वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2011–12 मध्ये सुधारणा आता आधारभूत वर्ष 2022–23 असेल
सुधारित घाऊक किंमत निर्देशांक आणि नवीन उत्पादक मूल्य निर्देशांक 15 जून रोजी जारी केला जाणार
प्रविष्टि तिथि:
02 JUN 2026 7:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2026
दिनांक 25.05.2026 रोजी पार पडलेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला मंजुरी देण्यात आली.
केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतील आर्थिक सल्लागार कार्यालय नव्या निर्णयानुसार दिनांक 15.06.2026 रोजी दुपारी 12 वाजता आधारभूत वर्ष 2022-23 सह डब्ल्यूपीआयची सुधारित मालिका जारी करेल आणि ही मालिका आधारभूत वर्ष 2011-12 सह असलेल्या विद्यमान डब्ल्यूपीआय मालिकेची जागा घेईल. त्याबरोबरच हे कार्यालय उत्पादन उत्पादक मूल्य निर्देशांक (ओपीपीआय), प्रायोगिक निविष्ठा उत्पादक मूल्य निर्देशांक (आयपीपीआय) आणि बँकिंग, सुरक्षा ठेवींचे व्यवहार, विमा, निवृत्तीवेतन निधीचे व्यवस्थापन, रेल्वे, हवाई वाहतूक (प्रवासी) आणि दूरसंचार अशा सात प्रकारच्या सेवांसाठी सेवा प्रदाता उत्पादक मूल्य निर्देशांक(सर्व्हिस पीपीआय) यांची आधारभूत वर्ष 2022-23 असलेली नवी मालिका देखील जारी करणार आहे.
मूल्य वाढीच्या कलमांमध्ये डब्ल्यूपीआयचा विस्तृत वापर विचारात घेता, हा निर्देशांक, सुधारित मालिका जारी करण्याच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी पीपीआय सह जारी करण्यात येईल आणि त्यानंतर त्याचा वापर थांबवण्यात येईल. यामुळे वापरकर्त्यांना डब्ल्यूपीआय कडून पीपीआयकडे वळण्यासाठी पुरेसा कालावधी मिळेल. डब्ल्यूपीआयकडून पीपीआयकडे होणारे हे स्थित्यंतर प्रगत अर्थव्यवस्थांनी जागतिक पातळीवर स्वीकारलेल्या सर्वोत्तम पद्धती आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या शिफारसीना अनुरूप आहे.
डब्ल्यूपीआय आणि उत्पादन पीपीआय हे मासिक तत्वावर संकलित करण्यात येत आहेत आणि दिनांक 15.06.2026 रोजी एप्रिल 2023 पासून एप्रिल 2026 पर्यंत (37 महिने) या कालावधीतील आधीच्या मालिकांसह मे 2026 या महिन्यासाठी (तात्पुरत्या स्वरूपातील) उपलब्ध करून दिले जातील.
नवीन डब्ल्यूपीआय (2022-23) मालिकेची ठळक वैशिष्ट्ये:
- वस्तूंची वाढलेली संख्या: वस्तूंची संख्या वाढवून 697 वरुन 957 करण्यात आली आहे;
- विजेच्या गटांतर्गत नवीन आणि नुतनीकरणीय उर्जेचा समावेश: ‘वीज’ गटामध्ये सौर आणि पवन यांसारख्या नव्या उर्जा स्त्रोतांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर या गटामध्ये आण्विक विद्युतनिर्मितीचा देखील समावेश करण्यात आला आहे;
- उर्जेच्या किंमतींचा मागोवा घेण्यासाठी सुसंगत आणि एकात्मिक संरचना: कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू यांना ‘प्राथमिक वस्तूं’च्या गटाकडून ‘इंधन आणि वीज’ या गटाकडे स्थानांतरित करण्यात आले आहे. या गटामध्ये आधीपासूनच कोळसा, वीज आणि पेट्रोलियम उत्पादनांसारखी इतर प्रमुख इंधने समाविष्ट असल्यामुळे सदर पुनर्रचनेमुळे अधिक सुसंगतता येईल;
- वजनांच्या व्युत्पत्तीसाठी सुधारित पद्धत
- संगणनाची सुधारित पद्धत
- किंमतविषयक माहितीतील त्रुटी दूर करण्यासाठी सुधारित पद्धत
- जोडणारे घटक
डब्ल्यूपीआय, उत्पादन पीपीआय आणि सेवा पीपीआय हे मुलभूत किंमतीच्या (यामध्ये निव्वळ कर तसेच व्यापार आणि वाहतूक यांच्यातील तफावत ग्राह्य धरण्यात आलेली नाही) आधारावर संकलित करण्यात येतात, तर उद्योग बाजारपेठांमधून निविष्ठा खरेदी करत असल्यामुळे निविष्ठा पीपीआय हा खरेदीदाराच्या किमतीनुसार संकलित करण्यात येतो.
* * *
सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2268114)
आगंतुक पटल : 43