श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी 9 जून रोजी जिनेव्हा येथे आयोजित 114 व्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केले

Posted On: 10 JUN 2026 1:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जून 2026

 

केंद्रीय श्रम आणि रोजगार तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आयोजित 114 व्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत (आयएलसी) भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केले. त्यांनी यावेळी समावेशक विकास, लिंग-समानता व सामाजिक संवादाप्रति भारताची वचनबद्धता अधोरेखित केली. 9 जून 2026 रोजी झालेल्या चर्चा आणि उच्च-स्तरीय द्विपक्षीय बैठकांच्या मालिकेत त्यांनी सहभाग घेतला. यामधून देशाची मजबूत, समन्वित राजनैतिक उपस्थिती दिसून आली.

 

जिनिव्हा येथील 114 व्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्र्यांनी नेपाळचे युवा, कामगार आणि रोजगार मंत्री रामजी यादव यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. नेपाळने भारताच्या डिजिटल पोर्टल्सची प्रशंसा केली. भारताने यावर भर दिला की, आपल्या ‘नेबरहूड फर्स्ट’ अर्थात 'शेजारी प्रथम' धोरणांतर्गत नेपाळ हा भारताचा एक प्राधान्यक्रमाचा भागीदार देश आहे. दोन्ही नेत्यानी यावेळी कौशल्य विकास, कामगारांची गतिशीलता आणि डिजिटल तंत्रज्ञानाची देवाणघेवाण या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. या चर्चेत दोन्ही देशांतील कामगारांसाठीच्या संधी आणि त्यांचे कल्याण वाढवण्याप्रति असलेल्या समान वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला, तसेच दोन्ही देशांमधील दीर्घकालीन आणि बंधुभावपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला.

 

केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि अंगोलाच्या सार्वजनिक प्रशासन, कामगार आणि सामाजिक सुरक्षा मंत्री तेरेसा रॉड्रिग्स डायस यांच्यातील बैठकीत कामगार आणि रोजगार, कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, सामाजिक संरक्षण आणि मनुष्यबळ प्रशिक्षण या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली. दोन्ही नेत्यानी रोजगार सेवा, कौशल्य, मनुष्यबळ नियोजन आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. अंगोला यांनी भारताच्या डिजिटल उत्पादनांची प्रशंसा केली आणि ज्ञानाचे आदान-प्रदान करण्याची विनंती केली. भारताने, रोजगार सेवा, कामगारांची नोंदणी आणि रोजगार  आणि कौशल्य यांची सांगड घालणे यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्सची रचना, विकास आणि अंमलबजावणी करण्यात अंगोला यांना तांत्रिक सहाय्य आणि क्षमता-विकास यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. मॉरिशसचे कामगार आणि औद्योगिक संबंध मंत्री मुहम्मद रेझा कासम उतीम यांच्याबरोबर झालेल्या द्विपक्षीय बैठकीत, केंद्रीय मंत्र्यांनी दोन्ही देशांमधील सामायिक इतिहास, संस्कृती, लोकशाही मूल्ये आणि लोकांमधील दृढ संबंधांवर आधारित घनिष्ठ आणि दीर्घकालीन संबंधांची प्रशंसा केली. भारताने कामगार आणि रोजगार क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात केलेल्या लक्षणीय प्रगतीची मॉरिशसने प्रशंसा केली. भारताने आपले कौशल्य सामायिक करण्याची तयारी पुन्हा एकदा दर्शवली आणि डिजिटल उत्पादनांच्या विकासासाठी मॉरिशसला सातत्याने तांत्रिक सहाय्य पुरवण्याचे आश्वासन दिले.

 

शोभा करंदलाजे यांनी जिनिव्हा येथे फ्रान्स, युके, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि कॅनडाच्या कामगार मंत्र्‍यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी कौशल्यांना परस्पर मान्यता आणि मागणीवर आधारित कौशल्य विकास यांद्वारे भारतातून कुशल मनुष्यबळाच्या स्थलांतरासाठीच्या कायदेशीर मार्गांबाबत चर्चा केली.

 

* * *

नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2271041) अभ्यागत कक्ष : 56