विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
उच्चस्तरीय चर्चेद्वारे भारत आणि व्हिएतनाम यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान भागीदारी केली अधिक मजबूत; कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप-टेक आणि नवोन्मेष क्षेत्रात सहकार्याचा विस्तार
डॉ. जितेंद्र सिंह यांची व्हिएतनामच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा
विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात संयुक्त सहभागाला गती देण्यावर भारत आणि व्हिएतनाम सहमत
Posted On:
07 MAY 2026 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2026
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) तसेच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री, डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे व्हिएतनामचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री, प्रा. डॉ. वू हाई क्वान यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत दोन्ही बाजूंनी उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवोन्मेष, संशोधन आणि स्टार्टअप परिसंस्थांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमती दर्शवली.
या चर्चेत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डीप टेक्नॉलॉजी, सेमीकंडक्टर, रोबोटिक्स, जैवतंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान आणि नवोन्मेष-आधारित संशोधन या क्षेत्रांमधील सहकार्याला चालना देण्यावर, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमधील संस्थात्मक यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

व्हिएतनामी शिष्टमंडळाचे स्वागत करताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारत आणि व्हिएतनाम हे सुमारे दोन हजार वर्षांच्या सामायिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांनी जोडलेले 'सभ्यता भागीदार' असल्याचे सांगितले. गेल्या दशकात दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक सामरिक भागीदारीला नवीन गती मिळाली असून ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांच्या भारत भेटीनंतर ही भागीदारी अधिक दृढ झाली आहे, असेही ते म्हणाले.
भारताच्या 'ॲक्ट ईस्ट धोरण' आणि 'हिंद-प्रशांत दृष्टिकोनात' व्हिएतनाम एक महत्त्वाचा भागीदार आहे, असे मंत्री म्हणाले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधील वाढता भारत-आसियान सहभाग सहयोगी संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान-चालित विकासासाठी एक मजबूत पाया प्रदान करतो, असे त्यांनी नमूद केले. हा सद्य सहभाग विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अग्रगण्य क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक उंचावण्यासाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या स्टार्टअप प्रणालीचा उल्लेख केला तसेच दोन्ही देशांतील स्टार्टअप्स, नवोन्मेषक आणि संशोधन संस्थांमध्ये अधिक दृढ सहभागाचा प्रस्ताव मांडला. उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये उद्योजक आणि तरुण संशोधकांसाठी नवीन संधी निर्माण करण्याकरिता भारत आणि व्हिएतनाम एकत्र काम करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
भारत-आसियान विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष कार्यक्रमांमधील व्हिएतनामच्या सक्रिय सहभागाचाही मंत्र्यांनी उल्लेख केला. भारत-आसियान संशोधन आणि प्रशिक्षण शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत व्हिएतनाममधील सुमारे दहा संशोधकांना शिष्यवृत्ती मिळाली आहे, तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये अनेक संयुक्त प्रकल्प सध्या सुरू आहेत. व्हिएतनामी नवोन्मेषक आणि महिला शास्त्रज्ञांनी प्रादेशिक सहकार्य चौकटीअंतर्गत आयोजित नवोन्मेष आणि विज्ञान मंचांमध्येही सहभाग घेतला आहे.
दोन्ही बाजूंनी भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील प्रस्तावित पुढील संयुक्त समिती बैठकीविषयी (जेसीएम) चर्चा केली तसेच संरचित संस्थात्मक सहकार्याच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध आणखी पुढे नेण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचाही आढावा घेतला.

प्रा. डॉ. वू हाई क्वान यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांच्या वाढत्या संबंधाचे स्वागत करत व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त आणि समाजासाठी फायदेशीर असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामध्ये रचनात्मक सहकार्य विकसित करण्यात व्हिएतनामला स्वारस्य असल्याचे सांगितले. द्विपक्षीय उपक्रमांचे अंमलबजावणीयोग्य परिणामांमध्ये रूपांतर व्हावे यासाठी नियमित समन्वय आणि ठोस कृती आराखडा तयार करण्याकरिता दोन्ही मंत्रालयांमधून समर्पित नोडल पॉइंट्स निश्चित केले जावेत अशी सूचना त्यांनी केली.
व्हिएतनामच्या मंत्र्यांनीही दोन्ही मंत्रालयांमधील संयुक्त समिती यंत्रणा सुरू ठेवण्यास पाठिंबा देत भारतासोबत भविष्यात आयोजित केल्या जाणाऱ्या भेटीगाठी, चर्चा यामध्ये समन्वय साधण्यासाठी व्हिएतनाम उपमंत्री स्तरावरील प्रतिनिधीची नियुक्ती करणार असल्याची माहिती दिली.
चर्चेदरम्यान, दोन्ही बाजूंनी कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित मिशन्स, सायबर सुरक्षाविषयक नियमांची चौकट, नवोन्मेष परिसंस्था आणि तंत्रज्ञान हस्तांतरण उपक्रमांमधील सहकार्यावरही विचारांची देवाणघेवाण केली. भारताने या क्षेत्रांमधील आपले अनुभव आणि सर्वोत्तम कार्यपद्धती सामायिक करण्याची इच्छा व्यक्त केली.

या बैठकीत दोन्ही देशांदरम्यानच्या सध्याच्या शैक्षणिक आणि संस्थात्मक संबंधांवरही चर्चा झाली, त्यामध्ये संशोधन संस्था, नवोन्मेष केंद्रे आणि तंत्रज्ञान इन्क्युबेशन मंचांदरम्यान सहकार्य या मुद्द्यांचा समावेश होता. स्टार्टअप आदान-प्रदान कार्यक्रम, सह-नवोन्मेष केंद्रे आणि उद्योग-संलग्न संशोधन भागीदारीच्या शक्यतांवरही यावेळी चर्चा झाली.
भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सर्वंकष सामरिक भागीदारी आराखड्याअंतर्गत दृढ आणि वाढती भागीदारी असून त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान हे क्षेत्र द्विपक्षीय सहकार्याचा प्रमुख आधारस्तंभ बनले आहे. दोन्ही बाजूंनी नियमित संवाद कायम ठेवण्यास तसेच द्विपक्षीय संवादाची फलिते दोन्ही देशांतील लोकांना तांत्रिक, आर्थिक आणि सामाजिक लाभदायक ठरतील अशा ठोस सहकार्य उपक्रमांमध्ये रूपांतरित करण्यासाठी काम करण्यास सहमती दर्शवली.
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2258849)
अभ्यागत कक्ष : 8