विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोअर यांनी डॉ.जितेंद्र सिंह यांची घेतली भेट;दोघांमधे,विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर केली चर्चा
भारत-अमेरिका यांच्यात, जैव तंत्रज्ञान, क्वांटम आणि अंतराळ क्षेत्रात विश्वासार्ह तंत्रज्ञान सहकार्य वाढवण्याच्या संधींविषयी चर्चा
भारतात पहिल्यांदाच खाजगी क्षेत्रासाठी आण्विक संशोधनाची दारे खुली झाली असून, यातून गुंतवणुकीच्या नव्या संधी आणि खाजगी क्षेत्रांचा सहभाग वाढण्याचे मार्ग निर्माण होतील- जितेंद्र सिंह
Posted On:
20 MAY 2026 7:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2026
अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोअर यांनी आज केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. दोघांमधे, जैव तंत्रज्ञान, क्वांटम तंत्रज्ञान, अंतराळ, अणुऊर्जा आणि आण्विक औषधोपचार यांसह विविध क्षेत्रात कौशल्यविकास, गुंतवणूक, ज्ञानाची देवघेव आणि उद्योग-प्रणित भागीदारी तसेच द्वीपक्षीय सहकार्य विस्तारण्याबद्दल सविस्तर चर्चा झाली.
भारतात आता पहिल्यांदाच आण्विक संशोधन क्षेत्र, खाजगी क्षेत्रांसाठी खुले केले आहे, त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणुकीच्या नव्या संधी, खाजगी क्षेत्रांचा सहभाग वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याशिवाय, अत्याधुनिक कर्करोग चिकित्सा, निदान, कर्करोग विषयक संशोधन आणि आनुवंशिक आजारसंबंधी चिकित्सा अशी क्षेत्रेही खुली होतील, असं सिंह यांनी यावेळी सांगितले.
भारताची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे देशात विशाल आणि विविधतेने समृद्ध असा आनुवंशिक माहितीचा साठा उपलब्ध आहे, असे जितेंद्र सिंह म्हणाले. भारतात विविध लोकसमूह एकत्र नांदत असल्यामुळे हा डेटा जैवतंत्रज्ञान, प्रिसिजन मेडिसिन म्हणजे विशिष्ट गंभीर आजारावर अचूक औषधे, कृत्रिम प्रज्ञाधारित निदान प्रणाली आणि भविष्यातील आरोग्यसेवा उपाययोजनांवरील जागतिक संशोधनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे डॉ. सिंह यांनी नमूद केले.
या चर्चेच्या केंद्रस्थानी, अमेरिका- भारत यांच्यातील ‘ट्रस्ट’ हा उपक्रम होता. यामुळे, दोन्ही सरकारे, शिक्षणक्षेत्र, उद्योग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, ऊर्जा, अत्याधुनिक साधनसामुग्री, महत्वाची खनिजे आणि अंतराळ तंत्रज्ञान अशा क्षेत्रात सहकार्यासाठीचा एक आराखडा तयार होणार आहे.
मोठ्या धोरणात्मक बदलाकडे लक्ष वेधत, डॉ जितेंद्र सिंह यांनी, भारताने आण्विक क्षेत्र आणि अणू आधारित वैद्यकीय विषयक संशोधन आणि गुंतवणूक क्षेत्र आता खाजगी उद्योगांसाठी खुले केले असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे, आतापर्यंत केवळ सार्वजनिक क्षेत्रांसाठी उपलब्ध असलेल्या या क्षेत्रात, खाजगी क्षेत्रांनाही आता गुंतवणूक करता येईल, असे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसातच याची अंतिम नियमावली लागू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी उभय नेत्यांमध्ये जैवतंत्रज्ञान, लस सहकार्य, नियमन सुसंगतीकरण, कर्करोगविषयक चाचण्या, सीएआर-टी उपचार, कृत्रिम प्रज्ञाधारित निदान प्रणाली आणि जागतिक संशोधनासाठी भारताच्या विविध आनुवंशिक माहितीच्या साठ्याचा उपयोग या विषयांवरही चर्चा झाली.
गुंतवणूक, कौशल्य विकास, ज्ञान-विनिमय आणि संस्थात्मक सहकार्य पुढे नेण्यासाठी अमेरिकन गुंतवणूकदार, कंपन्या आणि संशोधन संस्थांसोबत नियमित कार्यगट स्थापन करण्याचा प्रस्ताव जितेंद्र सिंह यआणि मांडला. हा कार्यगट शक्यतो दर महिन्याला एकदा बैठक घेऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
अशा प्रकारच्या सहकार्यामुळे भारतातील उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये केवळ भांडवली गुंतवणूकच नव्हे, तर तांत्रिक कौशल्य, खासगी क्षेत्राचा अनुभव आणि सहकार्याची क्षमता देखील उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
अवकाश क्षेत्रातील सहकार्य, स्टार लिंक, देशातील क्वांटम पायाभूत सुविधा, थोरियम-आधारित अणुऊर्जा तंत्रज्ञानासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच बेंगळुरूमध्ये होणाऱ्या आगामी अवकाश क्षेत्रातील उपक्रमांवरही यावेळी चर्चा झाली.





सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2263403)
अभ्यागत कक्ष : 20