कृषी मंत्रालय
भारताच्या अध्यक्षतेखाली मध्य प्रदेशात इंदूर इथे ब्रिक्स कृषी मंत्र्यांची सोळावी बैठक संपन्न
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2026 7:24PM by PIB Mumbai
भारताच्या अध्यक्षतेखाली 12–13 जून 2026 रोजी मध्य प्रदेशात इंदूर इथे ब्रिक्स कृषीमंत्र्यांच्या 16 व्या बैठकीचे यशस्वी आयोजित करण्यात आले.
गेल्या सुमारे तीन महिन्यांतील अनेक बैठकींमधून ब्रिक्स कृषी कार्यगटाने खालील चार प्राधान्यक्रमांवर सखोल चर्चा केली:
प्राधान्यक्रम 1: अन्नसुरक्षा, पोषण आणि उपजीविका
प्राधान्यक्रम 2: कृषी व्यापार आणि सहकार्य
प्राधान्यक्रम 3: पुनरुत्पादक शेती, हवामान-अनुकूल आणि शाश्वत कृषी
प्राधान्यक्रम 4: कृषी आणि अन्न प्रणाली भविष्यासाठी सक्षम करण्यासाठी नवोन्मेष व गुंतवणुकीतील भागीदारी बळकट करणे
बैठकीचा समारोप ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या संयुक्त जाहीरनाम्याच्या सर्वानुमते स्वीकृतीने झाला. हा जाहीरनामा सदस्य देशांमधील विस्तृत चर्चांमधून स्वीकारलेला सामूहिक दृष्टीकोन, सामायिक बांधिलकी आणि एकमताचे प्रतिबिंब आहे.
या संयुक्त जाहीरनाम्यात शेतकरी-केंद्री दृष्टिकोनावर विशेष भर देण्यात आला आहे. जागतिक अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यात शेतकऱ्यांची, विशेषतः छोटे शेतकरी आणि शेतमजुरांची महत्त्वपूर्ण भूमिका मान्य करण्यात आली असून शाश्वत कृषी पद्धतींचा प्रसार आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासाला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच नवोन्मेष, शाश्वत उपाय आणि समतेच्या आधारे कृषी व अन्न प्रणाली अधिक सक्षम बनविण्याची ब्रिक्स सदस्य देशांची सामायिक दृष्टी यात प्रतिबिंबित होते. या सामूहिक निर्धाराला पुढे नेण्यासाठी मंत्र्यांनी खालील चार प्रमुख उपक्रमांवर सहमती दर्शविली:
संयुक्त जाहीरनाम्यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कृषी पर्यावरणशास्त्र आणि पुनरुत्पादक शेतीसाठी ब्रिक्स उत्कृष्टता केंद्रांचे जाळे स्थापन करण्याचा निर्णय. या केंद्रांचा समन्वय, भारतातील मोदिपुरम इथली आयसीएआर भारतीय कृषी उत्पादन प्रणाली संस्था (आयआयएफएसआर) घडवेल. या उपक्रमाद्वारे शाश्वत, नैसर्गिक आणि बदलत्या हवामान अनुकूल कृषी पद्धतींना प्रोत्साहन दिले जाईल. आयसीएआर-आयआयएफएसआर हे भारतातील नैसर्गिक शेतीसाठी उत्कृष्टता केंद्र म्हणून कार्य करेल आणि सदस्य देशांमध्ये संयुक्त संशोधन, क्षमता विकास तसेच सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण वाढवेल.
दुसरा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे ब्रिक्स देशांमध्ये डिजिटल कृषी नेटवर्क स्थापन करणे. हे व्यासपीठ कृत्रिम बुद्धिमत्ता, भू-स्थानिक तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डेटा-आधारित कृषी उपाययोजनांमध्ये सहकार्य वाढवेल. या नेटवर्कचा समन्वय, भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली करेल. यामुळे अत्याधुनिक नवोपक्रम आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कृषी अनुप्रयोग यांच्यातील दुवा मजबूत होईल.
तिसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे बियाणे व्यवस्थेमधील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी जागतिक मंच सुरू करण्याचा निर्णय. या मंचाचा उद्देश शेतकऱ्यांचे हक्क जपणे आणि प्रोत्साहन देणे, पारंपरिक ज्ञान, बियाण्यांचा वारसा आणि शेतकऱ्यांचे योगदान यांना मान्यता देणे हा आहे. या उपक्रमाचे प्रारंभिक समन्वयन नवी दिल्लीतील वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण (पीपीव्ही अॅंड एफआरए) मार्फत भारत करेल. यामुळे या महत्त्वपूर्ण विषयांवर जागतिक संवाद आणि सहकार्याला चालना मिळेल.
चौथा महत्त्वाचा निर्णय म्हणजे ब्रिक्स अॅग्री एन( कृषी निविष्ठा अनुवांशिक संसाधने आणि माहिती जाळे) आराखडा स्थापन करणे. यामुळे बियाणे, कृषी निविष्ठा आणि आनुवंशिक संसाधनांच्या क्षेत्रात ब्रिक्स देशांमधील सहकार्य अधिक मजबूत होईल. हा आराखडा माहितीची देवाणघेवाण, तांत्रिक सहकार्य, क्षमता विकास आणि भागीदारीला प्रोत्साहन देईल.
सदस्य देशांच्या कृषीमंत्र्यांनी दोन विद्यमान उपक्रम अधिक बळकट करण्यावरही सहमती दर्शविली. प्रथम, ब्रिक्स कृषी संशोधन मंच (बीएआरपी) अधिक सक्षम करून त्याचे ज्ञान ते कृती केंद्रामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून संशोधनातून निर्माण होणारे निष्कर्ष शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष, विस्तारक्षम उपाययोजनांमध्ये रूपांतरित होतील.
दुसरे म्हणजे कृषी व्यापाराच्या क्षेत्रात ब्रिक्स देशांनी न्याय्य, समतोल, सर्वसमावेशक आणि पारदर्शक बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. भारताच्या यजमानपदाखाली झालेल्या ब्रिक्स धान्य विनिमय मंच विषयक विशेष संवादामुळे या उपक्रमाच्या कार्यपद्धतीविषयी चर्चांना गती मिळाली आणि सामायिक समज विकसित होण्यास मदत झाली.
सदस्य देशांनी हवामान-अनुकूल आणि पुनरुत्पादक शेती, जैवविविधता संवर्धन, अन्नसुरक्षा, नवोपक्रम, मत्स्यव्यवसाय आणि पशुधन विकास यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावरही सहमती दर्शविली, जेणेकरून शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज, कृषीव्यवस्था निर्माण करता येईल. अन्नाची नासाडी कमी करणे, पशुधन तंत्रज्ञान आणि मत्स्यपालन यांवरील तांत्रिक चर्चांचे निष्कर्ष, भविष्यातील कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करण्याबाबतही महत्त्वपूर्ण सहमती झाली. यामुळे कार्यक्षमता, पोषण सुरक्षा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
ब्रिक्स सदस्यांनी दक्षिण- दक्षिण सहकार्याप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. तांत्रिक देवाणघेवाण, क्षमता विकास आणि कृषी कौशल्यविकासाला प्रोत्साहन देऊन विकसनशील देशांमधील अन्नसुरक्षा आणि शाश्वत कृषीला पाठबळ देण्याच्या सामूहिक भूमिकेला त्यांनी बळकटी दिली.
छोटे शेतकरी, महिला आणि युवक: अन्न सुरक्षेच्या भविष्याला आकार या विषयावर मंत्रिस्तरीय संवादाचेही आयोजन करण्यात आले. यामध्ये लघु शेतकरी, महिला आणि युवक यांची सर्वसमावेशक, सक्षम आणि शाश्वत अन्नव्यवस्था उभारण्यात असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात आली. या घटकांसाठी बाजारपेठ, वित्तपुरवठा, तंत्रज्ञान आणि क्षमता विकासाच्या संधी अधिक सुलभ करण्याची आवश्यकता प्रतिनिधींनी व्यक्त केली.
या बैठकीमुळे सहभागी देशांमध्ये द्विपक्षीय चर्चांसाठीही संधी उपलब्ध झाली. बाजारपेठ प्रवेश, सहकार्य आणि परस्पर हिताच्या इतर विषयांवर रचनात्मक संवाद साधण्यात आला.
हे संयुक्त घोषणापत्र ब्रिक्स राष्ट्रांची सक्षम अन्नव्यवस्था निर्माण करणे, शेतकऱ्यांना सशक्त बनविणे आणि सर्वांसाठी शाश्वत व समृद्ध भविष्य सुनिश्चित करणे या सामूहिक इच्छाशक्तीचे आणि सामायिक जबाबदारीचे प्रतीक आहे.
या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांतील कृषी मंत्री, उपमंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. सुमारे 100 प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग घेतला.
या बैठकीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीत प्रथमच सदस्य देशांसोबत भागीदार देशांचाही सहभाग होता. मंत्रिस्तरीय संवाद आणि विविध द्विपक्षीय बैठकींसोबतच प्रतिनिधींनी इंदूर येथील मेघदूत गार्डनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. हा उपक्रम शाश्वतता, हवामान-अनुकूलता आणि भावी पिढ्यांप्रती जबाबदारी याबाबत ब्रिक्स देशांच्या सामूहिक वचनबद्धतेचे प्रतीक ठरला.
पर्यावरणीय शाश्वततेप्रती सामायिक बांधिलकीचे प्रतीक म्हणून प्रतिनिधींनी ब्रिक्स वाटिका या वृक्षारोपण उपक्रमात सहभाग घेतला. यामुळे हवामान कृती आणि पर्यावरण संवर्धनाबाबतची सामूहिक जबाबदारी अधोरेखित झाली.
***
राधिका अघोर/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272591)
आगंतुक पटल : 10