पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मार्जार प्रजातींच्या (बिग कॅट) प्राण्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी अधिवास पुनर्स्थापना, तंत्रज्ञान-आधारित देखरेख आणि समुदाय-आधारित संवर्धनासाठी कॉर्पोरेट निधी अत्यावश्यक: केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

Posted On: 11 MAY 2026 4:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2026

भारत 1 आणि 2 जून रोजी नवी दिल्ली येथे पहिल्या 'आंतरराष्ट्रीय बिग कॅट शिखर परिषदेचे (International Big Cat Summit) आयोजन करणार असल्याची घोषणा  पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केली. या परिषदेच्या निमित्ताने त्यांनी मार्जार प्रजातींतील प्राण्यांच्या (Big Cats) संवर्धनासाठी उद्योगांना सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीभारतीय उद्योग महासंघ  (CII) तर्फे आयोजित 'जागतिक अर्थव्यवस्था, उद्योग आणि समाजाचे भविष्य आणि इंडिया@100 चा दृष्टिकोन' या विषयावरील परिषदेत ते बोलत होते.

'इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स' (IBCA) हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, याद्वारे जगातील सात प्रमुख मार्जार प्रजातींचे — वाघ, सिंह, चित्ता, बिबट्या, हिमबिबट्या, जग्वार आणि प्युमा — संरक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांनी उद्योग जगतातील नेत्यांना कॉर्पोरेट निधीपुरवठा  आणि भागीदारीच्या माध्यमातून या जागतिक संवर्धन मोहिमेला बळ देण्याचे आवाहन केले.

संवर्धनामध्ये उद्योगक्षेत्राच्या भूमिकेवर भर देताना मंत्री यादव यांनी,  मार्जार प्रजातीच्या (Big Cats) संवर्धनासाठी अधिवास पुनर्संचयित करणे, तंत्रज्ञानावर आधारित देखरेख व पाळत ठेवणे, समुदाय-आधारित संवर्धन, क्षमता बांधणी आणि संवर्धनाबाबतची जनजागृती यांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांना पाठबळ देण्यासाठी कॉर्पोरेट निधी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.

या प्राण्यांना वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यातच आपलेही हित आहे. कारण हे प्राणी केवळ 'सर्वोच्च भक्षक' (Apex Predators) नसून ते 'प्रमुख  प्रजाती' (Umbrella Species) देखील आहेत. ते पर्यावरणाचे संतुलन राखतात आणि विशाल भूभाग, जैवविविधता तसेच जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यास मदत करतात, असे ते म्हणाले. यावेळी 'सीआयआय' (CII) आणि 'आयबीसीए' (IBCA) यांच्यात आधीच सामंजस्य करार झाला असल्याचेही यादव यांनी नमूद केले.

कल्पकता आणि लवचिकता, आर्थिक वृद्धी आणि शाश्वतता, तसेच विकास आणि सामाजिक समावेशकता यांचा मेळ घालत भारत जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यास सज्ज असल्याचेही मंत्री यादव यावेळी म्हणाले. जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारत आज उदयास येत असून नवीकरणीय  ऊर्जेचा विस्तार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, स्टार्टअप्सचा विस्तार आणि उत्पादन क्षेत्राच्या माध्यमांतून जागतिक बदलांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.

'इंडिया@100' च्या प्रमुख स्तंभांची मांडणी करताना यादव यांनी, आर्थिक परिवर्तन, मानवी भांडवल आणि कौशल्य , शाश्वत विकास, सामाजिक समावेशकता आणि भारताची जागतिक भूमिका हे घटक 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याच्या प्रवासात अत्यंत निर्णायक ठरतील,असे मत व्यक्त केले.


सुषमा काणे/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2259851) अभ्यागत कक्ष : 14