वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
68व्या आशियाई उत्पादकता संघटनेच्या (एपीओ) नियामक मंडळाच्या बैठकीचं नवी दिल्लीत आयोजन; प्रादेशिक उत्पादकता सहकार्य करण्यावर बैठकीत भर
आजच्या काळात उत्पादकता म्हणजे अनुकूलन, नवोन्मेष आणि सर्वसमावेशक विकास : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
प्रविष्टि तिथि:
21 MAY 2026 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मे 2026
आशियाई उत्पादकता संघटनेच्या 68व्या सत्राच्या पहिल्या दिवसाचा आज, भारत मंडपम मध्ये यशस्वी प्रारंभ झाला. या बैठकीला वरिष्ठ सरकारी अधिकारी, राष्ट्रीय उत्पादकता संघटनेचे (NPO) प्रमुख, धोरणकर्ते, उत्पादकता विषयातील तज्ज्ञ, आणि आशियाई उत्पादकता संघटनेचे सदस्य असलेल्या अर्थव्यवस्थांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले आहेत.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचं उद्घाटन करण्यात आलं. गोयल यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बैठकीला संबोधित केलं.
आशियाई उत्पादकता संघटनेचा भारत मावळता अध्यक्ष आहे. APOच्या परिवर्तनाच्या टप्प्यात योगदान देण्याचा बहुमान भारताला मिळाला, असं गोयल आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले. हे परिवर्तन तंत्रज्ञान, शाश्वतता आणि सतत बदलत असलेली जागतिक गतिशीलता अर्थव्यवस्थांना आकार देत आहे, असं ते पुढे म्हणाले. आज, उत्पादकता ही केवळ कार्यक्षमतेपुरती मर्यादित नसून, त्यात अनुकूलन, नवोन्मेष आणि सर्वसमावेशक वाढ अंतर्भूत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने केलेल्या सुधारणांवर गोयल यांनी प्रकाश टाकला. 'मेक इन इंडिया', 'स्टार्टअप इंडिया', 'स्कील इंडिया', 'उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना', 'पीएम गती शक्ती मास्टर प्लान', 'राष्ट्रीय पुरवठा साखळी धोरण', 'युपिआय', 'आधार', तसंच 'ओएनडीसी' सारखे उपक्रम उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशाने केलेल्या परिवर्तनाची उदाहरणे असल्याचं त्यांनी नमूद केलं, त्याच वेळी, एपीओच्या माध्यमातून प्रादेशिक सहकार्य, शाश्वत विकास आणि भविष्यात होणाऱ्या विकासासाठी सज्ज होण्याची भारताची वचनबद्धता त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
मान्यवर आणि प्रतिनिधींचं आगमन आणि त्यांच्या स्वागत समारंभाने बैठकीच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली. राष्ट्रीय उत्पादकता परिषदेच्या (NPC) महासंचालक नीरजा शेखर यांनी अभ्यागतांचं स्वागत केलं आणि बैठकीच्या कार्यवाहीला सुरुवात झाली. देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अधिक बळकट करण्यासाठी, स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी, तसंच शाश्वत आणि लवचिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी; डिजिटल परिवर्तन, हरित उत्पादकता, क्षमता बांधणी आणि मोजता येण्याजोगे परिणाम साध्य करण्याबाबतच्या NPC ची कटीबद्धता अधोरेखित केली. भारतातील आशियाई उत्पादकता संघटनेचे संचालक आणि केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत असलेल्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे (DPIIT) चे सचिव अमरदीप सिंघ भाटीया यांनी उद्घाटनपर भाषण केलं. 'एपीओ व्हिजन 2030' आणि धोरणात्मक सुधारणामुळे, सर्व सदस्य अर्थव्यवस्थामधील संस्थात्मक सहकार्य, प्रशासन आणि परिणाम आधारित विकास अधिक मजबूत होईल असं ते म्हणाले.
'एपीओ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा' हे या सत्राचं प्रमुख आकर्षण होत. नीती आयोगाचे माजी अध्यक्ष तसंच, एपीओ राष्ट्रीय पुरस्कार शोध आणि निवड समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी उपस्थितांना संबोधित केलं. राष्ट्रीय आणि प्रादेशिक उत्पादकता वाढीसाठी योगदान देणाऱ्या 'उत्पादकता-चॅम्पियन्स' आणि तांत्रिक तज्ज्ञांचा गौरव करण्याचं महत्व त्यांनी प्रकर्षाने मांडलं.
* * *
शैलेश पाटील/सविता म्हस्कर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2263951)
आगंतुक पटल : 38