विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘सीएसआयआर’ मध्ये 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन' साजरा; सीएसआयआर-केंद्रीय भवन संशोधन संस्थेद्वारे विकसित 13 स्वदेशी तंत्रज्ञानांचे उद्योगांकडे हस्तांतरण

Posted On: 12 MAY 2026 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मे 2026

'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिना'चे औचित्य साधून आणि तंत्रज्ञान-आधारित विकास आणि आत्मनिर्भरतेविषयी भारताच्या  कटिबद्धतेचा  पुनरुच्चार करत ,'वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने' (सीएसआयआर) नवी दिल्ली येथील आपल्या मुख्यालयात मासिक 'तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यक्रम' आयोजित केला. हा कार्यक्रम "सीएसआयआर आणि केंद्रीय भवन संशोधन संस्था, रुरकी द्वारे तंत्रज्ञान हस्तांतरण" या विषयावर केंद्रित होता. याप्रसंगी  संस्थेद्वारे  विकसित 13 स्वदेशी तंत्रज्ञान विविध उद्योग आणि स्टार्ट-अप्सना हस्तांतरित करण्यात आले .

उपस्थितांचे स्वागत करताना, कार्यक्रमाचे समन्वयक आणि केंद्रीय भवन रूरकीचे डॉ. अजय चौरसिया यांनी देशातील नाविन्यपूर्ण विकासाला गती देण्यासाठी, उद्योगाभिमुख तंत्रज्ञान प्रसाराचे महत्त्व अधोरेखित केले.

‘सीएसआयआर-सीबीआरआय’ चे संचालक प्रा. आर. प्रदीप कुमार यांनी संस्थेची तांत्रिक कामगिरी आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त नवोन्मेषी कल्पना सादर करताना सांगितले की, 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिना'च्या दिवशीच तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यक्रमाचेआयोजन याला विशेष महत्त्व आहे. प्रा. कुमार यांनी नमूद केले की, ‘सीएसआयआर-सीबीआरआय’ यांनी विकसित केलेली स्वदेशी तंत्रज्ञाने आणि नवकल्पना उद्योगांना हस्तांतरित करणे यावरून  भारताच्या संशोधन परिसंस्थेची  वाढती ताकद आणि राष्ट्रनिर्मितीमधील तिचे योगदान दिसून येते. प्रा. कुमार यांनी पुढे यावर भर दिला की, 'आत्मनिर्भर भारत', शाश्वत पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान-आधारित विकासाची संकल्पना पुढे नेण्यात अशा उपक्रमांची महत्त्वाची भूमिका असेल.

या कार्यक्रमादरम्यान, ‘सीएसआयआर-सीबीआरआय’ द्वारा विकसित 13 तंत्रज्ञानांचे  विविध उद्योग आणि स्टार्ट-अप्सना औपचारिकरित्या हस्तांतरण  करण्यात आली. या तंत्रज्ञानामध्ये अग्निसुरक्षा, शाश्वत बांधकाम, पायाभूत सुविधांचे संरक्षण, ऊर्जा कार्यक्षमता आणि प्रगत बांधकाम साहित्य यांसारख्या क्षेत्रांचा समावेश होता.

हस्तांतरित करण्यात आलेल्या प्रमुख तंत्रज्ञानांमध्ये खालील बाबींचा समावेश होता:

*   लाकूड आणि लाकडाला पर्याय ठरू शकणाऱ्या पृष्ठभागांसाठी, अग्निरोधक आणि  पारदर्शक 'इंट्युमेसेंट कोटिंग' (Intumescent coating) तंत्रज्ञान

*   आरसीसी   संरचनांच्या संरक्षणासाठी 'आयपीएन  कोटिंग' तंत्रज्ञान

*   कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या विटांच्या निर्मितीचे तंत्रज्ञान

*   हायब्रिड (संकरित) सौर-सहाय्य असलेली  'हीट पंप' प्रणाली

*   भिंतींच्या संरक्षणासाठी, पूर्व-निर्मित  आणि उच्च-क्षमतेच्या 'स्टील कॉर्ड'च्या मजबुतीकरणाचे तंत्रज्ञान

या प्रसंगी, "सीएसआयआर स्मार्ट गाव उपक्रम’’ यावरील एका ध्‍वनिचित्रफितीचे  प्रकाशन करण्यात आले. याव्दारे ग्रामीण विकास आणि शाश्वत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ‘सीएसआयआर’ने दिलेल्या योगदानाचे दर्शन घडवण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान ‘सीएसआयआर-सीबीआरआय’ चा 2025-26 या वर्षाचा वार्षिक अहवालही प्रकाशित करण्यात आला.

उपस्थितांना संबोधित करताना,‘सीएसआयआर’ च्या महासंचालक आणि ‘डीएसआयआर’च्या सचिव डॉ. एन. कलैसेल्वी यांनी नमूद केले की,भारत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने करत असलेल्या वाटचालीमध्ये विज्ञान, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान-आधारित विकास हे प्रमुख प्रेरक घटक म्हणून उदयास येत आहेत. सीएसआयआरच्या प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे उद्योगांकडे हस्तांतरण होत असल्यामुळे, देशाची नवोपक्रम परिसंस्था  लक्षणीयरित्या  बळकट होत आहे आणि 'आत्मनिर्भर भारत' साकारण्याची संकल्पना प्रत्यक्षात येण्याचा वेग वाढत आहे, असे निरीक्षण डॉ. कलैसेल्वी यांनी नोंदवले.अलीकडील वर्षांत अनेक प्रभावशाली स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल, तसेच संशोधनाचे निष्कर्ष यशस्वीरित्या सामाजिक आणि औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त अशा तंत्रज्ञानामध्ये रूपांतरित केल्याबद्दल डॉ. कलैसेल्वी यांनी 'टीम सीएसआयआर-सीबीआरआय' चे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.

मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एस. के. पाणिग्राही यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर, राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2260223) अभ्यागत कक्ष : 16