संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातच्या मुंद्रा किनाऱ्यानजीक भारतीय तटरक्षक दलाची तस्करीविरोधी मोहीम


तटरक्षक दल आणि एटीएस गुजरात यांनी केलेल्या कारवाईत 1150 कोटी रुपये किमतीचे 115 किलो कोकेन जप्त

Posted On: 27 MAY 2026 5:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मे 2026

सागरी मार्गाने होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठे यश मिळवत भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) समन्वयाने 25-26 मे 2026 रोजी गुजरातच्या मुंद्रा किनाऱ्या नजीक केलेल्या तस्करीविरोधी मोहिमेत सुमारे 115 किलो कोकेन जप्त केले. ही मोहीम संयुक्त गुप्त माहितीवर आधारित होती. सार्वजनिक स्रोतांच्या मूल्यांकनानुसार जप्त केलेल्या अमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य सुमारे 1150 कोटी रुपये आहे.

गुजरात एटीएसने दिलेल्या विशिष्ट आणि कारवाईयोग्य गुप्त माहितीच्या आधारे, आयसीजीच्या इंटरसेप्टर बोटींसह एटीएस कर्मचाऱ्यांच्या सहभागातून मुंद्रा अँकरेज परिसरात एक व्यापक शोध मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान, एका कंटेनर जहाजावर संशयास्पद हालचाल आढळून आली. जलद कारवाई आणि अखंड आंतर-संस्था समन्वयाचे प्रदर्शन करत, पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि समुद्रातून पाच पिशव्या जप्त केल्या.

तपासणी केल्यावर, त्या पिशव्यांमध्ये पांढऱ्या पावडरसारख्या पदार्थाची पाकिटे आढळली. ही पाकिटे कोकेनची असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कारवाईदरम्यान, प्रत्येकी सुमारे एक किलो वजनाची एकूण 115 पाकिटे, म्हणजेच एकूण सुमारे 115 किलो वजनाचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. त्यानंतर, पुढील तपासासाठी जहाज बंदरावर आणण्यात आले आहे.

गेल्या पाच वर्षांत भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएस यांनी संयुक्तपणे हाती घेतलेली ही 15 वी यशस्वी अमली पदार्थ विरोधी मोहीम होती. ही मोहीम सागरी सुरक्षा मजबूत करण्याच्या आणि 'नशामुक्त भारत' या राष्ट्रीय दृष्टिकोनाला साकार करण्याच्या अतुट वचनबद्धतेची पुष्टी करते.

निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2265967) अभ्यागत कक्ष : 21