संरक्षण मंत्रालय
भारत आणि झिम्बाब्वेकडून द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार; संयुक्त संरक्षण समितीची (जेडीसी) पहिली बैठक नवी दिल्लीत संपन्न
Posted On:
04 JUN 2026 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2026
भारत-झिम्बाब्वे संयुक्त संरक्षण समितीची पहिली बैठक 04 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. दोन्ही बाजूंनी प्रशिक्षण, साहाय्य आणि सामायिक हवाई मालमत्तेची देखभाल यांसारख्या क्षेत्रांमध्ये विद्यमान सहकार्य वाढवून द्विपक्षीय संरक्षण संबंध दृढ करण्यास सहमती दर्शवली. तसेच संयुक्त उत्पादन, दहशतवादविरोधी मोहीम, सीमा व्यवस्थापन आणि शांतता मोहीम यांसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याच्या मार्गांवरही चर्चा केली.
UMWB.jpeg)
या बैठकीचे सह-अध्यक्षपद भारताच्या वतीने सहसचिव अमिताभ प्रसाद आणि झिम्बाब्वेच्या वतीने स्थायी सचिव ॲरॉन डॅनियल टोंडे न्हेपेरा यांनी भूषवले. न्हेपेरा हे भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या 12 सदस्यीय उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. भारतीय शिष्टमंडळात संरक्षण दल, संरक्षण उत्पादन विभाग आणि सशस्त्र दल वैद्यकीय सेवा यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील संरक्षण भागीदारी सातत्याने अधिक दृढ होत आहे. 'एरो इंडिया 2025' च्या निमित्ताने दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी स्वाक्षरी केलेल्या संरक्षण सहकार्य सामंजस्य करारातील उद्दिष्टांना कार्यान्वित करून, पहिल्या संयुक्त संरक्षण समितीच्या बैठकीने हे संबंध अधिक दृढ केले आहेत.
झिम्बाब्वेच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीतील डीपीएसयू भवनला देखील भेट दिली. यावेळी भारतीय संरक्षण उद्योगाच्या प्रतिनिधींसोबत परस्पर सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रांवर त्यांची चर्चा झाली. ॲरॉन डॅनियल टोंडे न्हेपेरा यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना आदरांजली वाहिली.
* * *
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2269080)
अभ्यागत कक्ष : 62