संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणमंत्री आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान व संरक्षणमंत्री यांच्यात नवी दिल्लीत दुसरा भारत–ऑस्ट्रेलिया संरक्षणमंत्री संवाद

Posted On: 31 MAY 2026 5:00PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 31 मे 2026

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान व संरक्षणमंत्री रिचर्ड मार्ल्स 1 जून 2026 रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या दुसऱ्या भारत–ऑस्ट्रेलिया संरक्षणमंत्री संवादाचे सह-अध्यक्षस्थान भूषवतील. या संवादामध्ये द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार असून सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेतला जाईल.

या चर्चांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अधिक बळकट करणे, दोन्ही देशांच्या सैन्यांमधील परस्पर कार्यक्षमता वाढविणे, उद्योग क्षेत्रातील सहकार्य तसेच संयुक्त विकास आणि संयुक्त उत्पादनाच्या संधी, तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा घडामोडींवर भर दिला जाणार आहे.

ही बैठक भारत–ऑस्ट्रेलिया संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यास, सामरिक विश्वास आणि सहकार्य वाढविण्यास, इंडो-पॅसिफिक प्रदेशातील स्थैर्य व सुरक्षिततेला चालना देण्यास आणि संरक्षण व सुरक्षा क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या क्षेत्रांची ओळख करून देण्यास महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा आहे.

रिचर्ड मार्ल्स यांचा हा दौरा ऑक्टोबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या पहिल्या संवादानंतर होत असून, तो भारत–ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक सामरिक भागीदारीला मिळालेल्या वाढत्या गतीचे प्रतीक आहे.

मुक्त, खुला, सर्वसमावेशक आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेशाच्या भारताच्या दृष्टीकोनात ऑस्ट्रेलिया हा एक महत्त्वाचा भागीदार आहे. हा दौरा भारत–ऑस्ट्रेलिया संरक्षण भागीदारीतील वाढती सखोलता आणि परिपक्वता अधोरेखित करतो.


यश राणे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2267255) अभ्यागत कक्ष : 6