ओटीटी व्यासपीठे ही माहितीपट क्षेत्रातील चित्रपटकर्मींसाठीच्या संधी विस्तारत आहेत : 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील खुल्या चर्चासत्रात तज्ञांनी व्यक्त केले मत
माहितीपट हे भावी पिढ्यांसाठी इतिहास आणि संस्कृती जतन संवर्धन करण्यात मदतीचे ठरतात : 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रमेश पतंगे यांचे प्रतिपादन
मुंबई, 19 जून 2026
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय माहितीपट निर्माता संघनेटच्या वतीने आयोजित खुल्या चर्चासत्राचा भाग म्हणून, प्रसारण क्रांती : ओटीटीच्या युगातील माहितीपट निर्मिती या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्ताने ओटीटी, माध्यम जगत आणि माहितीपट क्षेत्रातील तज्ञ एकाच व्यासपीठावर आले होते. या सर्वांनी प्रसारण सेवा देणाऱ्या व्यासपीठांमुळे माहितीपट निर्मितीच्या क्षेत्रात कशा प्रकारे बदल घडून येत आहेत तसेच चित्रपटकर्मींसाठी कशारितीने नवीन संधी निर्माण होत आहेत, याबाबत सविस्तर चर्चा केली.
या चर्चासत्रात शेमारूच्या व्यवसाय विभाग प्रमुख किन्नरी दवे, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या दक्षिण आशिया क्षेत्राचे आशय विभाग प्रमुख साई अभिषेक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते रमेश पतंगे तसेच अनुभवी छायाचित्रकार आणि चित्रपटकर्मी धरम गुलाटी हे मान्यवर सहभागी झाले होते. चित्रपटसमीक्षक ललित राव यांनी या चर्चासत्राचे सूत्रधार म्हणून जबाबदारी सांभाळली.

ओटीटी व्यासपीठांनी कशारितीने माहितीपटांना चित्रपट महोत्सव, सिनेमाविषयक संस्था संघटना आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रसारकांच्या पलीकडे नेत, देशभरातील तसेच जगभरातील व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत माहितीपटांच्या वितरण क्षेत्रात कसा कायापालट घडवून आणला, या आणि अशा मुद्यांवर या सत्रात चर्चा झाली. प्रसारण सेवा देणाऱ्या व्यासपीठांनी चित्रपटकर्मींना त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शित करण्यासाठी तसेच प्रेक्षकांशी थेट जोडून घेता येण्याच्या दृष्टीने नवीन संधी निर्माण केल्या असल्यावरही सर्व वक्त्यांनी सहमती दर्शवली.
माहितीपट हा अजूनही वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या आशय विषयक धोरणाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे साई अभिषेक यांनी यावेळी सांगितले. इतिहास, पौराणिक कथा, साहसी कथानके, आत्मचरित्रे आणि गुन्हेगारीचे वास्तव मांडणाऱ्या कलाकृती यांसारख्या प्रकारांबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून असल्याचे ते म्हणाले. आता प्रसारण देणारी व्यासपीठे अस्सल कथानक, प्रेक्षकांशी जोडून घेऊ शकतील अशी अभिनव वैशिष्टपूर्ण कथानके, तसेच नवीन दृष्टिकोन मांडणाऱ्या कथनाकांच्या, विशेषतः भारतातील अशा कथा ज्या जागतिक प्रेक्षकांना आकर्षित करू शकतील अशा कथानकांच्या शोधात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
किन्नरी दवे यांनी प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्याला खिळवून ठेवू शकतील अशा कथात्मक मांडणीची अपेक्षा आजच्या प्रेक्षकांना आहे, त्यानुसार चित्रपटकर्मींनी देखील आपल्या कथांची अस्सलता कायम ठेवत प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडीशी जुळवून घेतले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. माहितीपट क्षेत्रातील चित्रपटकर्मींनी अभिनव कल्पनांसह ओटीटी व्यासपीठांसोबत सक्रियपणे संपर्क साधावा असे प्रोत्साहनही त्यांनी दिले.
धरम गुलाटी यांनीही आपले विचार मांडले. माहितीपटांना अधिक प्रसिद्धी मिळवून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अनेक नावाजलेल्या माहितीपटांना आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये ओळख मिळते, मात्र भारतात वितरण आणि प्रेक्षक मिळवण्यासाठी मात्र त्यांना बहुतांशवेळा मोठा संघर्ष करावा लागतो असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

रमेश पतंगे यांनी माहितीपटांच्या सामाजिक भूमिकेविषयीचे मत मांडले. माहितीपट हे महान व्यक्तींचा जीवनपट आणि त्यांच्या योगदानाविषयी लोकांना माहिती देण्याचे एक महत्त्वाचे माध्यम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. माहितीपट हे इतिहासाच्या जतन संवर्धनात, सामाजिक जागरूकतेची व्याप्ती वाढवण्यात आणि युवा पिढीला भारताचा सांस्कृतिक वारसा तसेच राष्ट्रीय मूल्यांची ओळख करून देण्यात उपयुक्त ठरत असतात याची जाणिवही त्यांनी करून दिली.
कथात्मक मांडणी, वितरण, प्रेक्षकांसोबतचा संपर्क आणि संवाद तसेच ओटीटी युगातील माहितीपट निर्मितीचे भविष्य अशा विविध मुद्यांवरच्या संवादात्मक चर्चेने या सत्राचा समारोप झाला.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2275332
| Visitor Counter:
11