संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हैदराबाद येथे डीआरडीओच्या प्रगत शस्त्र प्रणाली संकुलाचे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2026 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2026
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तेलंगणा मधील हैदराबाद दौऱ्यात 12 जून, 2026 रोजी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्समधील डीआरडीओच्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेत एका प्रगत शस्त्र प्रणाली संकुलाचे उद्घाटन केले. संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात भारताचे तांत्रिक कौशल्य, सामरिक स्वायत्तता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या कार्यात डीआरडीओच्या क्षेपणास्त्र प्रणाली आणि सामरिक प्रणाली क्लस्टरने दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची प्रशंसा केली. ऑपरेशन सिंदुरच्या कार्यवाहीत भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीची अद्वितीय कामगिरी, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि विकास परिसंस्थेच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 च्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात ज्या मिशन सुदर्शन चक्रची घोषणा केली होती, ते आता लवकरच आधुनिक भारताची बहुस्तरीय क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली म्हणून सज्ज होणार असल्याचे ते म्हणाले. यामुळे केवळ लष्करी तळ आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचेच संरक्षण होणार नाही तर त्यासोबतच नागरी पायाभूत सेवा आणि प्रमुख आस्थापनांची सुरक्षा देखील सुनिश्चित होईल. या प्रणालीमध्ये गरजेनुसार निर्णायक प्रहार करण्याची क्षमता असेल, तिचे त्रिस्तरीय संरक्षण नागरिकांना कमीत कमी गैरसोय होईल याची खात्री करेल आणि त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देईल. ही प्रणाली सर्व अत्यंत महत्त्वाच्या मालमत्तांसाठी एक मजबूत संरक्षक कवच प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
देशासाठी लवचिकता आणि प्रतिबंध या क्षमता निर्माण करण्यासाठी डीआरडीओने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. आपला देश अस्थिरतेसमोर झुकणार नाही किंवा आपल्या सज्जतेत कोणत्याही त्रुटी ठेवणार नाही याबाबतचा आत्मविश्वास ही संस्था देशात रुजवत आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. आजचा उद्घाटन सोहळा हा प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी सतर्क, सक्षम आणि आत्मनिर्भर बनण्याच्या आमच्या दृढनिश्चयाचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले.

भारताला सामरिक फायदा मिळवून देणाऱ्या भविष्यवेधी तंत्रज्ञानावर काम करत असतानाच, वर्तमान काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी डीआरडीओ करत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी संरक्षण दलांना आधुनिक आणि पुरेशा प्रमाणात शस्त्रास्त्रांनी सज्ज ठेवण्याच्या गरजेवर संरक्षणमंत्र्यांनी भर दिला.
डीआरडीओ सदैव राष्ट्रीय क्षमतांना अधिक बळकट करेल, तांत्रिक अवलंबित्व कमी करेल आणि संरक्षण दलांच्या कार्यात्मक परिणामकारकतेत वृद्धी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यानंतर राजनाथ सिंह यांनी एका तांत्रिक प्रदर्शनाला भेट देऊन वर्तमान काळातील संरक्षण तंत्रज्ञान, प्रगत शस्त्रास्त्र प्रणाली आणि डीआरडीओ ने विकसित केलेल्या स्वदेशी क्षेपणास्त्र प्लॅटफॉर्मची पाहणी केली.

निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272366)
आगंतुक पटल : 8