आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने, एबी पीएम-जेएवाय ऑटो-अ‍ॅडज्युडिकेशन हॅकेथॉन शोकेस 2026, उपक्रमाच्या पहिल्या दिवसाचे केले आयोजन; दाव्यांच्या न्यायनिवाड्यामध्ये एआय-चालित नवोन्मेष राहिले केंद्रस्थानी


ग्लोबल साऊथमध्ये आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेत मापदंड स्थापन करणारा प्लॅटफॉर्म विकसित करणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक ठरला भारत : डॉ. सुनील कुमार बर्नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण

Posted On: 08 MAY 2026 5:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 मे 2026

 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, इंडिया एआय मिशन आणि बेंगळुरू स्थित भारतीय विज्ञान संस्था (आय आय एस सी) यांच्या सहकार्याने आज एबी पीएम-जेएवाय ऑटो-अ‍ॅडज्युडिकेशन हॅकेथॉन शोकेस 2026, उपक्रमाचा शुभारंभ केला. याबरोबरच आयुष्मान भारत प्रधान मंत्री आरोग्य योजने अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करुन दाव्यांचे निराकरण करण्याची प्रक्रिया अधिक मजबूत करण्यावर भर देणाऱ्या या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यक्रमाला देखील आरंभ झाला.

दाव्यांच्या न्यायनिवाड्यामध्ये कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सचोटी वाढवण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता -सक्षम उपायांवर विचारविनिमय करण्यासाठी आणि त्यांचे प्रदर्शन करण्यासाठी, उद्घाटन दिनी धोरणकर्ते, तंत्रज्ञान नवप्रवर्तक, विमा कंपन्या, थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर, आरोग्य सेवा प्रदाते, शिक्षण संस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप्स या सर्वांना एकाच व्यासपीठावर विचारविनिमय करण्याची संधी मिळाली.

या उपक्रमामुळे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत आरोग्य वितरण सेवा अधिक बळकट करण्याची लक्षणीय संधी मिळाली असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वांगीण आरोग्य देखभाल परिसंस्था अधिक कार्यक्षम करुन परिणामकारकता वाढवण्याची एक महत्त्वपूर्ण संधी आहे, असे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. सुनील कुमार बर्नवाल, उद्घाटन सत्रात बोलताना म्हणाले.

नवोन्मेष हा संपूर्ण समाजाचा एक अविभाज्य भाग झाला असून विविध संस्था, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स आणि उद्योगजगत अशा सर्व क्षेत्रात नवोन्मेष रुजला आहे आणि हॅकेथॉन सारख्या उपक्रमांमुळे आरोग्य क्षेत्रातील जटिल आव्हाने सोडवण्याची सामूहिक क्षमता निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, आरोग्यक्षेत्रात सक्रियपणे कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देत आहे, त्या दृष्टीने इंडिया एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान सुरू करण्यात आलेल्या, आयआयटी कानपूर येथील आरोग्य एआयसाठीच्या ओपन बेंचमार्किंग आणि डेटा प्लॅटफॉर्म 'बीओडीएच' (BODH) च्या विकासाचा समावेश आहे, असे ते म्हणाले. भारत-विशिष्ट डेटासेट्सच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता उपायांची पडताळणी डिजिटल सार्वजनिक साधन म्हणून करणारा भारत हा ग्लोबल साऊथ मधील अग्रणी देशांपैकी एक आहे, असे त्यांनी सांगितले.

सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी दाव्यांचा जलद, वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने निपटारा सुनिश्चित करण्यासाठी आणि कार्यक्रमाची अखंडता सुधारण्यासाठी मजबूत आणि पारदर्शक दावा निपटारा हा केंद्रस्थानी आहे.

संलग्न रुग्णालयांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, वेळेवर दावे निकाली काढण्यासाठी आणि उपक्रमाची विश्वासार्हता आणि  गुणवत्ता सुधारण्यासाठी दाव्यांचा जलद, वेळेवर  आणि पारदर्शक पद्धतीने निपटारा करणे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, एबी पीएम- जेएवाय अंतर्गत निर्माण होणारा व्यापक आणि विविध प्रकारचा डेटा, कार्यक्षमता, पारदर्शकता आणि परिणाम अधिक बळकट करण्यासाठी  कृत्रिम बुद्धिमत्तेचा  प्रभावी वापर करण्याची मोठी क्षमता प्रदान करतो, असे ते म्हणाले.

हॅकेथॉन अंतर्गत विकसित केलेल्या प्रगत AI/ML-आधारित उपायांचे सादरीकरण हे या शोकेसचे प्रमुख आकर्षण होते. हे उपाय तीन महत्त्वाच्या समस्यांवर आधारित होते आणि त्यांचा उद्देश एबी पीएम- जेएवाय अंतर्गत दावा निपटारा प्रक्रिया आणि कार्यक्रमाच्या विश्वासार्हतेशी संबंधित मुख्य आव्हानांवर मात करणे हा होता. पहिले समस्या विधान क्लिनिकल दस्तऐवज वर्गीकरण आणि मानक उपचार मार्गदर्शक तत्त्वांचे (एसटीजी) पालन यावर केंद्रित केले होते. विजेत्या संघांनी विविध आरोग्यसेवा दस्तऐवजांचे स्वयंचलित वर्गीकरण करण्यास सक्षम असलेले अत्याधुनिक उपाय सादर केले. यामध्ये कमी-गुणवत्तेच्या आणि विविध स्वरूपात स्कॅन केलेल्या कागदपत्रांवर बहुभाषिक ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन (ओसीआर) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. या प्रणालींनी संबंधित विश्वासार्हता गुण आणि मूळ स्रोताचा मागोवा घेण्यासह संरचित क्लिनिकल आणि बिलिंग डेटा काढण्याची क्षमता दाखवली. याव्यतिरिक्त, या उपायांनी संस्थात्मक शिक्के आणि अधिकृत स्वाक्षरी यांसारखी अनिवार्य दृश्य चिन्हे ओळखण्याची क्षमता दर्शविली, तसेच मानक उपचार मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण अनुपालन आराखड्याशी जुळणारे स्पष्टीकरणक्षम निर्णय निष्कर्षही तयार केले.

दुसऱ्या समस्या विधानामध्ये रेडिओलॉजिकल प्रतिमेवर आधारित आजार स्थिती ओळखणे आणि अहवाल सहसंबंध यावर लक्ष केंद्रित केले होते. विजेत्या संघांनी एक्स-रे, सीटी स्कॅन आणि एमआरआय यांसारख्या जटिल रेडिओलॉजिकल डेटाचे विश्लेषण करण्यास सक्षम असलेली सहाय्यक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधने सादर केली. या उपायांमुळे निर्णयकर्त्यांना प्रतिमांचे विश्लेषण समजणे, रुग्णालयांनी सादर केलेल्या क्लिनिकल अहवालांशी निष्कर्षांची सांगड घालणे, तसेच रुग्णाचे निदान, रोगाचे टप्पे, आणि उपचार कालावधी या बाबींची मानक उपचार मार्गदर्शक तत्त्वानुसार पडताळणी करणे अधिक सुलभ झाले. यामुळे निर्णय प्रक्रियेचा वेग आणि अचूकता दोन्ही वाढली.

तिसरे समस्या विधान दस्तऐवज बनावटगिरी आणि डीपफेक ओळखण्यावर केंद्रित होते. सहभागी संघांनी दाव्यांच्या प्रक्रियेदरम्यान सादर केलेल्या वैद्यकीय दस्तऐवजांमधील विसंगती आणि फसवणुकीचे नमुने शोधण्यासाठी डिझाइन केलेल्या मजबूत AI/ML-चालित प्रणाली सादर केल्या. यात छेडछाड केलेले डिस्चार्ज सारांश, फेरफार केलेल्या बिलिंग नोंदी, बनावट लाभार्थी आणि कृत्रिमरित्या तयार केलेले किंवा बदललेले वैद्यकीय अहवाल ओळखण्याची क्षमता यांचा समावेश होता. अशा उपाययोजना एबी पीएम-जेएवाय अंतर्गत डिजिटल दावा निर्णय प्रणाली अधिक मजबूत होईल तसेच योजनेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकून राहील अशी अपेक्षा आहे.

या कार्यक्रमात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली “भारतीय आरोग्यसेवेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उभारणी” या विषयावर एक उच्चस्तरीय परिसंवाद देखील आयोजित करण्यात आला होता. या चर्चासत्रात भारताच्या आरोग्यसेवा प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजनांचा अवलंब आणि विस्तार करण्यासाठी व्यावहारिक मार्ग, धोरणात्मक बाबी आणि कार्यान्वयन धोरणांवर विचारविनिमय करण्याकरिता सरकार, आरोग्यसेवा तंत्रज्ञान उद्योग, शिक्षण क्षेत्र आणि व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्थेमधील तज्ञ प्रतिनिधी एकत्र आले होते.

चर्चेमध्ये, विशेषतः कमी संसाधने आणि स्थानिक भाषांच्या वातावरणात विविध आरोग्य उपयोगांसाठी, स्मॉल लँग्वेज मॉडेल्स (एसएलएम), लार्ज लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम) आणि मल्टीमोडल एआय प्रणालींची भूमिका अधोरेखित करण्यात आली. तसेच कार्यप्रवाह एकत्रीकरण, पडताळणी चौकट, दर्जेदार डेटा संच, एज डिप्लॉयमेंट गोपनीयता संरक्षण आणि आरोग्य सेवा वितरणात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपायांची व्यापक अंमलबजावणी यांचे महत्त्वही पॅनेल सदस्यांनी अधोरेखित केले.

 

* * *

शैलेश पाटील/भक्‍ती सोनटक्‍के/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2259130) अभ्यागत कक्ष : 7