ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताने अंतराळ प्रणाली मानकांवरील महत्त्वपूर्ण जागतिक परिषदेचे भूषविले यजमानपद


अंतराळ सुरक्षा, कार्यप्रणाली आणि शाश्वततेचे भविष्य घडवण्यासाठी बीआयएसने आंतरराष्ट्रीय तज्ञांना आणले एकत्र

या कार्यक्रमात 13 देशांतील 131 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी झाले सहभागी

मोहिमेची सुरक्षितता, आंतरकार्यक्षमता आणि कचरा उपशमनासह अंतराळ प्रणालींच्या संपूर्ण जीवनचक्रासाठीच्या मानकांवर केले केंद्रित लक्ष

Posted On: 08 MAY 2026 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 मे 2026

 

भारताची राष्ट्रीय मानक संस्था ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ही आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्थेच्या (आय एस ओ) ISO TC 20 / SC 14 ‘स्पेस सिस्टीम्स अँड ऑपरेशन्स’ उपसमितीच्या 35 व्या पूर्ण सत्राचे आणि कार्यकारी गटांच्या बैठकांचे आयोजन करत आहे.

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या उद्घाटन सत्रात बोलताना केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव, आयएएस अधिकारी निधी खरे यांनी मानकांना पुढे नेण्यासाठी जागतिक सहकार्याचे महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय अवकाश मानक परिसंस्थेला आकार देण्यातील भारताच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या - "जागतिक अवकाश परिवर्तनात आपण आघाडीवर असल्याने या बैठकीचे आयोजन करणे ही भारतासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. महत्त्वपूर्ण सुधारणा आणि इन-स्पेसच्या निर्मितीद्वारे, भारत सरकारने एका उदयोन्मुख अवकाश केंद्राचा पाया घातला आहे, जिथे स्टार्टअप्स आणि प्रस्थापित उद्योग दोघेही भरभराट करू शकतील. अशा जागतिक सहकार्य आणि कौशल्यातून विकसित झालेली मानके मानवतेसाठी अवकाशाला सुरक्षित, शाश्वत आणि सर्वसमावेशक बनविण्यात मदत करतील.

या प्रसंगी संजय गर्ग यांनी भारताच्या वाढत्या अंतराळ क्षेत्रात गुणवत्ता, सुरक्षितता आणि जागतिक स्पर्धात्मकता सुनिश्चित करण्यातील मानकीकरणाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, अंतराळ उद्योगाच्या बदलत्या गरजांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय मानके आंतरराष्ट्रीय चौकटींशी सुसंगत करण्याचे काम बीआयएस करत आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील जलद परिवर्तनावर जोर देत त्यांनी नमूद केले की बीआयएसची मानके खाजगी क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनण्यास मदत करत आहेत. ते असेही म्हणाले की, भारतात या बैठकीचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे कारण यामुळे भारतीय तज्ञांना मानकीकरण प्रक्रियेत थेट सहभागी होण्याची संधी मिळते, ज्यामुळे राष्ट्रीय परिसंस्था आणि जागतिक मानकीकरणाचे प्रयत्न या दोन्हींना बळकटी मिळते.

डॉ. पवन गोएंका (अध्यक्ष, इन-स्पेस) यांनी धोरणात्मक सुधारणा आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागामुळे भारताच्या अवकाश परिसंस्थेच्या परिवर्तनात्मक वाढीवर भर दिला आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी, उद्योगाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भारताला जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेशी सुसंगत करण्यासाठी मजबूत मानकांच्या महत्त्वावर जोर दिला. या कार्यक्रमात 13 देशांतील राष्ट्रीय मानक संस्थांचे प्रतिनिधी, भारतातील इस्रोसह आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थांचे तज्ञ, अवकाश उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील 131 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

आयएसओ/टीसी 20/एससी 14 हे अवकाश प्रणालींच्या रचना आणि उत्पादनापासून ते प्रक्षेपण, संचालन आणि अवकाश-आधारित सेवांपर्यंतच्या संपूर्ण जीवनचक्रासाठी आंतरराष्ट्रीय मानके विकसित करते, ज्यामुळे जागतिक अवकाश कार्यांमध्ये सुरक्षितता, आंतरकार्यक्षमता आणि शाश्वतता सुनिश्चित होते. या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बैठकीचे आयोजन करून भारताने जागतिक अवकाश क्षेत्रात आपले वाढते स्थान अधोरेखित केले आहे, जे इस्रोच्या कामगिरीमुळे आणि 'इन-स्पेस' अंतर्गत सुधारणांमुळे शक्य झालेल्या खाजगी क्षेत्राच्या वाढत्या सहभागामुळे घडून येत आहे. ही बैठक अवकाश शाश्वतता, अवकाशातील कचऱ्याचे उपशमन आणि मोहीम परिचालन यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये जागतिक मानके घडवण्यातील भारताच्या सक्रिय भूमिकेचेही प्रतिबिंब दर्शवते.

 

* * *

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2259044) अभ्यागत कक्ष : 18