MIFF banner

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये मिड फेस्ट म्हणून दाखवल्या गेलेल्या इनी, मिनी, मायनी, मो!, हाएना आणि आय लव्ह यू, आय लीव्ह यू या तीन चित्रपटांनी उलगडले मानवी वर्तनाचे पैलू

मुंबई, 19 जून 2026

 

19 व्या मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिड फेस्ट म्हणजेच महोत्सवाचा मध्य या उपक्रमाचा एक भाग म्हणून इनी, मिनी, मायनी, मो!, हाएना  आणि आय लव्ह यू, आय लीव्ह यू  या तीन चित्रपटांचे खेळ दाखवले गेले. या तीन्ही चित्रपटांनी मुंबईकरांना एक भावनात्मक आणि दृश्यात्मक पातळीवर भार हरपून टाकणारा अत्यंत सुंदर असा सिनेमॅटिक अनुभव दिला. महोत्सवाच्या या विभागाबद्दल सिनेरसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचे पाहायला मिळाले. या विभागाअंतर्गत जगभरातील उत्कृष्ट लघुकथा, ॲनिमेशन आणि माहितीपट दाखवले गेले. 

इनी, मिनी, मायनी, मो! या चित्रपटातून इयोस (Yios) या एका अनाथ, काल्पनिक मुलाची कथा साकारली आहे. त्याचे मस्तक सूर्यासारखे चमकत असते. ढगांमध्ये राहणाऱ्या इतर मुलांमध्ये मिसळण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागतो. त्यामुळे त्याच्यात एकटेपणाची आणि उपेक्षित असल्याची भावना तयार होते. त्याच्यासोबत केल्या गेलेल्या एका दुर्दैवी थट्टेमुळे तो ढगांमधून थेट पृथ्वीवर येऊन पोहोचतो. इथे त्याची भेट एका लहान मुलाशी होते जो त्याच्याशी लगेचच मैत्रीचा हात पुढे करतो. या अनपेक्षित भेटीनंतर इयोसचा स्वतःकडे पाहण्याचा आणि समाजातील आपल्या अस्तित्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो. या लघुपटाची संवेदनशील कथात्मक मांडणी आणि कल्पक दृश्यांच्या माध्यमातून, आपल्या समवयस्क मुलांमध्ये मिसळणे कठीण जात असलेल्या अथवा अनेकदा सामाजिक गटांमधून आपल्याला बहिष्कृत केले असल्याची भावना बळावलेल्या, अवस्थेतून जात असलेल्या मुलांसमोरची भावनिक आव्हाने उलगडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्याच वेळी, हा लघुपटातून एखाद्याचा स्वीकार करणे, सहानुभूती दाखवणे आणि सर्वसमावेषकता या मूल्यांमध्ये बदल घडवून आणण्याची असलेली ताकदही अतिशय सुंदररित्या टिपलेली आहे. यामुळे हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या मनाला भिडतो.  या चित्रपटाच्या दिग्दर्शिका अँड्रिया झेलेसोव्हा  यांनी याआधी मॅलडी, मोन अमी , ॲनिडॉक 19 20 18  आणि आफ्टरनून टी यांसारख्या नावाजलेल्या चित्रटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटांतून त्यांनी समकालीन ॲनिमेशन क्षेत्रात आपली एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे. आपल्या पदवीच्या अभ्यासक्रमाचा प्रकल्प म्हणून त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सिस्टर्स या पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा 2021 मध्ये अ‍ॅनेसी आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला होता. त्यानंतर जगभरातील 60 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये तो दाखवला गेला. या खेळाच्या निमित्ताने या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय प्रीमियर पार पडला. या खेळाला चित्रपटाच्या लेआउट आणि बॅकग्राउंड आर्टिस्ट अँड्रिया आर्स उपस्थित होत्या. मिफ्फ या आशियातील अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाचा भाग बनता आल्याबद्दल आनंद वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

हाएना हा मिड फेस्ट विभागात दाखवला गेलेला आणखी एक चित्रपट. मँडरीन भाषेमधील हा लघुपट एक थरारपट आहे. अल्ताय उलान यांग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा भारतीय प्रीमियर 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पार पडला. दिग्दर्शकाच्या स्वतःच्या वयाच्या सोळाव्या वर्षातील वास्तविक अनुभवातून हा चित्रपट आकाराला आला आहे. यात हिंसा म्हणजे केवळ छळ अशी मांडणी नसून, त्या पलिकडे जात, एक अदिम मानवी भावना म्हणून त्याचे कलात्मक पैलू उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला गेला आहे. या लघुपटात मास्टर नावाच्या एक विद्यार्थ्याची कथा आपल्यासमोर येते. मास्ट हा पूर्वी स्वतः छळवणुकीचा बळी ठरलेला असतो, त्याला एका निर्जन किल्ल्याच्या ठिकाणी, सर्वांवर वचक असलेल्या मुलांच्या एका गटामध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त केले जाते. आपल्याला या गटाने स्वीकारावे म्हणून स्वतःच्या वैयक्तिक नीतीमूल्यांचा बळी देतो. हा गट नंतर 90 नावाच्या एका शांत, हुशार नवीन विद्यार्थ्याला आपले लक्ष्य बनवतो. त्या विद्यार्थ्यासोबत एका विशिष्ट स्वरुपातील शारीरिक हिंसा करत त्याच्यातील कला मारली जाते. शेवटी शेवटी मास्टर देखील या हिसेंत सामील होतो. जेव्हा 90 च्या सहनशीलतेची मर्यादा संपते आणि तो प्रतिकार करू लागतो, त्यावेळी मात्र मास्टरला झुंडीच्या मानसिकतेची आणि आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या सामूहिक क्रूरतेच्या भयानकतेची जाणीव व्हायला लागते, आणि त्याबद्दलचा प्रवास या चित्रपटातून आपल्यासमोर उलगडत जातो.

मिड फेस्ट सत्रात अंतिम चित्रपट म्हणून ‘आय लव यू, आय लीव यू’चे पहिले आंतरराष्ट्रीय प्रदर्शन मिफ्फमध्ये झाले. स्वीस संगीतकार दिनो ब्रान्दाओ यांचा आत्मशोध आणि समाजाने लादलेल्या एकसुरीपणाविरोधातील प्रवासाचे प्रभावी चित्रण या चित्रपटात आहे. स्विस दिग्दर्शक मॉरीस फ्रेईबर्घाउस दिग्दर्शित पहिल्या बहुभाषिक पूर्ण लांबीच्या या चित्रपटाला झ्युरीख चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम माहितीपट म्हणून प्रतिष्ठेचा ‘गोल्डन आय’ पुरस्कार आणि प्रेक्षक पुरस्कार मिळाले आहेत. निरीक्षक आणि विषय यांच्यातील सीमारेषा धूसर करणारा माहितीपट त्यांनी साकारला आहे. त्यामध्ये मनस्वी स्विस संगीतकार दिनो ब्रान्दाओ यांच्या जीवनप्रवासाचा मागोवा घेतला आहे; स्वतःचे खरे व्यक्तिमत्त्व दडपून टाकण्याची अपेक्षा करणाऱ्या जगात ते स्वतःची ओळख जपत जगण्याचा प्रयत्न करतात. दिनोसाठी संगीत हे त्यांच्या मानसिक  अतिताणाला लय देणारे माध्यम ठरते. प्रभावी सिनेमॅटिक दृश्ये आणि कोणतीही कृत्रिम मांडणी न केलेल्या वास्तवदर्शी चित्रीकरणाच्या सुरेख मिलाफातून हा चित्रपट मानवी भावविश्वातील गुंतागुंत मांडतो. भावना मोकळेपणाने व्यक्त करणे म्हणजे ‘वेड’ असणे नव्हे, याकडे लक्ष वेधून घेत, आनंद साजरा करण्याचा आणि मनस्वी जगण्याचा अधिकार ही मूलभूत मानवी मूल्ये हा चित्रपट प्रभावीपणे सादर करतो. दिग्दर्शक  हळूहळू स्वतःलाही या कथानकाचा भाग बनवितात आणि मग हा चित्रपट दिग्दर्शक आणि विषय यांच्यातील एक सामायिक प्रवास ठरतो; सहानुभूती आणि परस्पर समज यांवरील चिंतन म्हणून तो घडत जातो. चित्रपटात संगीताचा वापर केवळ पार्श्वसंगीत म्हणून केलेला नाही तर; आनंद, स्वातंत्र्य आणि मुक्ततेचे प्रतीक म्हणून संगीत येते. चित्रपटाची वर्तुळाकार कथारचना वैयक्तिक संघर्ष आणि स्वतःला स्वीकारण्याच्या व्यक्तिच्या प्रवासाचे प्रभावी चित्रण करते. हा चित्रपट ‘आजारी’ आणि ‘निरोगी’ या सामाजिक विभागणीतील द्वैत दाखवून देण्यात यशस्वी ठरतो. विविध संस्कृतींतील प्रेक्षकांसाठी तो समर्पक संदेश योग्य वेळेवर देतो. त्यामुळे ‘आय लव यू, आय लीव यू’ हा विरोधाभासांचे सहअस्तित्व मांडतो आणि समकालीन माहितीपटांच्या विश्वात एक उल्लेखनीय कलाकृती ठरतो.

या तिन्ही चित्रपटांनी मानवी भावविश्वातील गुंतागुंतीवर प्रभावी भाष्य करणाऱ्या हृदयस्पर्शी कथा सादर केल्या आणि मिफ्फ 2026 या 19 व्या आवृत्तीत चित्रपटांच्या वैभवात मोलाची भर घातली.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/तुषार पवार/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2275194   |   Visitor Counter: 14