युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम' अंतर्गत क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा लडाखमधील सीमावर्ती गावांचा तीन दिवसांचा दौरा; युवक, आयटीबीपीचे जवान आणि स्थानिक समुदायांशी साधला संवाद

प्रविष्टि तिथि: 13 JUN 2026 2:37PM by PIB Mumbai


युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' अंतर्गत 11 ते 13 जून 2026 या कालावधीत लडाखमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या सीमावर्ती भागांचा दौरा केला. या दौऱ्यामुळे सीमावर्ती भागांत तैनात असलेल्या सुरक्षा दलांसबतचा समन्वय अधिक दृढ करण्यासोबतच, तरुणांना आणि समुदायांना सहभागी करून घेऊन विकासाचा लाभ अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून सीमावर्ती गावांना सशक्त बनवण्यासाठीची भारत सरकारची वचनबद्धता अधोरेखित झाली.

'हॉल ऑफ फेम'येथे भारताच्या शूरवीरांना अभिवादन

लेह येथील प्रसिद्ध 'हॉल ऑफ फेम'ला दिलेल्या भेटीसह 11 जून रोजी या दौऱ्याची सुरुवात झाली. देशाच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना रक्षा खडसे यांनी आदरांजली अर्पण केली. भारतीय सशस्त्र दलांनी दाखवलेले धैर्य, शिस्त आणि देशभक्ती प्रत्येक नागरिकाला यापुढेही प्रेरणा देत राहणार असून त्यामुळे देशाचा संकल्प अधिक दृढ होईल, असे उद्गार त्यांनी काढले.

हेम्या गावातील तरुणांशी संवाद आणि लोकसहभाग

रक्षा खडसे यांनी 12 जून रोजी 'हेम्या' या सीमेलगत असलेल्या गावाला भेट दिली, तिथे त्यांचे 'माय भारत'  अंतर्गत पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात स्थानिक कलाकार आणि शाळकरी मुलांनी लडाखचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि परंपरांचे दर्शन घडवणारे जोशपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

याप्रसंगी, रक्षा खडसे यांच्या हस्ते समुदाय विकास, युवा सहभाग आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल आयटीबीपीचे डीआयजी ताशी नामग्याल, डेप्युटी कमांडंट प्रियांजन, गावचे सरपंच आणि स्थानिक कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

आयटीबीपीच्या जवानांबरोबर विशेष संवाद

गावात झालेल्या कार्यक्रमांनंतर, रक्षा खडसे यांनी आयटीबीपीच्या छावणीला भेट देऊन त्या भागात तैनात असलेल्या अधिकारी आणि जवानांशी संवाद साधला. या 'हिमवीरांना' संबोधित करताना, अत्यंत खडतर वातावरण असलेल्या देशाच्या या भागात कर्तव्य बजावताना या दलाने दाखवलेली असाधारण निष्ठा, चिकाटी आणि सेवाभावी वृत्तीचे त्यांनी कौतुक केले.

थिकसे मठाला भेट 

दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी, म्हणजेच 13 जून रोजी, मंत्र्यांनी प्रसिद्ध थिकसे मठाला भेट देऊन  सकाळच्या प्रार्थनेत सहभाग घेतला. त्यांनी मठातील भिक्खू समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला तसेच देशाच्या निरंतर शांतता, भरभराट प्रगतीसाठी प्रार्थना केली.

मंत्र्यांचा संदेश

दौऱ्याचा समारोप करताना रक्षा खडसे म्हणाल्या:

“माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारतातील सीमावर्ती गावे ही देशातील ‘पहिली गावे’ आणि विकासाची प्रवेशद्वारे म्हणून पुढे येत आहेत. क्रीडा, कौशल्य विकास, लोकसहभाग आणि राष्ट्रउभारणीच्या उपक्रमांद्वारे या सीमावर्ती भागातील तरुणांना सक्षम बनविण्यास सरकार सर्वाधिक प्राधान्य देत आहे. ‘विकसित भारत @2047’ चे स्वप्न साकार करण्यात आपल्या तरुणांची ऊर्जा आणि सुरक्षा दलांची निष्ठा यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहणार आहे.”

***

माधुरी पांगे/मंजिरी गानू/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2272508) आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Tamil