वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
जागतिक संकटाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेचे दर्शन : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे ‘सीआयआय’च्या वार्षिक व्यवसाय शिखर परिषदेत प्रतिपादन
Posted On:
12 MAY 2026 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2026
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे सीआयआय म्हणजेच ‘भारतीय उद्योग महासंघ ’च्या वार्षिक शिखर परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी सांगितले की, मजबूत मूलभूत घटक आणि जगाच्या भारतावरील वाढत्या विश्वासामुळे, भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिक भू-राजकीय आणि आर्थिक आव्हानांच्या काळातही सातत्याने लवचिकता दाखवली आहे.
यावेळी मंत्री गोयल यांनी भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, यावर प्रकाश टाकला. देशाकडे जवळपास अकरा महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा परकीय चलन साठा आहे. भारताच्या निर्यात कामगिरीचा संदर्भ देत ते म्हणाले की, देश यावर्षी जवळपास 863 अब्ज डॉलर्सचा आतापर्यंतचा उच्चांक गाठण्याच्या तयारीत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, वस्तू आणि सेवांमधील भारताची एकत्रित व्यापार तूट ही देशाच्या वार्षिक परकीय चलनापेक्षा खूपच कमी आहे, त्यावरून देशाची मजबूत आर्थिक कामगिरी दिसून येते.
मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारताने सातत्याने संकटांचे संधींमध्ये रूपांतर केले आहे आणि प्रतिकूल काळात देश नेहमीच अधिक मजबूत होऊन उभा राहिला आहे. ते म्हणाले की, सध्याच्या जागतिक परिस्थितीकडे भारतासाठी अधिक कार्यक्षम, उत्पादक आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी सावध करणारी घटना म्हणून पाहिले पाहिजे.
भारतीय उद्योगांनी एकमेकांना पाठिंबा देण्याच्या गरजेवर मंत्र्यांनी भर दिला. ते म्हणाले की, भारतीय उद्योगांची सामूहिक वाढ देशाचे भविष्य मजबूत करेल.
सर्व क्षेत्रांमध्ये अधिक कार्यक्षमतेचे आवाहन करताना, मंत्री पीयूष गोयल यांनी उद्योगांनी अपव्यय कमी करावा, उत्पादकतेमध्ये सुधारणा घडवून आणावी आणि शक्य त्या सर्व मार्गांनी आयातीवरील खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. यावेळी ते म्हणाले की, मेट्रो आणि जलद रेल्वे सेवा प्रणालीसह सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, तसेच उद्योग आणि नागरिकांच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे एकत्रितपणे अर्थव्यवस्था मजबूत होईल.
या भाषणात मंत्री म्हणाले की, मुक्त व्यापार करारांचा (एफटीए) उद्देश भारताची निर्यात क्षमता मजबूत करणे, गुंतवणूक वाढवणे आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण करणे हा आहे. त्यांनी उद्योगांना या करारांचा लाभ घेऊन आपली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उपस्थिती वाढवण्याचे आणि निर्यातीच्या वाढीला गती देण्याचे आवाहन केले.
यावेळी पीयूष गोयल यांनी उद्योगांना सल्ला दिला की, त्यांनी कर्मचाऱ्यांना एआयच्या म्हणजेच कृत्रिम प्रज्ञेच्या अधिक स्मार्ट वापराचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवावेत आणि कंपन्यांनी केवळ मनुष्यबळ कमी करण्याऐवजी उत्पादकता सुधारण्यासाठी, मोठी बाजारपेठ काबीज करण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर करावा.
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2260370)
अभ्यागत कक्ष : 15