिग्दर्शिका सृष्टी गर्ग यांनी कोकम या आपल्या चित्रपटात ॲनिमेशन आणि प्रत्यक्ष दृश्यांच्या मिलाफ असलेली अनोखी शैली वापरली आहे. या चित्रपटातून त्यांनी डिजिटल जगातील नातेसंबंधांमधल्या फोलपणाची जाणीव झालेल्या आणि प्रत्यक्ष मानवी संवादाचे महत्त्व उलगडलेल्या एका तरुणीची कथा आपल्यासमोर मांडली आहे.
लव्हफिक्स सबस्क्रिप्शन या सूर्यांश देव श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात, एक तरुणी आपला बॉयफ्रेंड अपग्रेड करण्यासाठीच्या एका विशेष सेवेचे सदस्यत्व घेत असल्याची भन्नाट कल्पना साकारली आहे. अनपेक्षित आणि गमतीशीर घडामोडींच्या आधारे या चित्रपटाची कथा त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडली आहे.
रघुनाथ एस एन यांनी दिग्दर्शित केलेल्या द पेपर स्काय या चित्रपटात कधीकाळी मुंबईची ट्रॅफिक गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरजा हिच्या कथा मांडली आहे. ती गोव्यात असताना एक पत्रकार तिचा माग घेतो आणि तिच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण मिळते त्याचा प्रवास या चित्रपटातून साकारला आहे.
पियुष शर्मा यांनी द विंडो या आपल्या चित्रपटातून, एक 70 वर्षांच्या आजी आणि तिची तंत्रज्ञानस्नेही नात त्यांच्यातल्या नात्याचा अंत्यंत सुंदरपणे वेध घेतला आहे. दोन वेगळ्या कालखंडातल्या असतांनाही या दोघींनी परस्परांच्या नात्यातील सामायिक दुव्यांचा घेतलेला शोध या कथेतून आपल्यासमोर उलगडतो.
दिग्दर्शिका संजोली मालानी यांनी दिग्दर्शित केलेला द वुमन हू हॅज अ नेम या चित्रपटातून एका महिलेचे धाडस आणि तिच्या संघर्षाचे प्रभावी चित्रण आपल्याला अनुभवायला मिळते. ऑनलाइन छळ आणि त्यातून जाहीरपणे झालेल्या बदनामीनंतरही ती महिला कशारितीने धैर्याने लढा देते याची कथा हा चित्रपट आपल्याला सांगतो.
बोनिता राजपुरोहित यांनी दिग्दर्शित केलेला वी कॅन हिअर द सेम म्युझिक हा या विभागातील नववा चित्रपट. या चित्रपटातून एक मूक तरुण आणि एका अंध तरुणीची भावस्पर्शी प्रेमकहाणी आपल्यासमोर घडते. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आणि संवादातील दरी मिटवण्यासाठी ते दोघे तंत्रज्ञानाचा कसा आधार घेतात हे या कथेतून आपल्यासमोर उलगडते.

एकत्रितपणे, हे चित्रपट सहानुभूती, प्रेम आणि मानवी नातेसंबंधांचे चिरंतन महत्त्व साजरे करता करता समकालीन प्रश्नांना निर्भीडपणे हाताळणाऱ्या नव्या पिढीतील चित्रपटकारांचे आवाज व्यक्त करतात.
‘क्रिएटिव माइण्डस् ऑफ टुमॉरो’च्या माध्यमातून, मिफ्फ 2026 उदयोन्मुख प्रतिभेला प्रोत्साहन देण्याप्रती आपल्या वचनाशी कायम आहे. तसेच, युवा कथाकारांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर आपले कार्य सादर करण्यासाठी एक प्रतिष्ठित व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
‘क्रिएटिव माइण्डस् ऑफ टुमॉरो’ विषयी
‘क्रिएटिव माइण्डस् ऑफ टुमॉरो’ (सीएमओटी) हा माहिती आणि प्रसारण मंत्रालय व राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचा (एनएफडीसी) दूरदर्शी उपक्रम आहे. भारतीय चित्रपट उद्योगातील उदयोन्मुख ताऱ्यांचा शोध घेऊन त्यांची प्रतिभा जोपासण्यास मदत करणे आणि त्यांना प्रकाशात आणणे, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. हा केवळ प्रतिभा प्रदर्शनाचा कार्यक्रम नव्हे तर; भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेत भविष्य घडवू पाहणाऱ्या कथाकारांसाठी हे व्यासपीठ आहे.
दरवर्षी सीएमओटी, देशभरातल्या उदयोन्मुख चित्रपटकारांना विलक्षण संधी उपलब्ध करून देत त्यांच्या चित्रपट विश्वाकडे असलेल्या सुरुवातीच्या ओढीचे अलौकिक प्रतिभेत रुपांतर करते. त्यांना त्यांचे कौशल्य सादर करण्यासाठी आशियातील प्रतिष्ठीत चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या महोत्सवात जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देते.
इफ्फी या भारतातील प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवाच्या जोडीने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाच्या चार आवृत्त्या यशस्वी ठरल्या आहेत.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/तुषार पवार/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2275426
| Visitor Counter:
9