कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी फळ निर्यातीत भारताला अव्वल स्थानी नेण्यासाठीचा पथदर्शी आराखडा मांडला


फळांचा दर्जा, साठवण क्षमता आणि निर्यातीवर सरकारचा भर: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी फळ क्षेत्रासाठी कृती आराखडा तयार करणार: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान

Posted On: 07 MAY 2026 9:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मे 2026

 

कृषी क्षेत्रासाठी केवळ उत्पादन वाढवणे आता पुरेसे ठरणार नसल्याचे केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण आणि ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. लखनौ येथील आयसीएआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चर (सीआयएसएच) येथे आयोजित 'फ्रूट होरायझन 2026' परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक फळ बाजारात आपली भक्कम ओळख निर्माण करण्यासाठी भारताने आता गुणवत्ता, साठवण क्षमता, प्रक्रिया, लॉजिस्टिक्स आणि निर्यात मानके, यावर गांभीर्याने काम केले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. शेती आता केवळ शेतापुरतीच मर्यादित राहू शकत नाही. उत्पादन ते प्रक्रिया, विपणन आणि निर्यात या संपूर्ण मूल्यसाखळीचे बळकटीकरण करणे, हीच आता काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

   

केवळ उत्पादनावर नव्हे, तर गुणवत्तेकडेही लक्ष केंद्रित करायला हवे

फळ उत्पादन, निर्यात आणि फलोत्पादन व्यवसायाच्या परिसंस्थेशी संबंधित शेतकरी आणि भागधारकांशी संवाद साधताना चौहान म्हणाले की, जागतिक फळ बाजारपेठेत भारताला आपले स्थान बळकट करायचे असेल, तर फळांचा दर्जा सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. फळांची साठवण क्षमता वाढवणे, निर्यातीदरम्यान गुणवत्ता कायम राखणे आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार उत्पादन सुनिश्चित करणे, यावर आता विशेष लक्ष द्यायला हवे, असे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृती दलाची स्थापना करणार

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात, आयसीएआर अंतर्गत कार्यरत वैज्ञानिक संस्था, निर्यातदार, कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण आणि इतर संबंधित संस्था, संयुक्तपणे एक कृती दल स्थापन करतील असा निर्णय घेण्यात आला. हे कृती दल उत्पादक आणि निर्यातदारांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काम करेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी प्रभावी, कालबद्ध कृती योजना तयार करेल.

   

झिरो रिजेक्शन आणि उत्कृष्ट गुणवत्तेवर भर

केंद्रीय मंत्री म्हणाले की, भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनायचे असेल, तर 'झिरो रिजेक्शन, म्हणजेच ‘शून्य नकार’ मानकांसह उत्कृष्ट दर्जाच्या फळांचे उत्पादन करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करायला हवे. आधुनिक तंत्रज्ञान, पीक काढणीनंतरचे उत्तम व्यवस्थापन, पॅक हाऊस, प्रक्रिया पायाभूत सुविधा आणि निर्यातीसाठी व्यावहारिक प्रमाणित कार्यपद्धती, याद्वारे भारतीय फलोत्पादन क्षेत्र नवी उंची गाठू शकते, असे ते म्हणाले.

लहान शेतकऱ्यांना अधिक चांगल्या बाजारपेठा आणि निर्यातीच्या संधींशी जोडण्यामध्ये एफपीओ, एफपीसी आणि स्वयं-सहायता गटांची महत्वाची भूमिका चौहान यांनी अधोरेखित केली.

शेतकरी, वैज्ञानिक, निर्यातदार, रोपवाटिका संचालक, शेतकरी उत्पादक संघटनांचे प्रतिनिधी, फळ प्रक्रिया क्षेत्रातील भागधारक आणि विविध राज्यांमधील विविध संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

   

 

* * *

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2258899) अभ्यागत कक्ष : 5