आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशाचे राष्ट्रीय आरोग्य लेखा अंदाज 2022-23 केले प्रसिद्ध
सरकारच्या वतीने केल्या जाणाऱ्या आरोग्य विषयक खर्चात तिपटीने वाढ, 2013-14 ते 2022-23 दरम्यान आरोग्य विषयक खर्च ₹1.30 लाख कोटींवरून वाढून ₹3.85 लाख कोटींवर पोहचला
प्रविष्टि तिथि:
27 MAY 2026 7:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2026
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशाचा राष्ट्रीय आरोग्य लेखा अंदाज 2022 - 23 प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रीय आरोग्य लेखा 2022 - 23 हा आरोग्य विषयक खर्चाच्या अंदाजासंबंधीचा दहावा अहवाल आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संसाधन केंद्राअंतर्गतच्या, राष्ट्रीय आरोग्य लेखा तांत्रिक सचिवालयाने हा अंदाज विषयक अहवाल तयार केला आहे. यासाठी लेखा प्रणाली 2011 च्या आराखड्याचा वापर केला गेला आहे. या अहवालात 2013-14 पासून सरकारच्या वतीने आरोग्य सेवेवरील खर्चात केलेली वाढ मांडली आहे. यातून आरोग्य क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीला बळकटी देण्याचे सरकारचे सातत्यपूर्ण प्रयत्न दिसून येतात.
देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात, सरकारच्या वतीने केल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक खर्चाचा वाटा 2013-14 मधील 1.15% तुलनेत वाढला असून, 2022-23 मध्ये 1.43% वर पोहोचला आहे.

सरकारच्या वतीने केल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक खर्चात गेल्या दशकभरात वाढीचा कल राहिला आहे. यामुळे नागरिकांना एकूण आरोग्यविषयक खर्चात, स्वतःहून कराव्या लागणाऱ्या खर्चात घट झाली आहे. यादृष्टीने केंद्र सरकारने विशेषतः कोविड महामारीच्या काळात केलेल प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
विविध आरोग्यविषयक योजना आणि आरोग्य सुविधांच्या सार्वत्रिक व्याप्तीप्रती असलेल्या आपल्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेच्या माध्यमातून, देशभरातील कुटुंबांवरचा स्वतःहून कराव्या लागणाऱ्या खर्चाचा भार कमी करण्याला सरकारने प्राधान्यक्रमावर ठेवले आहे. त्याअनुषंगाने केलेल्या प्रयत्नांमुळे 2013-14 आणि 2022-23 या कालावधी दरम्यान, एकूण आरोग्य खर्चापैकी कुटुंबांना स्वतःहून कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या वाट्यात 21 टक्क्यांची लक्षणीय घट झाली असून, हे प्रमाण 64.2% वरून 43.4% पर्यंत कमी झाले आहे.
आज प्रसिद्ध करण्यात आलेले राष्ट्रीय आरोग्य लेखा अंदाज 2022-23 या संकेतस्थळावर पाहता येतील :
https://nhsrcindia.org/national-health-accounts-records
पार्श्वभूमी : राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संसाधन केंद्राअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य लेखा अंदाजांना 2014 मध्ये संस्थात्मक स्वरूप दिले गेले होते आणि राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संसाधन केंद्राला राष्ट्रीय आरोग्य लेखा तांत्रिक सचिवालय म्हणून नियुक्त केले गेले होते.
आतापर्यंत 9 राष्ट्रीय आरोग्य लेखा अंदाज (2013-14 ते 2021-22) तयार केले गेले आहेत.
सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2266031)
आगंतुक पटल : 54