संरक्षण मंत्रालय
अल्प मुदतीमध्ये, शत्रूच्या प्रदेशात आतपर्यंत घुसणाऱ्या, उच्च-तीव्रतेच्या आणि उच्च-प्रभाव असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताच्या सामूहिक निर्धाराचे आणि लष्कराच्या नव्या नीतिमूल्यांचे केले प्रदर्शन - संयुक्त कमांडर परिषदेत संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन
Posted On:
08 MAY 2026 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2026
“ऑपरेशन सिंदूर हा राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी भारतीय संरक्षण दलांनी दिलेल्या जलद, अचूक आणि संयुक्त प्रतिसादाचा पुरावा आहे,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्यांनी तिन्ही दलांच्या कमांडर्सना या मोहिमेतून तसेच सध्याच्या जागतिक सुरक्षा परिस्थितीमधून धडा घेऊन भविष्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. 8 मे 2026 रोजी राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित संयुक्त कमांडर्स परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीला संबोधित करताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे वर्णन एक अल्प-कालावधीची, शत्रूच्या प्रदेशात आतपर्यंत मुसंडी मारणारी, उच्च-तीव्रतेची आणि उच्च-परिणाम करणारी मोहीम असे केले. या मोहीमेने शत्रूला शरणांगती पत्करण्यास भाग पाडण्याची भारताची क्षमता दाखवून दिली.
झपाट्याने बदलणाऱ्या भू-राजकीय सुरक्षा परिस्थितीमध्ये सज्ज राहण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा, स्वायत्त प्रणाली, डेटा विश्लेषण आणि सुरक्षित दळणवळण नेटवर्क यांमधील क्षमता बळकट करण्याची गरज संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केली.

भविष्यातील संघर्ष हे वाढत्या प्रमाणावरील संकरित धोके, माहितीचे वर्चस्व आणि सायबर, अवकाश, विद्युतचुंबकीय आणि संज्ञानात्मक क्षेत्रांमध्ये एकाच वेळी होणाऱ्या कारवायांद्वारे आकाराला येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलांमध्ये संयुक्तता, एकात्मता आणि तांत्रिक अवलंबन वाढवण्यात झालेल्या प्रगतीचे कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, जागतिक संरक्षण क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनात्मक बदलांमध्ये संयुक्तता हा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे.
परिषदेदरम्यान संरक्षण मंत्र्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वरील एका माहितीपटाचे प्रकाशन केले. तसेच त्यांनी 'व्हिजन 2047'ची हिंदी आवृत्ती आणि 'एकात्मिक संवाद रचनेसाठी संयुक्त सिद्धांत' (Joint Doctrine for Integrated Communication Architecture) यांचेही प्रकाशन केले. भविष्यातील बहुक्षेत्रीय कारवायांमध्ये सशस्त्र दलांमधील सैद्धांतिक स्पष्टता, आंतरकार्यक्षमता आणि एकात्मिक संवाद अधिक मजबूत करणे, हे या सिद्धांताचे उद्दिष्ट आहे.

‘नव्या क्षेत्रांमधील लष्करी क्षमता’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेत उदयोन्मुख सुरक्षा आव्हाने आणि भविष्यातील सज्जतेवर विचारविनिमय करण्यासाठी संरक्षण मंत्रालय आणि भारतीय संरक्षण दलांचे सर्वोच्च नेतृत्व एकत्र आले होते. भविष्यातील युद्धतंत्र, बहुक्षेत्रीय कारवाया, तांत्रिक परिवर्तन आणि संयुक्त क्षमता विकास यावर सखोल चर्चा झाली. या परिषदेत संज्ञानात्मक युद्धतंत्र, विकसित होत असलेल्या क्वांटम आणि एआय-सक्षम धोक्यांविरुद्ध सायबर लवचिकता, उदयोन्मुख क्षेत्रांमधील लष्करी क्षमता विकास, स्वदेशी नवोपक्रम आणि एआय-सक्षम युद्धतंत्राच्या संकल्पना यांवर विस्तृत चर्चा झाली.
या कार्यक्रमाला ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत, संरक्षण उत्पादन सचिव संजीव कुमार, माजी सैनिक कल्याण सचिव सुकृती लिखी, संरक्षण वित्त सचिव विश्वजित सहाय आणि इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.


* * *
सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2259152)
अभ्यागत कक्ष : 7