वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि अमेरिका नैसर्गिक भागीदार म्हणून काम करत आहेत; परस्परपूरकता आणि विश्वास हे संबंधाचे आधार : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल


जागतिक संकटांच्या काळातही वेळेवर आणि उच्च-गुणवत्तेची उत्पादने देण्यासाठी भारतावर विश्वास ठेवता येईल: गोयल

भारत पुढील किमान 25 वर्षे जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील: गोयल

Posted On: 21 MAY 2026 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मे 2026

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले की, भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार म्हणून काम करत असून तंत्रज्ञान नवोन्मेष, उच्च तपशील संरक्षण प्रणाली, डिजिटल डेटा सेंटर्स, क्वांटम कंप्युटिंग आणि वैद्यकीय उपकरणे यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये ते एकमेकांना पूरक आहेत. नवी दिल्ली येथे अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वार्षिक नेतृत्व शिखर परिषदेला ते संबोधित करत होते. परस्पर विश्वास आणि समान आर्थिक हितसंबंधांमुळे दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक मजबूत झाली आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या सहा महिन्यांत अमेरिकन उद्योगाकडून 60 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीची बांधिलकी व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये ऍमेझॉन आणि गुगलसारख्या कंपन्यांच्या मोठ्या डेटा सेंटर गुंतवणुकीचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

अमेरिका एका विश्वासार्ह भागीदाराच्या शोधात आहे आणि भारताने सातत्याने बौद्धिक संपदा हक्कांचा सातत्याने आदर राखत वेळेवर उच्च-गुणवत्तेची उत्पादने देण्याची क्षमता सिद्ध केली आहे, असे त्यांनी नमूद केले. भारताकडे कुशल मनुष्यबळाचा मोठा साठा आहे असून 1.4 अब्ज महत्त्वाकांक्षी भारतीय, वाढते उत्पन्न आणि विस्तारत असलेला मध्यमवर्ग यांच्या माध्यमातून अमेरिकन नवोन्मेषाला मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.

केंद्र सरकार 'भव्य' योजनेद्वारे औद्योगिक विकासासाठी क्षेत्र-आधारित दृष्टिकोन देखील अवलंबत आहे. देशभरात 100 नवीन औद्योगिक पार्क तयार करणे, हा या योजनेचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. हे मॉडेल औद्योगिक पायाभूत सुविधांना कामगारांची निवास व्यवस्था, मनोरंजन आणि सामाजिक सुविधांशी जोडणारे असून यामुळे एक समग्र औद्योगिक परिसंस्था तयार होते, हे त्यांनी नमूद केले.

सुधारित पायाभूत सुविधा, कमी झालेला वाहतूक खर्च आणि मुक्त व्यापार करार हे सर्व मिळून गुंतवणूक, उत्पादन वाढ आणि निर्यात स्पर्धात्मकतेचे एक सकारात्मक चक्र निर्माण करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. आगामी किमान 25 वर्षे भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम राखेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जागतिक पुरवठा साखळी मजबूत करण्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (MSMEs) भूमिकेवर गोयल यांनी यावेळी प्रकाश टाकला. एमएसएमई क्षेत्रातील तंत्रज्ञानात सुधारणा आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी सरकारने एक समन्वित मोहीम सुरू केली आहे. यामध्ये एमएसएमई मंत्रालय आणि उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभाग एकत्रितपणे काम करत असल्याचे ते म्हणाले. प्रस्तावित 'निर्यात प्रोत्साहन मोहीम' लघु उद्योगांना जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे मिळवून देण्यास मदत करेल, जी आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीचा हिस्सा बनण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे गोयल यांनी सांगितले. संपूर्ण भारतामध्ये जागतिक दर्जाची चाचणी आणि गुणवत्ता पायाभूत संरचना उभारण्यासाठी 'एक्स्पोर्ट इन्स्पेक्शन कौन्सिल', 'भारतीय मानक ब्युरो' आणि 'FSSAI' यांसारख्या संस्था एकमेकांच्या सहकार्याने काम करत असल्याचे गोयल पुढे म्हणाले.

जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारताने दाखवलेल्या लवचिकतेवरही त्यांनी प्रकाश टाकला. युक्रेन संघर्ष आणि पश्चिम आशियातील संकट यासारख्या आव्हानांनंतरही भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 6.4 टक्क्यांवरून वाढवून 6.5 टक्के करण्यात आला आहे. हे भारताची क्षमता, खंबीर नेतृत्व आणि एक विश्वासार्ह व पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून जगाशी जोडले जाण्याचा वाढता आत्मविश्वास दर्शवतअसल्याचे गोयल यांनी नमूद केले.

भारतात सध्या 2,117 'जागतिक  क्षमता केंद्रे' कार्यरत असून, याद्वारे अंदाजे 23.5 लाख लोकांना थेट रोजगार मिळाला असून, यातून जवळपास 98 अब्ज डॉलर्सचा महसूल गोळा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. जेव्हा अनेक देश कमी आर्थिक विकास दराशी संघर्ष करत आहेत, अशा वेळी या घडामोडी भारताच्या शाश्वत आणि निरंतर आर्थिक वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे गोयल म्हणाले.

'विकसित भारत 2047' च्या संकल्पनेबद्दल गोयल यांनी, यशस्वी व्यवसायांप्रमाणेच सरकार देखील अगदी स्पष्टपणे निश्चित केलेली उद्दिष्टे आणि दीर्घकालीन नियोजनावर काम करत असल्याचे सांगितले. 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये देशाचे दरडोई उत्पन्न 20,000 डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे आणि लोकसंख्या सुमारे 160 कोटी असण्याचा अंदाज गृहीत धरण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

* * *

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2263949) अभ्यागत कक्ष : 15