युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली इंदूर येथे ब्रिक्स युवा परिषदेच्या उद्योजकता कार्य गटाची बैठक संपन्न

प्रविष्टि तिथि: 21 MAY 2026 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मे 2026

 

ब्रिक्स देशांमधील उद्योजकताविषयक सहकार्य मजबूत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या, दोन दिवस चाललेल्या चर्चा, सहयोगात्मक उपक्रम तसेच माहिती-सामायीकीकरण सत्रांनंतर मध्य प्रदेशात इंदूर येथे आयोजित ब्रिक्स युवा परिषदेची  उद्योजकता कार्यगटाची बैठक आज संपन्न झाली.

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपद 2026 अंतर्गत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातील युवा व्यवहार विभागाने आयोजित केलेल्या या बैठकीला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय (दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून) तसेच केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या.

या बैठकीच्या समारोप सत्राला संबोधित करताना केंद्रीय युवा व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव नितेश कुमार मिश्रा यांनी ब्रिक्स देशांमध्ये उद्योजकतेच्या परिसंस्था बळकट करण्यात सामुहिक कृतीच्या महत्त्वावर अधिक भर दिला. ते म्हणाले, “उद्योजकता हा काही थोडक्या व्यक्तींना लाभलेला विशेषाधिकार नव्हे, तर तो प्रत्येक तरुण व्यक्तीला भौगोलिक स्थान, लिंग अथवा पार्श्वभूमी अशा कोणत्याही घटकावर अवलंबून न राहता मिळायलाच पाहिजे असा अधिकार आहे.”  

ब्रिक्स सदस्य देशांतील तरुण उद्योजक, प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि भागधारक यांना एकत्र आणत या बैठकीने कल्पनांचे आदानप्रदान, सर्वोत्तम पद्धतींचे सामायीकीकरण तसेच ब्रिक्स देशांमधील तरुणांच्या नेतृत्वाखालील उद्योजकतेच्या परिसंस्था बळकट करण्यासाठीचे मार्ग शोधणे यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला.

तंत्रज्ञान, शाश्वतता, स्वच्छ उर्जा आणि सामाजिक उपक्रम यांसह अनेक क्षेत्रांमधील नवोन्मेष, औद्योगिक उपक्रम यांचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या विविध बैठकांच्या दरम्यान, प्रतिनिधींनी विशेष चर्चा, देशांनी केलेली सादरीकरणे, गट चर्चा, नेटवर्किंग चर्चा, कार्यशाळा तसेच सहयोग आणि नवोन्मेष यांची जोपासना करणारी आंतरसंवादात्मक सत्रे अशा विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला.

 

* * *

सोनाली काकडे/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2263948) आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil