गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या शहर विकासाला आकार देणाऱ्या राष्ट्रीय नागरी व्यवहार संस्थेचा सुवर्ण महोत्सव

प्रविष्टि तिथि: 13 JUN 2026 6:20PM by PIB Mumbai

 

एकात्मिक व शाश्वत शहरी विकासासाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय नागरी व्यवहार संस्था (एनआययूए) या केंद्र सरकारच्या गृहबांधणी व नागरी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारितील प्रमुख विचारमंचाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात एक समारंभ आयोजित करण्यात आला होता.

‘बदलांना अनुकूल शहरी भारत @2047’ ही या सुवर्ण महोत्सवी समारंभाची संकल्पना होती. या समारंभात प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने मिळून 1000 जण सहभागी झाले होते. यामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळे, केंद्र व राज्य सरकारांचे वरीष्ठ अधिकारी, धोरणकर्ते, शहरांमध्ये कार्यरत असणारे व्यावसायिक, संशोधक, विकास भागीदार आणि भारतातील शहरांच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. 

पंतप्रधानांचे प्रमुख सचिव डॉ. पी. के. मिश्रा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एनआययूए संस्थेच्या भारताच्या शहरी विकासातील 50 वर्षांच्या योगदानाबद्दल त्यांनी संस्थेची प्रशंसा केली. ते म्हणाले, “सध्या शहरांना हवामान बदलाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अशावेळी भविष्यातील शहरी विकासात सक्रिय नियोजन, नैसर्गिक पर्याय, हरित पायाभूत सुविधा आणि शाश्वत प्रणालींवर भर दिला पाहिजे.”   

गेल्या अर्ध शतकात एनआययूए संस्थेने नागरी विकास क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेत गृहबांधणी व नागरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव श्रीनिवास कातिकिथाला म्हणाले, “विकसित भारत @2047 या उद्दीष्टपूर्तीच्या वाटचालीत शहरांचे नियोजन करताना विकासाबरोबरच बदलांना अनुकूल अशी शहरे, शाश्वतता आणि दीर्घकालीन उपयोगिता यावर भर देणे आवश्यक आहे.”

या समारंभाच्या शेवटी एनआययूए संस्थेची पाच दशकांची वाटचाल आणि संस्थेचे भारताच्या नागरी क्षेत्रातील योगदान याविषयीचे सादरीकरण करण्यात आले. 1976 पासूनच्या संस्थेच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे, उल्लेखनीय संशोधन, धोरणनिर्मितीसाठी मदत, क्षमता बांधणी उपक्रम, भागीदारी आणि अभ्यासातून तयार झालेली उत्पादने यांची माहिती यावेळी देण्यात आली.

या कार्यक्रमात शहरांची बदलत्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठीची लवचिकता, क्षमता बांधणी आणि अनुभवांवर आधारित धोरणनिर्मिती यांच्या बळकटीकरणाठीच्या उपक्रमांचा प्रारंभ तसेच महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यातील ‘लवचिक शहरी भारत – शाश्वत व भविष्यानुकूल शहरांची उभारणी’ या पुस्तकामध्ये लवचिक शहरी विकासाच्या दृष्टीने नियोजन, गृहबांधणी, बांधकाम, पाणी व वाहतूकव्यवस्था याबाबतच्या धोरणांची रुपरेषा मांडण्यात आली आहे. ‘भारताच्या शहरीकरणाची नवी भौगोलिकता – भूस्थानिक दृष्टीकोन’ या पुस्तकामध्ये नागरी प्रशासन व सुधारित वसाहतींना सहाय्यक ठरेल असा आधुनिक DEGURBA आराखडा सादर करण्यात आला आहे.

‘भारताच्या शहरी विकासाच्या योगदानातील 50 वर्षे’ या स्मरणिकेचे प्रकाशनही या समारंभात करण्यात आले. या स्मरणिकेत एनआययूए संस्थेच्या संशोधन, धोरणसहाय्य, नवोन्मेष व क्षमता बांधणी या क्षेत्रातील योगदानाची माहिती देण्यात आली आहे.

राष्ट्रीय शहरी शिक्षण मंचाचा प्रारंभ या कार्यक्रमात करण्यात आला. हा मंच आयगॉट – कर्मयोगी अभियानाची शहरी शाखा असून एकात्मिक मिश्र शिक्षण आराखडा व नवीन तांत्रिक अभ्यासक्रम याद्वारे शहरी भारतासाठी तांत्रिक क्षमता बांधणीचा नवा टप्पा आहे.

तंत्रज्ञान आधारित नागरी प्रशासनाचे मजबूतीकरण व नवोन्मेषाचा समावेश असलेल्या शहरी पुनर्विकास तंत्र अभ्यासक्रमाच्या 127 विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात पदवी प्रदान करण्यात आली.

शहरांच्या बदलांना अनुकूल लवचिकेतेचे प्रमुख पैलू आणि शाश्वत शहरी विकास या विषयावरील नऊ तांत्रिक चर्चासत्रे यावेळी आयोजित करण्यात आली होती. ‘नागरी प्रशासन व लवचिक शहरी आर्थिक क्षेत्राच्या दृष्टीने संस्थात्मक यंत्रणा’ या विषयावरील चर्चासत्रात लवचिक शहरी अर्थव्यवस्थांसाठी संस्थांच्या क्षमतावृद्धीचे मार्ग, विविध सरकारी संस्थांमधील समन्वय आणि एकात्मिक प्रादेशिक नियोजनाला चालना याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभात एनआययूएच्या भारताच्या नागरी क्षेत्रातील पाच दशकांच्या सेवेचा तसेच संशोधन, धोरण निर्मिती, क्षमता बांधणी व अंमलबजावणीतील सातत्यपूर्ण योगदानाचा गौरव करण्यात आला. 

***

राधिका अघोर/सुरेखा जोशी/परशुराम कोर


(रिलीज़ आईडी: 2272578) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Kannada