पंतप्रधान कार्यालय
तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या निमित्ताने दाखल झालेल्या डेन्मार्कच्या हंगामी पंतप्रधानांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
Posted On:
19 MAY 2026 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या निमित्ताने ऑस्लोमध्ये दाखल झालेल्या डेन्मार्कच्या हंगामी पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांची भेट घेतली.
यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला आणि सामायिक कृतीक्रमाच्या संदर्भात झालेल्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. पर्यावरण आणि हवामानबदलाच्या क्षेत्रांत सहयोगाला प्राधान्य देणाऱ्या भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारीत झालेल्या प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. दोन्ही देशांमध्ये हरित व्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी संसाधनांचे एकत्रीकरण करण्यालाही यात प्राधान्य देण्यात आले आहे. 2020 मध्ये हरित धोरणात्मक भागीदारीचा प्रारंभ झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये नियमितपणे झालेल्या उच्चस्तरीय आदान-प्रदानाची उजळणी करत दोन्ही नेत्यांनी येथून पुढे नवीन आणि उगवत्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत, तसेच संदेशवहन, प्रगत संशोधन, स्टार्टअप आणि शैक्षणिक आदान-प्रदान यांच्या बाबतीत सहयोग अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला. संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांत सहकार्य करण्याबद्दलही त्यांनी चर्चा केली. गुजरातमध्ये जीआयएफटी शहरात व्यवसाय करण्यासाठी पंतप्रधानांनी डेन्मार्कच्या कंपन्यांना निमंत्रणही दिले.
वेगाने वृद्धी पावणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत विविध प्रश्नांवर पर्यावरणपूरक उत्तरे शोधण्यासाठी डेन्मार्कच्या तंत्रज्ञानाचे स्वागत करण्यास, भारत उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले. पाण्याच्या क्षेत्रात, वाराणसीमधील एसएलसीआर म्हणजे स्वच्छ नद्यांसाठी स्मार्ट प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी भारत-डेन्मार्क यशस्वी सहयोगाची दोन्ही नेत्यांनी नोंद घेतली. हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा त्रि-पक्षीय उपक्रम असून यात- भारत सरकार, आयआयटी-बनारस हिंदू विद्यापीठ आणि डेन्मार्क सरकार अशा तिघांचा सहभाग आहे. यावेळी नेत्यांनी मोबिलिटी भागीदारीविषयी चर्चा केली.
परस्पर-स्वारस्याच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर उभय नेत्यांनी दृष्टिकोन आणि विचारांची देवघेव केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील विद्यमान अस्थायी सदस्यत्वासाठी पंतप्रधान मोदी यांनी डेन्मार्कला शुभेच्छा दिल्या.
* * *
राधिका अघोर/जाई वैशंपायन/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2262991)
अभ्यागत कक्ष : 6