मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मत्स्योद्योग सचिवांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शोभिवंत माशांच्या ब्रूड बँक ला भेट देऊन प्रगतशील मत्स्यपालक शेतकऱ्यांशी संवाद साधला 

Posted On: 09 MAY 2026 6:33AM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या मत्स्योद्योग, पशुपालन व दुग्ध व्यवसाय मंत्रालयाचे (MoFAH&D) सचिव डॉ अभिलक्ष लिखी यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मंगरूळ गावात श्रीमती यशोधरा संजय खंडागळे यांनी PMMSY अंतर्गत सुरु केलेल्या शोभिवंत माशांच्या ब्रूड बँक ला भेट देऊन मत्स्यपालक शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर सचिवांनी PMMSY च्या लाभार्थ्यांशी चर्चा केली आणि योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अडचणी समजून घेतल्या. 

सचिवांनी भेट दिलेली ब्रूड बँक म्हणजे या पद्धतीचा देशातील पहिलाच उपक्रम आहे. त्यात शोभिवंत माशांच्या 25 हुन अधिक प्रजातींचे संवर्धन व प्रजनन केले जाते. श्रीमती यशोधरा संजय खंडागळे यांनी त्यांची ‘सॅम डिस्कस’ ही ब्रँड यशस्वीपणे विकसित केली असून देशातील दर्जेदार डिस्कस माशांच्या आघाडीच्या उत्पादकांमध्ये आता त्यांची गणना होत आहे. त्यांच्या ब्रूड बँकेत आतापर्यंत 20 विविध प्रजातींचे 7.7 लाख शोभिवंत मासे उत्पादित झाले असून अंदाजे रु 1.93 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे, तसेच 25 ते 30 जणांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपाच्या रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या बँकेत मासे संवर्धनासाठी 700 टाक्या आहेत, इथे कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, तसेच उत्तम पद्धतींचे अवलंबन होत असून शोभिवंत माशांच्या निर्यातीत त्यांचा मोठा सहभाग आहे. या ब्रूड बँकेचा समावेश GAIS व NFDP सारख्या सरकारी योजनांच्या अंतर्गत होतो तसेच तिथे सर्व नियामक प्रमाणनाचे अनुपालन होत आहे. या बँकेतून अमेरिका, इटली, फ्रान्स, मॉरिशस, दक्षिण कोरिया, कतार, कुवेत ,मलेशिया , चीन, उझबेकिस्तान, नायजेरिया, आणि इस्राएल या देशांना शोभिवंत मासे निर्यात केले जात आहेत. सरकारी मदतीच्या प्रभावी उपयोगातून मत्स्योद्योग क्षेत्रात नवोपक्रम, शाश्वत उत्पादन व विकास साध्य कसा केला जाऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. 

 

 

भारतात आजमितीला सुमारे गोड्या पाण्यातील 700 स्थानिक आणि 300 पेक्षा जास्त सागरी माशांच्या प्रजाती उपलब्ध आहे. या आकडेवारीतून क्षेत्राअंतर्गतच्या प्रचंड क्षमतेचे प्रचिती येते. भारताची शोभिवंत माशांची निर्यात साधारण 41 कोटी रुपयांच्या टप्प्यावर पोहोचली असून, त्यातून या क्षेत्राचे देशातल्या अर्थव्यवस्थेतील वाढते योगदानही दिसून येते. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गतच्या (PMMSY) तरतुदी, आणि त्याचवेळी समृद्ध जैवविविधतेसह  देशांतर्गत आणि जागतिक मागणीचे पाठबळ लाभल्यामुळे शोभिवंत मत्स्यव्यवसाय हे एक देशातले मोठी क्षमता असलेले क्षेत्र म्हणून उदयाला येऊ लागले आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आतापर्यंत परसबागेतील शोभिवंत मासे पालनाची 1,986 केंद्र, 6,018 मत्स विक्री केंद्रे आणि मत्स्यालये, तसेच शोभिवंत मासे आणि मत्स्यालयांसंबंधीच्या विशेष बाजारपेठांसह एकूण 117 किरकोळ विक्रीच्या बाजारपेठांना पाठबळ पुरवले गेले आहे. यासोबतच गोड्या पाण्यातील पाच शोभिवंत मासे पैदास बँका आणि शोभिवंत माशांची 199 एकात्मिक केंद्रही स्थापन करण्यात आली आहेत. अशा विविध स्वरुपातील प्रयत्नांमुळे शोभिवंत मत्स्यव्यवसायाच्या मूल्य साखळीला बळकटी लाभली असून, त्यामुळे उत्पादन, विपणन आणि देशभरातील उपजीविकेच्या संधींचाही मोठा विस्तार घडून आला आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाने देशातील महत्त्वाच्या भागांमध्ये 34 मत्स्य उत्पादन आणि प्रक्रिया समूह केंद्र अधिसूचित केले असून, यात तामिळनाडूतील मदुराई येथील शोभिवंत मत्स्यव्यवसाय समुहाचाही समावेश आहे.

महाराष्ट्रात मत्स्यव्यवसायाच्या बाबतीत सागरी आणि राज्यांतर्गत गोड्या पाण्याचे अशा दोन्ही प्रकारचे स्रोत उपलब्ध आहेत. त्यामुळे अत्यंत मजबूत स्थितीतले महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय क्षेत्र अस्तित्वात आहे. महाराष्ट्राला 877.97 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून, हा किनारपट्टीवर राज्यातली मासळी उतरवण्याची 173 केंद्रे आणि मच्छिमार समुदायाची 526 गावे वसलेली आहेत. यामुळे हा किनारपट्टी प्रदेश सुमारे 15 लाख मच्छिमारांच्या उपजीविकेचा मोठा आधार आहे. 2022-23 या वर्षात महाराष्ट्रात सुमारे 5.9 लाख टन माशांचे उत्पादन झाले होते. महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय हा 4.10 लाख हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेला आहे. यात मोठी जलाशये, नद्या, तलाव आणि खाडीच्या पाण्याचा समावेश होतो. नील क्रांती आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना यांसारख्या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात जलचर पालन क्षेत्र, अंडी उबवणी केंद्रे (हॅचरीज), पिंजरा पद्धतीची मत्स्यशेती, संबंधीत पायाभूत सुविधा आणि मच्छिमारांच्या कल्याणाच्या बाबतीत मोठी सुधारणा केली गेली आहे. मात्र, गुंतवणुकीचा प्रभावी वापर करून उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ घडवून आणण्याचे आव्हान अजूनही आहे.

या क्षेत्राला दिलेल्या प्रत्यक्ष भेटीमुळे प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा आढावा घेता येईल, संबंधित भागधारकांसोबतच्या संवादला चालना देता येईल, आणि लक्ष्यित धोरणात्मक पाठबळ पुरवता येईल. यामुळे शोभिवंत मत्स्यव्यवसाय क्षेत्राला अधिक बळकटी मिळू शकेल, आणि या क्षेत्राला चालना देता येऊ शकेल अशी अपेक्षा आहे.

***

आशिष सांगळे / उमा रायकर / तुषार पवार / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2259403) अभ्यागत कक्ष : 6