कंपनी व्यवहार मंत्रालय
गुंतवणूकदार जागरूकता उपक्रमांना चालना देण्यासाठी आयईपीएफए आणि प्रसार भारती यांच्यात सामंजस्य करार
Posted On:
13 MAY 2026 5:22PM by PIB Mumbai
कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाने (आयईपीएफए) राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाहिन्यांवर दूरदर्शनच्या माध्यमातून माहितीपूर्ण स्क्रोल संदेशांच्या प्रसारणाद्वारे देशव्यापी गुंतवणूकदार जागरूकता उपक्रमांना बळकट करण्यासाठी सार्वजनिक प्रसारक प्रसार भारतीसोबत सामंजस्य करार केला आहे.
या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयईपीएफएच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिव अनिता शाह अकेला यांनी भूषवले. देशभरातील नागरिकांमध्ये गुंतवणूकीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी सहयोगी सार्वजनिक संपर्क उपक्रमांच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.
दूरदर्शनसारख्या विश्वसनीय सार्वजनिक प्रसारण माध्यमांचा उपयोग केल्याने गुंतवणूकदार संरक्षण, दावा न केलेले लाभांश आणि शेअर्स तसेच सुरक्षित गुंतवणूक पद्धतींशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती दुर्गम आणि वंचित भागांतील नागरिकांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

आयईपीएफएचे महाव्यवस्थापक लेफ्टनंट कर्नल आदित्य सिन्हा आणि प्रसार भारतीचे (विक्री विभाग) उपमहासंचालक संजय प्रसाद यांनी सामंजस्य करारावर औपचारिक स्वाक्षरी केली. या करारामुळे धोरणात्मक सहकार्याच्या माध्यमातून देशव्यापी गुंतवणूकदार जागरूकता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे.
प्रसार भारतीच्या व्यापक जाळ्याचा उपयोग करून गुंतवणूकदार जागरूकता, दावा न केलेल्या लाभांशाची परतफेड करण्याची प्रक्रिया तसेच गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाकडे (आयईपीएफए) हस्तांतरित केलेल्या समभागांविषयी महत्त्वाची माहिती पोहोचविणे हा या धोरणात्मक सहकार्याचा उद्देश आहे. हे स्क्रोल संदेश दूरदर्शनच्या वाहिन्यांवर प्रसारित केले जातील परिणामी दुर्गम आणि वंचित प्रदेशातील नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचेल.
आयईपीएफए या उपक्रमाद्वारे गुंतवणूकदारांना वेळेवर आणि अचूक माहिती देऊन सक्षम करू इच्छिते, तसेच त्यांना शोध सुविधांचा वापर करण्यास आणि फॉर्म आयईपीएफ-5 द्वारे दावे दाखल करण्यास प्रोत्साहित करेल. ही मोहीम आर्थिक फसवणूक प्रतिबंध आणि सुरक्षित गुंतवणूक पद्धतींच्या महत्त्वाविषयी जागरूकता पसरवण्यावरही भर देणार आहे.
या सामंजस्य करारातून प्रमुख सार्वजनिक संस्थांसोबतच्या सहयोगी प्रयत्नांद्वारे माहितीपूर्ण गुंतवणूकदार समुदाय तयार करण्यासाठी आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयईपीएफएची निरंतर वचनबद्धता अधोरेखित होते.
***
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2260818)
अभ्यागत कक्ष : 8