उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींची गोव्यातील सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीला भेट


उपराष्ट्रपतींनी तरुण शास्त्रज्ञांना निर्भयपणे स्वप्न पाहण्याचे आणि नाविन्यपूर्ण संशोधन करण्याचे केले आवाहन

“समुद्रविज्ञान हे मानवतेचे भविष्य सुरक्षित करण्याचे साधन आहे”: उपराष्ट्रपती

“आपले समुद्र हे भारताला जागतिक समृद्धी आणि राजनैतिक शक्तीशी जोडणारे सेतू आहेत”: उपराष्ट्रपती

भारताने कोविड-19 च्या कालखंडात पेटंटऐवजी मानवतेला प्राधान्य दिले: उपराष्ट्रपती

Posted On: 30 MAY 2026 5:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मे 2026

 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज गोव्यात पणजी येथील कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (सीएसआयआर-एन आय ओ) या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेला भेट दिली.

संस्थेतील शास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, सुमारे 11,000 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेल्या भारतासाठी समुद्र हे केवळ एक संसाधन नसून आदर ठेवावा आणि संरक्षण करावे, अशी एक जिवंत परिसंस्था आहे. भारताचे समुद्र हे देशाला जगापासून वेगळे करणाऱ्या सीमा नसून, जागतिक व्यापार, ऊर्जा सुरक्षा, आर्थिक समृद्धी आणि धोरणात्मक शक्तीशी जोडणारे सेतू आहेत, असे त्यांनी नमूद केले.

 

शतकानुशतके हिंदी महासागराने भारताच्या संस्कृतीच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगत, त्यांनी भारताच्या सागरी वारशाचे महत्व अधोरेखित केले. प्राचीन काळी भारतीय व्यापारी, विद्वान आणि नाविक यांनी समुद्रमार्गाने दूरवर प्रवास करत विविध देशांशी सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध प्रस्थापित केले होते, याचे स्मरणही त्यांनी करुन दिले.

सीएसआयआर-एनआयओ ही संस्था जवळपास सहा दशकांपासून भारताची एक अग्रगण्य वैज्ञानिक संस्था राहिली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. आपल्या संशोधन, नवोन्मेष आणि शोधांच्या माध्यमातून ही संस्था भारताला अधिक स्वावलंबी आणि भविष्यासाठी सज्ज बनवण्यास मदत करत आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक सहकार्य मजबूत करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचेही उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. सीएसआयआर आणि नॉर्वेच्या रिसर्च कौन्सिल दरम्यान स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य कराराचा  संदर्भ देत ते म्हणाले की, या भागीदारीमुळे संशोधन, नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास आणि क्षमता उभारणीला चालना मिळेल. भारतीय संशोधन संस्थांनी, जागतिक स्तरावरील प्रगत प्रणालींमधून सातत्याने शिकले पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मानकांनुसार आपली गुणवत्ता राखली पाहिजे, असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

हवामान बदल, समुद्राची वाढती जलपातळी, सागरी प्रदूषण, जैवविविधतेचे नुकसान आणि प्लास्टिकचे सूक्ष्म कण यांच्या वाढत्या आव्हानांचा उल्लेख करत उपराष्ट्रपती म्हणाले की, जगभरातील किनारी भागात वास्तव्य करत असलेल्या समुदायाची असुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. निसर्ग पणाला लावून विकास होऊ नये यावर भर देत, समुद्रविज्ञान आता केवळ वैज्ञानिक शोधांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर मानवतेचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि एक शाश्वत, सुरक्षित आणि समृद्ध जग निर्माण करण्यासाठी ते आवश्यक बनले आहे, असे त्यांनी सांगितले. विज्ञानातील प्रगती, संवेदनशीलता, शाश्वतता आणि सामाजिक उत्तरदायित्व या तत्त्वांच्या आधारेच घडली पाहिजे, असे सांगत, त्यांनी जबाबदार नाविन्यपूर्ण संशोधनाच्या महत्त्वावर भर दिला.
देशाच्या भविष्यवेधी उपक्रमांचा उल्लेखही उपराष्ट्रपतींनी केला. खोल महासागरीय क्षेत्रातील मोहीमा, नील अर्थव्यवस्थेशी संबंधीत उपक्रम, हरित हायड्रोजन अभियान आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील भागीदारी यांसारखे कार्यक्रमातून भविष्याचा धाडसाने विचार करणाऱ्या देशाचे प्रतिबिंब दिसून येते असे उपराष्ट्रपती म्हणाले.

कोविड-19 साथ रोगाच्या काळात देशाने बजावलेल्या भूमिकेचा उल्लेखही त्यांनी केला. देशाच्या विज्ञाननिष्ठ प्रगतीमुळे, आपल्याला भारतीयांसोबतच अनेक विकसनशील देशांचीही मदत करता आली, यातून ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेचे प्रत्यक्ष दर्शन घडले, असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले. अनेक देश पेटंट मिळवण्यासाठी धडपडत असताना, आपण मात्र मानवतेची सेवा करण्याचा पर्याय निवडला असे ते म्हणाले. जर भारत अधिक सामर्थ्यशाली झाला तर मानवता अधिक सुरक्षित हातात राहील, असेही ते पुढे म्हणाले.

युवा संशोधक आणि विद्यार्थ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. युवा वर्ग आणि संशोधकांनी  निर्भीडपणे स्वप्न पाहायला हवीत तसेच अथक परिश्रमही करायला हवेत असे आवाहन त्यांनी केले. गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनातून मिळणाऱ्या प्रेरणेचा संदर्भ त्यांनी दिला. खरी उत्कृष्टता ही बऱ्याचदा एखाद्या विषयाबद्दलच्या अत्यंतिक वैयक्तिक आवडीतून आणि समर्पणातून निर्माण होत असते असे त्यांनी सांगितले. यामुळे संस्थांत्मक यंत्रणांनी आणि वरिष्ठ मार्गदर्शकांनी अशा गुणवत्तेला प्रोत्साहन देत ती जोपासली पाहिजे ही बाब त्यांनी अधोरेखीत केली.

हवामान बदलांवरील उपाय, सागरी जैवतंत्रज्ञान, अक्षय उर्जा किंवा महासागरीय संवर्धन या क्षेत्रांमधील भविष्यातले मोठे संशोधन या संस्थेमध्ये उपस्थित असलेल्या युवा प्रतिभेतून येऊ शकते, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला. इथल्या उपस्थितांपैकीच कोणीतरी एक दिवस जगातील सर्वात खोल महासागरात देशाच्या भविष्यातील मोहिमांचे नेतृत्व करू शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आपल्या या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपतींनी विविध प्रयोगशाळांना भेटी दिल्या तसेच संस्थेचे प्रमुख प्रकल्प आणि वैज्ञानिक उपक्रमांची मांडणी असलेल्या संशोधन आणि तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनाची पाहणीही केली. यावेळी त्यांच्या हस्ते “अ डायमंड लेगसी ऑफ ओशिनोग्राफिक एक्सलन्स” या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

या सोहळ्याला गोव्याचे राज्यपाल पुसपती अशोक गजपती राजू, राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या अखत्यारीतील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे संचालक सुनील कुमार सिंग आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

* * *

राधिका अघोर/आशुतोष सावे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2267003) अभ्यागत कक्ष : 19