शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीबीएसई पेमेंट गेटवे प्रणालीमध्ये सुधारणा करण्याबाबत सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केली चर्चा
Posted On:
26 MAY 2026 8:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मे 2026
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) पेमेंट गेटवे प्रणालीच्या सुधारणेसंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि इंडियन बँक या सार्वजनिक क्षेत्रातील चार प्रमुख बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

बैठकीदरम्यान, मंत्र्यांनी पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळवणे आणि इतर शुल्क-आधारित प्रक्रिया यांसारख्या परीक्षा-पश्चात सेवांसाठी एका मजबूत,विश्वासार्ह आणि विद्यार्थी-स्नेही पेमेंट प्रणालीच्या गरजेवर भर दिला.
वेळेवर व्यवहार, पेमेंट-संबंधित समस्यांचे त्वरित निराकरण आणि जास्त झालेल्या किंवा अयशस्वी झालेल्या पेमेंटसाठी स्वयंचलित परतावा सुनिश्चित करण्यासाठी मजबूत पेमेंट प्रोटोकॉल स्थापित करण्यात सीबीएसईला मदत करण्याचे निर्देश त्यांनी बँकांना दिले. प्रगत तांत्रिक सुरक्षा उपाय, रिअल-टाइम देखरेख आणि जलद तक्रार निवारण यंत्रणांद्वारे पेमेंट गेटवे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सीबीएसईसोबत एकत्रितपणे काम करण्यास बँकांना सांगण्यात आले आहे.
या उपक्रमाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन प्रधान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केले, जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यात तांत्रिक अडचणी किंवा पेमेंट अयशस्वी झाल्याचा सामना करावा लागणार नाही. त्यांनी बँकांना सुरळीत, सुरक्षित आणि कार्यक्षम डिजिटल व्यवहार सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.
चारही बँकांनी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आणि सीबीएसईच्या समन्वयाने लवकरात लवकर सुधारित प्रोटोकॉल आणि तांत्रिक सुधारणा लागू करण्याची वचनबद्धता दर्शवली.
यापूर्वी, प्रधान यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी सीबीएसईच्या निकालानंतरच्या आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या पेमेंट आणि तांत्रिक समस्यांबाबत 24 मे 2026 रोजी चर्चा केली होती.
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2265616)
अभ्यागत कक्ष : 16