अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी गांधीनगर येथील गिफ्ट सिटीमध्ये पंतप्रधानांचे प्रधान सचिव आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले


गिफ्ट सिटीच्या माध्यमातून भारत व्याप्ती, तंत्रज्ञान, प्रतिभा आणि विकासाच्या संधी यांचा एक अद्वितीय मिलाफ सादर करतो: अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Posted On: 22 MAY 2026 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मे 2026

 

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी गांधीनगर येथील गिफ्ट सिटीमध्ये गिफ्ट सिटीच्या प्रगतीचा तसेच तेथे विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा परिसंस्थेचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले.

बैठकीदरम्यान बँकिंग, भांडवली बाजार, निधी व्यवस्थापन, विमा आणि पुनर्विमा, विमान आणि जहाज भाडेपट्टी, फिनटेक, सराफा विनिमय, आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि संबंधित सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये गिफ्ट सिटीने केलेल्या प्रगतीवर सादरीकरणे करण्यात आली.

पायाभूत सुविधांचा विकास, प्रतिभा परिसंस्था, व्यवसाय सुलभता, करप्रणाली, निवासी परिसंस्था आणि स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय वित्तीय व व्यावसायिक केंद्र म्हणून जागतिक स्तरावर गिफ्ट सिटीचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना यांवर चर्चा करण्यात आली.

वित्तीय सेवा, तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या 1,150 हून अधिक संस्था आज गिफ्ट सिटीमध्ये आहेत. गिफ्ट सिटीमधील बँकिंग मालमत्ता 110 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे तर निधी व्यवस्थापन उपक्रमांतर्गत भांडवली वचनबद्धता 32 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. या परिसंस्थेमध्ये 37 बँकिंग युनिट्स, 217 निधी व्यवस्थापन संस्था, 36 विमा कंपन्या, 35विमान भाडेपट्ट्यावरील कंपन्या आणि 36 जहाज भाडेपट्ट्यावरील संस्था तसेच आंतरराष्ट्रीय एक्सचेंज, फिनटेक कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे यांचा समावेश आहे.

आढाव्यानंतरच्या आपल्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जागतिक स्तरावर प्रमाणित संस्थात्मक चौकट, नियामक लवचिकता आणि सहाय्यक सामाजिक परिसंस्थेच्या पाठबळावर भारताचे जागतिक वित्तीय बाजारांशी असलेले एकीकरण अधिक दृढ करण्यासाठी तसेच देशात आंतरराष्ट्रीय भांडवलाचा ओघ सुलभ करण्यासाठी गिफ्ट सिटीच्या धोरणात्मक महत्त्वावर प्रकाश टाकला.

गिफ्ट सिटी ही भारताच्या आंतरराष्ट्रीय वित्तीय रचनेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून उदयास आली आहे आणि ती देशाचा वाढता आर्थिक आत्मविश्वास व जागतिक आकांक्षा दर्शवते, असे नमूद करून सीतारामन म्हणाल्या की, आज भारत व्याप्ती, तंत्रज्ञान, प्रतिभा आणि विकासाच्या संधी यांचे एक अद्वितीय मिश्रण सादर करतो.

तळागाळात बदल घडवून आणणाऱ्या तात्काळ कृषीविषयक भविष्यवेधी चर्चांच्या महत्त्वावरही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भर दिला.

 

* * *

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2264415) अभ्यागत कक्ष : 18