वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल उच्चस्तरीय व्यावसायिक परिषदेसाठी आणि भारत-कॅनडा सीइपीए चर्चेसाठी कॅनडाला भेट देणार
Posted On:
23 MAY 2026 7:45PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल 25 ते 27 मे दरम्यान कॅनडाला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते भारत आणि कॅनडा यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक व भागीदारी कराराबाबतच्या (सीइपीए) सध्या सुरू असलेल्या वाटाघाटी पुढे सुरू ठेवतील तसेच प्रशासकीय, औद्योगिक व व्यावसायिक परिसंवादात सहभागी होतील. धातू व खनिज, उर्जा, वाहन व भांडवली उद्योग, अंतराळ, पर्यटन, चर्मोद्योग व वस्त्रोद्योग, कृषी, दूरसंवाद आणि औषधनिर्माण क्षेत्रातील भारतातील 100 पेक्षा जास्त उद्योगांचे वरीष्ठ प्रतिनिधी यावेळी गोयल यांच्यासोबत असतील.
गोयल या दौऱ्यात कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मणींदर सिद्धू यांना भेटून भारत कॅनडा सीइपीए कराराच्या प्रगतीचा आढावा घेतील तसेच व्यापार व गुंतवणुकीच्या नव्या संधींचा शोध घेतील. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे 8 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका होता, त्यापैकी भारताची निर्यात 4.67 अब्ज अमेरिकी डॉलर्स होती, तर आयात 3.28 अमेरिकी डॉलर्सची होती.
मंत्री गोयल कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी संवाद साधतील तसेच परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांच्याशी प्राधान्य क्षेत्रातील धोरणात्मक सहकार्य मजबूत करण्याबाबत चर्चा करतील. कॅनडातील आघाडीच्या कंपन्या, स्टार्ट अप्स व निवृत्तीवेतन निधी यांच्याशीही वाणिज्य आणि उद्योग मंत्री गोयल चर्चा करतील.
दोन्ही देशांसाठी उर्जा सुरक्षा व उर्जा संक्रमण ही महत्त्वाची प्राधान्याची क्षेत्रे आहेत. कॅनडाचा व्यापक ऊर्जा व नैसर्गिक स्रोत साठा आणि भारताची वाढती ऊर्जा गरज परस्परपूरक आहेत. शिवाय भारत आणि कॅनडा यांच्यामधील नागरी आण्विक सहकार्य हा उर्जा भागीदारीचा पाया आहे.------------------ संस्थात्मक सहभागाच्या शिस्तबद्ध पाठबळावर विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्याचा पाया भक्कमपणे उभारला जातो. एआय संशोधन, मानके आणि नवोन्मेष परिसंस्थांमध्ये भारत-कॅनडा यांच्यात अधिक दृढ सहकार्याला मोठा वाव आहे.
2025 वर्षाच्या मध्यापासून भारत आणि कॅनडा यांच्यातील सातत्यपूर्ण उच्चस्तरीय संबंधांमुळे,ज्यात 2 मार्च 2026 रोजी पंतप्रधान कार्नी यांनी दिलेल्या भारत भेटीचाही समावेश आहे, तेव्हापासून द्विपक्षीय संबंध आणि उभय देशांतील नागरिकांच्या संबंधांना पुन्हा गती मिळण्यात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. याच भेटीदरम्यान भारत-कॅनडा यांच्यातील सीईपीए (CEPA) कराराच्या वाटाघाटींनाही सुरुवात झाली होती.
भारत-कॅनडा CEPA करारातील वाटाघाटींची दुसरी फेरी पार पाडण्यासाठी कॅनडाच्या एका अधिकृत शिष्टमंडळाने 4 ते 7 मे 2026 दरम्यान नवी दिल्लीला भेट दिली होती.भारत-कॅनडा सीईपीएसाठी वाटाघाटींची पुढील दुसरी फेरी सुरू ठेवण्यासाठी एचसीआयएमसोबत अधिकारीही असतील.दोन्ही देश वाटाघाटींना गती देण्यास कटिबद्ध आहेत.
भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 50 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट दोन्ही देशांसमोर आहे.
कॅनडामध्ये 28 लाख भारतीय आहेत (ज्यात सुमारे 8 लाख इंडो-कॅनेडियन नागरिक आणि सुमारे 10 लाख अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे), जे दोन्ही देशांमधील एक सक्षम दुवा आहेत. भारताला आपल्या अनिवासी (कॅनडास्थित)भारतीयांचा आणि कॅनडामधील त्यांच्या कामगिरीचा खूप अभिमान आहे.
भारत आणि कॅनडा यांनी द्विपक्षीय संबंधांमधील व्यापक राजकीय आणि आर्थिक नूतनीकरणासोबतच, रणनैतिक आणि सुरक्षा माध्यमांतर्फे होणाऱ्या संरचित संवादांना पुनश्च गती मिळाली आहे. या भेटीमुळे परस्पर महत्त्वाच्या प्रमुख क्षेत्रांमधील सहकार्याची शक्यता पडताळून पाहणे, परस्पर विश्वास दृढ करणे आणि प्रचंड वेगाने विस्तारण्याची क्षमता असलेल्या या भागीदारीला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा आहे.
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2264678)
अभ्यागत कक्ष : 5